अमित शहा यांची पुणे भेट म्हणजे भाजपच्या पराभवाची कबुली
– माजी आमदार मोहन जोशी यांची टीका
पुणे – राष्ट्रीय राजकारणातील भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते अमित शहा यांना महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात बोलवावे लागले. ही भाजपच्या महापालिकेच्या येत्या निवडणुकीतील पराभवाची कबुलीच आहे, अशी टीका माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली.
गेल्या पाच वर्षात भाजप, महापालिकेत एकही भरीव काम उभे करु शकलेले नाही. त्यामुळे एखाद्या मोठ्या प्रकल्पाच्या उदघाटनासाठी अमित शहा यांना भाजप नेते बोलावू शकलेले नाहीत. पुणेकरांनी भाजपचा हा सगळा कारभार पाहिलेला आहे, त्यामुळे अमित शहा येवोत अथवा पंतप्रधान नरेंद्र मोदी येवोत भाजपचा महापालिका निवडणुकीतील पराभव अटळ आहे, अशी प्रतिक्रिया मोहन जोशी यांनी व्यक्त केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी भाजपने शहरात मोठमोठे फलक लावले. त्यावर चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांचे मोठमोठे फोटो होते. पण, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न पूजनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो त्या फलकांवर नव्हते. राजकारणासाठी महापुरुषांच्या नावाचा वापर करुन घ्यावयाचा. ‘ ‘मुँह में राम, बगल में छुरी’ ही भाजपची नीती पुणेकरांना पहायला मिळाली, अशीही टीका मोहन जोशी यांनी केली.
वाढत्या महागाईसंदर्भात ‘अमित शहा जवाब दो’ अशी हॅशटॅग मोहीम सोशल मिडियावर काँग्रेस पक्षाने आज (रविवार) पासून चालू केली आहे, अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली. या संदर्भात बोलताना मोहन जोशी यांनी सांगितले, देशात महागाईचा उच्चांक झाला आहे. इंधन, धान्य, खाद्यतेल, भाज्या यांचे भाव वाढत आहेत. घरगुती गॅसची किंमत एक हजार रुपये झाल्याने महिलांना पुन्हा चुली पेटविण्याची वेळ आली आहे. महागाई वाढत असताना अमित शहा अथवा भाजपचे कोणतेही नेते त्याविषयी बोलायला तयार नाहीत. त्यामुळे जनतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मिडियावर ‘अमित शहा जवाब दो’ ही हॅशटॅग मोहीम हाती घेण्यात आली आहे.
COMMENTS