Pune Water Cut on Thursday | पुण्यात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद; १९ नोव्हेंबरपासून पुन्हा साप्ताहिक पाणीकपात सुरू
| दिवाळीनिमित्त दोन गुरुवारची पाणीकपात रद्द केल्यानंतर महापालिकेचा निर्णय; संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद
Pune Water Supply – The Karbhari News Service – शहरातील पाणी उपलब्धतेचा विचार करून पुणे महानगरपालिकेकडून पुन्हा साप्ताहिक पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. येत्या १९ नोव्हेंबरपासून दर गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना दर आठवड्याला गुरुवारी पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी याबाबत माहिती दिली आहे. (Pune Water Cut News)
शहरासाठी सध्या दरवर्षीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यातच संभाव्य कमी पर्जन्यमानाचा विचार करून जलस्रोतांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. त्यानुसार पुणे महापालिका हद्दीत १५ ऑक्टोबर २०२६ पासून दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते.
दरम्यान, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी ५ नोव्हेंबर आणि १२ नोव्हेंबर रोजी नियोजित असलेली पाणीकपात रद्द करण्यात आली होती. त्यामुळे सलग दोन गुरुवारी शहरातील पाणीपुरवठा नियमित ठेवण्यात आला. मात्र, आता १९ नोव्हेंबरपासून पुन्हा दर गुरुवारी पाणीकपात लागू करण्याचा निर्णय महापालिकेने जाहीर केला आहे.
या निर्णयामुळे शहरातील सर्व भागांतील पाणीपुरवठा दर गुरुवारी बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा तसेच पाणीकपातीच्या आदल्या दिवशी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
| पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी संपर्क साधा
पाणीकपातीच्या कालावधीत पाणीपुरवठ्याबाबत काही तक्रार असल्यास नागरिकांनी महापालिकेच्या कॉल सेंटर किंवा पीएमसी केअरच्या माध्यमातून तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी १८००-१०३०-२२२ या टोल फ्री क्रमांकावर तसेच ९६८९९००००२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. याशिवाय पीएमसी केअर ॲपचाही वापर करता येईल.
पाणीपुरवठ्याच्या नियोजनात तातडीच्या कामामुळे काही बदल झाल्यास त्याची माहिती पुणे महापालिकेच्या अधिकृत www.pmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

COMMENTS