Merged 23 Villages DP | समाविष्ट २३ गावांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी इरादा जाहीर करण्याचा प्रस्ताव!
| शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांची “नगररचना अधिकारी” म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या हद्दीत ३० जून २०२१ रोजी समाविष्ट झालेल्या २३ गावांचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी आता पुणे महापालिकेकडेच आली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) चा विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा रद्द झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार विकास आराखडा तयार करण्यासाठी इरादा जाहीर करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाच्या वतीने शहर सुधारणा समिती समोर ठेवला आहे. (PMC City Improvement Committee)
३० जून २०२१ रोजी राज्य शासनाने पुणे महापालिकेत २३ गावे समाविष्ट केली होती. त्यावेळी या गावांसाठी PMRDA ला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमण्यात आले होते. PMRDA ने २ सप्टेंबर २०१९ रोजी या गावांचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला होता. मात्र २७ सप्टेंबर २०२५ रोजी तो रद्द केला.
त्यामुळे ११ फेब्रुवारी २०२६ रोजी शासनाने या २३ गावांबाबत PMRDA चा विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा रद्द करून नियोजनाचे अधिकार पुणे महापालिकेकडे सोपवले.
२३ गावं कोणती?
महाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक, किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाची वाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी, वाघोली.
आता पुढे काय?
महापालिकेने या २३ गावांसाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६ च्या कलम २३(१) अन्वये विकास आराखडा तयार करण्याचा इरादा जाहीर करण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच कलम २४ अन्वये शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांची “नगररचना अधिकारी” म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे.
महापालिका प्रशासनाने म्हटले आहे की, गेल्या ७ वर्षांत या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण आणि लोकसंख्या वाढ झाली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर रस्ते, पाणी, सार्वजनिक सुविधा यांचा समतोल साधणारा नवा विकास आराखडा तयार करणे गरजेचे आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हा प्रस्ताव शहर सुधारणा समिती च्या माध्यमातून मुख्य सभेकडे पाठवला आहे. आता शहर सुधारणा समिती आणि मुख्य सभेच्या मान्यतेनंतर पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे.


COMMENTS