Anantrao Pawar College | अनंतराव पवार महाविद्यालयात वाचन कौशल्य कार्यशाळा संपन्न
PDEA Anantrao Pawar College – (The Karbhari News Service) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रम उत्साहात सुरू आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत ०१ जाने. २०२५ ते १५ जानेवारी २०२५ रोजी वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालये येथे राबविण्याचे योजलेले आहे. याअंतर्गत अनंतराव पवार महाविद्यालयातील मराठी विभागाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाची सुरुवात १ जानेवारी रोजी एकदिवसीय “वाचन कौशल्य कार्यशाळे”ने उत्साहात झाली. (Pune News)
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो होते. या कार्यशाळेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख, विद्या परिषद सदस्य प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी पुस्तकांतून विचार आणि विचारातून विकास, हे सूत्र मध्यवर्ती ठेवून प्रेरणादायी वैविध्यपूर्ण असलेले ग्रंथ उदा. कर्मवीर भाऊराव पाटील, नारायण सुर्वेंच्या कविता, नापास मुलांची गोष्ट, चौकटी बाहेरचे जग, मी एक स्वप्न पाहिले, ताई मी कलेक्टर व्हयनो, बीन बियाचं झाड अशी असंख्य पुस्तकांची उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर ठेवली. जगणे आणि पुस्तके यातील अन्योन्यसंबंध प्रभावीपणे उलगडला.
अनंतराव पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ग्रंथ वाचनाकडे प्रवृत्त करण्यासाठी आणि वाचन-संस्कृती वाढवण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त असल्याचे स्पष्ट केले. तसेच हा उपक्रम पुढे वर्षभर सुरू ठेवण्यासाठी वाचन कट्टा सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी जशी पुस्तके वाचली पाहिजेत, तसाच समाजही वाचायला शिकले पाहिजे; तरच त्यांना समाजाचे प्रश्न अधिक नीट कळतील आणि ते प्रश्न सोडवण्याचे मार्गही शोधता येतील अशी आशा व्यक्त केली.
ह्या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो, उपप्राचार्य डॉ. एस. बी. शिंदे, ग्रंथालयप्रमुख प्रा. अविनाश हुंबरे यांचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय वाचन पंधरवड्याअंतर्गत मराठी विभागामार्फत सामूहिक वाचन, लेखक-विद्यार्थी संवाद, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा आयोजित करणार असल्याचे मराठी विभागप्रमुख डॉ. गणेश चौधरी, तसेच प्रा. सिद्धार्थ नवतुरे यांनी सांगितले.
वाचन कौशल्य कार्यशाळेस महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. मनीषा खैरे यांनी केले. प्रा. दत्तात्रय फटांगडे यांनी आभार मानले.
COMMENTS