Dr Manmohan Singh | पुण्याच्या विकासात माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे मोठे योगदान !
Former Prime Minister Dr Manmohan Singh – (The Karbhri News Service) – देशातील वाढत्या नागरीकरणात शहरांचा विकास नियोजनबद्ध व्हावा, यासाठी माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंगजी यांनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण मिशन (जेएनआरयूएम) हाती घेतले त्यातून पुणे शहरात पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य दिले. एवढा भरीव निधी मिळणारे पुणे हे देशातील एकमेव शहर ठरले. त्यामुळे पुण्याच्या विकासाला मोठा हातभार लागला, यामुळे आम्ही पुणेकर त्यांचे ऋणीच राहू, अशी प्रतिक्रिया माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दिली आहे.
डॉ.मनमोहन सिंगजी दूरदृष्टीचे आणि संयमाने भरीव योजना राबविणारे नेते होते. शहरांच्या विकासासाठी जेएनआरयूएम ही चांगली योजना त्यांनी आखली होती. वाहतुकीची कोंडी सुटावी, रस्ते, चौक प्रशस्त व्हावेत, नद्यांच्या पाण्याचे शुद्धीकरण व्हावे, शहरांमध्ये सांडपाणी निचऱ्याचे जाळे उभे रहावे, शहराचे पर्यावरण राखले जावे अशा विचारातूनच त्यांनी जेएनआरयूएम योजना आखली. त्यातून बीआरटी, नवीन बस खरेदी, नदी सुधार योजना यांना चालना मिळाली. पुणे मेट्रो साठी आवश्यक मंजुरी डॉ.मनमोहन सिंगजी यांच्या काळातच मिळाली.
केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री असताना, डॉ.मनमोहन सिंगजी यांनी अर्थव्यवस्थेची नव्याने मांडणी केली. त्यातून व्यापार, उद्योग या क्षेत्रांना बळकटी आली. मुख्य म्हणजे गरीब आणि मध्यमवर्गाला दिलासा देणारी धोरणे त्यांनी अर्थमंत्री आणि पंतप्रधान असताना राबविली. जागतिक मंदीच्या काळात त्याच्या झळा त्यांनी भारतीयांना लागू दिल्या नाहीत, हे डॉ.मनमोहन सिंगजी यांचे मोठे यश होते. डॉ.मनमोहन सिंगजींची ऐतिहासिक कारकीर्द भारतीय कधीच विसरणार नाहीत. डॉ.मनमोहन सिंगजींना विनम्र श्रद्धांजली!
सन २००४ साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी डॉ.मनमोहन सिंगजी पुण्यात आले होते. तेव्हा त्यांनी काँग्रेस भवनाला भेट दिली होती. तेव्हा मी पक्षाचा पुणे शहराध्यक्ष होतो. त्यांचे स्वागत मी केले होते. त्यांनी सगळ्यांशी अतिशय विनयशीलतेने संवाद साधला होता. त्यांच्या सहज वागण्यामुळे ती भेट संस्मरणीय ठरली.
———
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला: देवेंद्र फडणवीस
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थशास्त्राशी संबंधित विपूल लेखन सुद्धा त्यांनी केले. त्यांनी केलेले कार्य कायम देशवासियांच्या स्मरणात राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना लाभो, अशी मी प्रार्थना करतो.
———–
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांचं निधन ही राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्राची मोठी हानी -उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार
भारतासारख्या विकसनशील देशाला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाच्या वाटेवर नेण्याचा क्रांतिकारी निर्णय घेणारे आणि तो निर्णय कमालीचा यशस्वी करुन दाखवणारे देशाचे माजी पंतप्रधान, जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ डॉ. मनमोहनसिंह यांचं निधन ही देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्राची मोठी हानी आहे. भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या कार्याचा पाया डॉ. मनमोहनसिंह यांनी रचला. गेल्या अनेक दशकात आलेल्या प्रत्येक जागतिक मंदीसमोर भारताची अर्थव्यवस्था पाय घट्ट रोवून भक्कमपणे उभी राहिली, याचं बहुतांश श्रेय डॉ. मनमोहनसिंह यांनी देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून त्याकाळात घेतलेल्या दूरदष्टीपूर्ण निर्णयांना आहे, असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी डॉ. मनमोहनसिंह यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना आदरांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, डॉ. मनमोहनसिंह यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून यशस्वीपणे काम केलं. जागतिक अर्थव्यवस्थेचा सखोल अभ्यास, दूरदष्टीपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता आणि देशातील सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाचा ध्यास या बळावर त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था कठीण परिस्थितीतून रुळावर आणली. अर्थव्यवस्थेचा पाया अधिक मजबूत केला. मजबूत अर्थव्यवस्थेचा उपयोग समाजाला होईल याची काळजी घेतली. भारतीय अर्थव्यवस्थेला आज जे मजबूत स्वरुप प्राप्त झाले आहे, त्याचं मोठं श्रेय डॉ. मनमोहनसिंह यांना आहे. त्यांच्या निधनाने देशाचं सभ्य, सुसंस्कृत, विश्वासार्ह नेतृत्वं हरपलं आहे. देश आपल्या सुपुत्राला मुकला आहे. देशाचे यशस्वी अर्थमंत्री, साहसी पंतप्रधान आणि जनमानसाचा विश्वास प्राप्त केलेला नेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील.
————
डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. डॉ. मनमोहन सिंह यांच्या सोबत मी पंतप्रधान कार्यालयाचा मंत्री म्हणून 6 वर्षे अत्यंत जवळून काम केले होते. डॉ मनमोहन सिंह हे अत्यंत उच्चशिक्षित होते तसेच तें अर्थतज्ज्ञ होते. पण याचा त्यांना कधीही गर्व नव्हता. तें राजकारण चांगल्या पद्धतीने समजत होते परंतु तें राजकारणी नव्हते असं म्हटले जाते कारण तें परंपरागत मंत्री, पंतप्रधान असे नव्हते. त्यांच्याकडे प्रचंड अशी नम्रता होती हे मी अगदी जवळून पाहिले आहे.
2008 च्या जागतिक मंदीच्या काळामध्ये मनमोहन सिंह यांची पंतप्रधान म्हणून भूमिका अत्यंत महत्वाची होती. त्यांच्या आर्थिक धोरणामुळे त्या आर्थिक मंदीची देशाला झळ बसू दिली नाही.त्यांनी अनेक महत्वाचे कायदे केले मनरेगा सारखा कामाच्या अधिकाराचा कायदा असेल, माहितीच्या अधिकाराचा कायदा, खाद्यान्न सुरक्षेचा कायदा, भूमी अधिग्रहण कायदा,शिक्षणाचा हक्काचा कायदा (Right to Education), वनधिकार कायदा असे अनेक लोकांभिमुख कायदे डॉ. मनमोहन सिंह यांच्या कालखंडात त्यांनी घेतले. त्यामुळे त्यांच्या पंतप्रधान कार्यकाळ मधील तो 10 वर्षाचा कालखंड हा आधुनिक भारताचा सुवर्ण काळच म्हणावा लागेल. अशा महान नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली
– पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
पंतप्रधान कार्यालय राज्य मंत्री, भारत सरकार
————
COMMENTS