PMC Contract Employees | अपघातापासून निवृत्तीपर्यंतच्या सुरक्षिततेची माहिती आता कामगारांच्या हातात!
पुणे मनपाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी PF-ESIC मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Sunil Shinde RMS – (The Karbhari News Service) – नोकरीदरम्यान अपघात झाला तर उपचार कोण करणार? आजारी पडल्यानंतर वैद्यकीय मदत कशी मिळणार? नोकरी संपल्यानंतर किंवा निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षिततेचे काय? आपल्या PF खात्यात नियमितपणे पैसे जमा होत आहेत का? पगारातून ESIC चे योगदान कापले जाते, पण त्याचा लाभ नेमका कसा घ्यायचा? पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मनात असलेल्या या आणि अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) मार्गदर्शन शिबिरात मिळाली.
नगरसेवक सुनील शिंदे यांच्या पुढाकाराने शुक्रवारी, 11 सप्टेंबर 2026 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, पद्मावती येथे या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पुणे महानगरपालिकेच्या धनकवडी-कात्रज-आंबेगाव क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त सुरेखा भनगे यांचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.
यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले, “पुणे शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यात कंत्राटी साफसफाई कामगारांचे मोठे योगदान आहे. कामगार म्हणून आपल्या हक्कांची आणि कामगार कायद्यांनुसार मिळणाऱ्या सुविधांची माहिती प्रत्येक कर्मचाऱ्याला असणे आवश्यक आहे. ही माहिती देणे आणि त्याबाबत जनजागृती करणे ही प्रशासनाचीही जबाबदारी आहे.”
पुढे बोलताना त्यांनी या मार्गदर्शन शिबिराचा प्रत्येक कर्मचाऱ्याने लाभ घेऊन आपल्या सामाजिक सुरक्षेशी संबंधित अधिकार समजून घेतले पाहिजेत, असे आवाहन केले.
नगरसेवक सुनील शिंदे म्हणाले, “आजचा हा कार्यक्रम केवळ मार्गदर्शन शिबिर नाही, तर प्रत्येक कामगाराला त्याच्या कष्टाच्या मोबदल्याबरोबरच सामाजिक सुरक्षेच्या हक्कांची जाणीव करून देणारा महत्त्वाचा उपक्रम आहे. PF आणि ESIC हे केवळ पगाराच्या स्लिपवरील आकडे नसून कामगार आणि त्याच्या कुटुंबाच्या भविष्यातील आर्थिक व वैद्यकीय सुरक्षिततेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत.”
परिमंडळ क्र. 3 चे उपायुक्त विजयकुमार थोरात यांनीही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. ते म्हणाले, “ज्या प्रकारे घनकचरा व्यवस्थापन विभागातील कंत्राटी कर्मचारी शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडतात, त्याचप्रमाणे त्यांच्या कामगार हक्कांचे संरक्षण करणे, त्यांना कायद्याने मिळणाऱ्या सुविधा मिळवून देणे आणि त्यांचे अधिकार हिरावून घेतले जाणार नाहीत याची काळजी घेणे ही आपलीही जबाबदारी आहे.”
या शिबिरामध्ये अनेक कामगारांनी PF आणि ESIC संदर्भातील आपले प्रश्न उपस्थित केले. PF आणि ESIC या संज्ञा पगाराच्या स्लिपवर नियमित दिसत असल्या तरी त्यामागील अधिकार, योगदानाची नोंद, दावे करण्याची प्रक्रिया, वैद्यकीय सुविधा आणि उपलब्ध सामाजिक सुरक्षा योजनांची सविस्तर माहिती अनेक कर्मचाऱ्यांना प्रथमच मिळाली. या माहितीमुळे कामगारांनी समाधान व्यक्त केले.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संदर्भात सहाय्यक आयुक्त मा. गौरव तिवारी आणि अंमलबजावणी अधिकारी मसुनील लहाने यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तर कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या विविध सुविधा, वैद्यकीय लाभ आणि कामगारांच्या अधिकारांबाबत सहाय्यक आयुक्त मा. भावना पाटील तसेच बिबवेवाडी शाखेचे शाखा व्यवस्थापक वैभव दूधमल यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी पुणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त मा. सुरेखा भनगे यांनी उपस्थित मान्यवर, अधिकारी आणि सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
या मार्गदर्शन शिबिरामुळे पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या PF आणि ESIC संबंधी अधिकारांची माहिती मिळून सामाजिक सुरक्षेबाबत अधिक जागरूकता निर्माण झाली, अशी भावना उपस्थित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

COMMENTS