Wadgaonsheri Constituency | वडगावशेरी मतदारसंघातील पावसाळी परिस्थितीची पाहणी; धानोरीतील सदोष कामांवर कारवाईचे आदेश

Homeadministrative

Wadgaonsheri Constituency | वडगावशेरी मतदारसंघातील पावसाळी परिस्थितीची पाहणी; धानोरीतील सदोष कामांवर कारवाईचे आदेश

Ganesh Kumar Mule Jul 14, 2026 7:56 PM

Budget 2024 | अर्थसंकल्पात हवी गरिबी निर्मूलनासाठी तरतूद | जनअर्थसंकल्प प्रस्तावावरील चर्चेत मागणी
SPV | Power Purchase | वीज खरेदी बाबत SPV केली  स्थापन करण्याच्या प्रस्तावाला स्थायीची मंजुरी 
Ravindra Dhangekar | रविंद्र धंगेकर यांचे आमदार पदी निवड झाल्याचे फ्लेक्स झळकले आणि तात्काळ काढले देखील

Wadgaonsheri Constituency | वडगावशेरी मतदारसंघातील पावसाळी परिस्थितीची पाहणी; धानोरीतील सदोष कामांवर कारवाईचे आदेश

 

Suhas Tingre NCP – (The Karbhari News Service) – वडगावशेरी मतदारसंघातील विविध भागांमध्ये पावसाचे पाणी साचणे, पावसाळी ड्रेनेज लाईनची अपूर्ण कामे तसेच पावसामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची दखल घेत माजी आमदार सुनिल टिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज संबंधित भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यापूर्वी या विषयांबाबत पुणे महानगरपालिका स्थायी समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानुसार प्रशासनासोबत प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. अशी माहिती नगरसेवक सुहास टिंगरे यांनी दिली.

या पाहणीमध्ये अग्रेसर शाळा परिसर, कॉमर्झोन, खेसे पार्क, कलवड, एस्टर्लिया सोसायटी, एलिमेंटो सोसायटी, पोरवाल रोड, लोहगाव आणि धानोरी परिसरातील पावसाचे पाणी साचणारी ठिकाणे, पावसाळी ड्रेनेज लाईनची कामे तसेच बाधित भागांची तपासणी करण्यात आली.

यावेळी शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता (प्रकल्प व ड्रेनेज) दिनकर  गोजारे, नगरसेवक रवी टिंगरे, श्री. हरिभक्त तसेच पुणे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांशी व संबंधित कंत्राटदारांशी सविस्तर चर्चा करून रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या, पावसाचे पाणी साचू नये यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या तसेच कामाचा दर्जा कायम राखण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

विशेषतः धानोरी परिसरात काही ठिकाणी सदोष पद्धतीने करण्यात आलेल्या कामांची गंभीर दखल घेण्यात आली. संबंधित कंत्राटदारांना सदोष कामांची तात्काळ दुरुस्ती करून निर्धारित तांत्रिक निकषांनुसार दर्जेदार पद्धतीने काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

तसेच, विश्रांतवाडी–धानोरी मुख्य रस्त्यावरील परांडे नगर परिसरात सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याची गंभीर दखल घेण्यात आली. सन २०२२ मध्ये ‘स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट’ अंतर्गत सुमारे ५४ कोटी रुपये खर्च करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या संपूर्ण प्रकल्पाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी, संबंधित कंत्राटदार व जबाबदार व्यक्तींवर कडक प्रशासकीय कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. नागरिकांच्या पैशांचा अपव्यय करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

नागरिकांना पावसाळ्यात कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. वडगावशेरी मतदारसंघातील विकासकामांवर सातत्याने लक्ष ठेवून नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: