PMC Pune Grand Tour 2027 | शहरातील सर्व खोदाईची कामे २० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा! | मुदतीनंतर चारपट दंड

Homeadministrative

PMC Pune Grand Tour 2027 | शहरातील सर्व खोदाईची कामे २० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा! | मुदतीनंतर चारपट दंड

Ganesh Kumar Mule Nov 13, 2026 11:52 AM

Pune PMC News | मलनिःसारण कामातील अपघात; पुणे महापालिकेची ठेकेदारावर कारवाई; आगामी कामांसाठी बंदी
Pune GCC Meet | पुण्यात गुंतवणुकीचा नवा अध्याय | नवल किशोर राम आणि गणेश बिडकर यांच्या पुढाकाराने CM फडणवीसांची मोठी बैठक
PMC Standing Committee | सिंहगडावर फडकणार १०० फुटांचा भव्य भगवा ध्वज; पुणे महापालिकेची एक कोटींची तरतूद

PMC Pune Grand Tour 2027 | शहरातील सर्व खोदाईची कामे २० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा! | मुदतीनंतर चारपट दंड

पुणे ग्रँड टूरच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांचे निर्देश; मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवरही कारवाईचा इशारा

 

Pune PMC News – The Karbhari News Service  – पुणे ग्रँड टूर २०२७ च्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरू असलेली सर्व प्रकारची खोदाईची कामे २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी संबंधित कंपन्या आणि यंत्रणांना दिले आहेत. निर्धारित मुदतीनंतर पुणे ग्रँड टूरपूर्वी पुन्हा खोदाईची कामे केल्यास संबंधित कंपन्यांकडून प्रचलित दराच्या चारपट दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरील खोदाईच्या कामांसाठी महापालिकेने आता अंतिम मुदत निश्चित केली आहे. (Pune Municipal Corporation  – PMC)

पुणे ग्रँड टूर २०२७ च्या अनुषंगाने शहरातील विविध विकासकामे आणि पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी शहरात सुरू असलेल्या पॅकेज १, २, ३ आणि ४ अंतर्गत कामांचा आढावा घेण्यात आला. सर्व प्रलंबित कामे प्राधान्याने आणि जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

खोदाईसाठी २० नोव्हेंबरची डेडलाइन

शहरात मेट्रो, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (MSEDCL) तसेच इतर संबंधित संस्थांकडून विविध कामांसाठी रस्त्यांची खोदाई केली जात आहे. या कामांमुळे विकासकामांच्या नियोजनात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि पुणे ग्रँड टूरच्या आयोजनापूर्वी शहरातील रस्ते सुस्थितीत असावेत, यासाठी सर्व संबंधित कंपन्यांनी २० नोव्हेंबरपर्यंत खोदाईची कामे पूर्ण करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, पुणे ग्रँड टूर २०२७ नंतर खोदाईची कामे करावयाची असल्यास संबंधित कंपन्यांकडून प्रचलित दराच्या चारपट दराने दंड आकारण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित कंपन्यांना निर्धारित मुदतीत कामे पूर्ण करावी लागणार आहेत.

कामे रखडल्यास कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई

पुणे ग्रँड टूरच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या पॅकेज १ ते ४ मधील विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर महापालिका प्रशासनाने भर दिला आहे. कामे करताना येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून कामांचा वेग वाढवावा. तसेच, ठरवून दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार यंत्रणांवर दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

विकासकामे करताना मेट्रो, MNGL, MSEDCL आणि इतर संबंधित संस्थांनी एकमेकांशी समन्वय साधून कामांचे नियोजन करावे. विविध यंत्रणांमधील समन्वयाअभावी कामांना विलंब होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर, उपायुक्त निखिल मोरे, उपायुक्त माधव जगताप यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: