ऑटोरिक्षाच्या भाडेदरात 8 नोव्हेंबरपासून वाढ
पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या हद्दीत तीन आसनी ऑटोरिक्षांच्या भाडेदरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या 8 नोव्हेंबरपासून पहिल्या दीड कि.मी.साठी 20 रुपये तर त्यापुढील प्रत्येक कि.मी.साठी 13 रुपये भाडेदर असणार आहे. खटुआ समितीच्या शिफारशींनुसार प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाड पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती हद्दीत लागू होणार आहे. यापूर्वी पहिल्या दीड कि.मी.साठी 18 रुपये तर पुढील प्रत्येक कि.मी.साठी 12.19 रुपये दर होता.
पुणे, पिंपरी व बारामती साठी असेल हा दर
8 नोव्हेंबरपासून पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत रात्री 12 ते सकाळी 5 या कालावधीत सुधारित दरावर 25 टक्के अतिरिक्त भाडे आकारता येईल. महानगरपालिक क्षेत्र वगळून इतर ग्रामीण भागात या रात्रीच्या कालावधीत 40 टक्के अतिरिक्त भाडे आकारता येईल. प्रवाशांसोबत असणाऱ्या सामानासाठी 60 बाय 40 सें.मी. आकाराच्या किंवा त्यापेक्षा अधिक मोठ्या नगासाठी 3 रुपये इतके शुल्क लागू राहील.
ही भाडेसुधारणा 8 नोव्हेंबरपासून पासून लागू होणार असल्याने ऑटोरिक्षांचे मीटर पुन:प्रमाणीकरणासाठी (मीटर कॅलिब्रेशन) 8 नोव्हेंबरपासून 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदत देण्यात येत आहे. मुदतीत मीटर कॅलिब्रेशन करुन घेणाऱ्या रिक्षांनाच ही भाडेदरवाढ लागू होईल. मुदत समाप्तीनंतर किमान 7 दिवस आणि कमाल 40 दिवस या मर्यादेत प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी 1 दिवस परवाना निलंबन केले जाईल. निलंबनाऐवजी तडजोड शुल्क जमा करण्यात इच्छुक ऑटोरिक्षाधारकांकडून प्रत्येक दिवसासाठी 50 रुपये आकारण्यात येईल जे किमान 500 रुपये आणि कमाल 2 हजार रुपये या मर्यादेत राहील, असे प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी कळवले आहे.
0000
COMMENTS