Anantrao Pawar College | अनंतराव पवार महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला संपन्न
Education News – (The Karbhari News Service) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अनंतराव पवार महाविद्यालय, पिरंगुट यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे आयोजन महाविद्यालयाच्या सभागृहात २९ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ या दरम्यान करण्यात आले होते. (Pune News)
या तीन दिवसीय व्याख्यानमालेचे पहिले पुष्प : दि. २९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वा. मा. श्री. मनोहर बोरगावकर यांनी ‘उद्योजकीय गुणवत्ता’ या विषयावर गुंफले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो हे होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. एस. बी. शिंदे, प्रा. भरत कानगुडे उपस्थित होते. ‘उद्योजकीय गुणवत्ता’ या विषयावर मार्गदर्शन करताना मा. श्री. मनोहर बोरगावकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय गुणवत्ता निर्माण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची इत्यंभूत माहिती दिली. कोणताही उद्योग सुरू करताना आवश्यक असणाऱ्या गोष्टी, त्यांचे महत्त्व सांगताना आपण उत्पादित केलेला माल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक असणारे विक्री कौशल्य हे उदाहरणासह सांगितले. आपण वास्तव्यास असलेल्या परिसरातून जो कच्चामाल मिळतो त्याचे उद्योग व्यवसायामध्ये रूपांतर करून तो बाजारपेठेपर्यंत कसा पोहोचवता येईल आणि अधिकची विक्री कशा प्रकारे करता येईल, याचे प्रात्यक्षिकही आपल्या व्याख्यानातून दिले. प्रथमच किंवा नव्याने व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी भागभांडवल उपलब्ध करून देणाऱ्या विविध वित्तीय संस्थांची माहिती यावेळी त्यांनी दिली. व्याख्यानानंतर उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. व्याख्यानमालेसाठी महाविद्यालयातील सर्व विद्या शाखांतील विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुसरे पुष्प दि. ३० जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वा. प्रा. दि. वा. बागुल यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक समतेचा आणि लोकशाहीचा पुरस्कर्ता’ या विषयावर गुंफले. आपल्या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळाचा इतिहास अधोरेखित करून अठरापगड जातीजमातीतील संत, विचारवंत यांचे समाजातील कार्य सांगितले. आपल्या व्याख्यानामधून आईसाहेब जिजाऊंनी स्वराज्य निर्मितीचे ठेवलेले स्वप्न उलगडून दाखविले. इतिहास व कादंबरी लेखनामध्ये असलेले वास्तव आणि काल्पनिकता देखील अधोरेखित केली. काल्पनिकता असलेल्या साहित्यापेक्षा इतिहासलेखनामधील सामर्थ्य त्यांनी अधोरेखित केले. आपल्या व्याख्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या निर्मितीसाठी सोबत घेतलेल्या मावळ्यांचाही आढावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी समतेच्या दृष्टिकोनातून केलेले कामकाज हे सिद्धांतरुपी अधोरेखित केले. समाजामध्ये असलेले कुप्रवृत्तीचे लोक, त्यांच्याकडून होणाऱ्या अनिष्ट घटना सांगताना त्यांनी समाजासाठी चांगले काम करणाऱ्या लोकांनाच कसा त्रास दिला जातो हेही अधोरेखित केले. यासाठी संत, समाज सुधारक, विचारवंत यांचीही उदाहरणे दिली. कुटुंबामध्ये मुलांना धार्मिक गोष्टी शिकविण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे कार्य शिकवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशांचा समावेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात कोणकोणत्या कलमांमध्ये केलेला आहे, हेही यावेळी सांगितले. थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य, छत्रपती शिवाजी महाराजांची शोधलेली समाधी, आदी विविध विषयांवर प्रा. दि. वा. बागुल यांनी भाष्य केले.
तिसरे पुष्प दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वा. योगतज्ज्ञ मा.श्री. प्रकाश सस्ते यांनी ‘यशस्वी व्हायचंय मला’ या विषयावर गुंफले. आपल्या व्याख्यानातून मार्गदर्शन करताना त्यांनी व्यक्तिमत्व म्हणजे नेमके काय असते हे अधोरेखित करून व्यक्तीच्या बाह्यरंग आणि अंतरंगाविषयी भाष्य केले. जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याकडे कोणकोणत्या गोष्टी, कौशल्ये, दृष्टिकोन असावा हे सांगितले. आपले व्यक्तिमत्व कसे आहे हे स्पर्श, देहबोली, वस्त्र, बोलण्यासाठी शब्दांची निवड, ध्यानचिंतन, कोणत्याही कामाशी तादात्म्यभाव ठेवून काम करावे. या विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने यशस्वी जीवनाची सूत्रे उपस्थितांसमोर मांडली. व्याख्यानमालेसाठी संस्था पदाधिकारी उपाध्यक्ष मा. श्री. राजेंद्र घाडगे, मानद सचिव मा. ऍड. संदीप कदम, खजिनदार मा.ऍड. मोहनराव देशमुख, सहसचिव मा. श्री. एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) मा. श्री. ए. एम. जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले. प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र कार्यवाह डॉ. गणेश चौधरी, प्रा. भरत कानगुडे, डॉ. किसन पालके, प्रा. सिद्धार्थ नवतुरे, प्रा. दीप सातव, डॉ. राजू शिरसकर यांनी काम पाहिले. कार्यालयीन अधीक्षक श्री. निलेश ठोंबरे, श्री. अनिल डोळस, श्री. विशाल मोकाटे, श्री. मंगेश गोळे, अक्षय शिंदे, श्री. हनुमंत आटळे श्रीम. दिपाली पवळे, श्रीम. आम्रपाली डोळस आदींनी सहकार्य केले.
डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS