Dr Sidharth Dhende | पुण्यातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये मानवतेचा अनोखा सोहळा   – दिंडी क्रमांक तीन मधील वारकऱ्यांच्या सेवेत सर्वधर्मीयांचा सहभाग

HomeBreaking News

Dr Sidharth Dhende | पुण्यातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये मानवतेचा अनोखा सोहळा – दिंडी क्रमांक तीन मधील वारकऱ्यांच्या सेवेत सर्वधर्मीयांचा सहभाग

Ganesh Kumar Mule Jul 08, 2026 9:41 PM

Safe transport | Dr. Siddharth Dhende | सुरक्षित वाहतूक अंतर्गत पुणे प्रभाग दोन बनला स्मार्ट |अर्बन ९५ संस्था, पुणे मनपातर्फे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार
Dr Siddharth Dhende | प्रभाग दोन मध्ये फराळ वाटपातून सर्वसामान्यांची दिवाळी गोड – माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा 20 वर्षे उपक्रम
PMC Ward no 2 | प्रभाग दोन साठी आयुक्तांचे मान्सून ‘गिफ्ट’ | ई कॉमरझोन ते मेंटल कॉर्नर दरम्यान पावसाळी लाईनसाठी दीड कोटींची मंजुरी

Dr Sidharth Dhende | पुण्यातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये मानवतेचा अनोखा सोहळा

– दिंडी क्रमांक तीन मधील वारकऱ्यांच्या सेवेत सर्वधर्मीयांचा सहभाग

 

Palkhi Sohala 2026 – (The Karbhari News Service) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांनी पुरस्‍िथती पाहता थेट आळंदी-देहू येथे न जाता पुण्यात मुक्काम करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील दिंडी क्रमांक तीनचे वारकरी पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनमधील त्रिरत्न बुद्ध विहारात मुक्कामाला सोमवारी (दि. ६) दाखल झाले आहेत. या मुक्कामाच्या निमित्ताने परिसरात सर्वधर्मसमभाव, सामाजिक ऐक्य आणि मानवतेचा प्रेरणादायी संदेश अनुभवायला मिळत आहे.

त्रिरत्न बुद्ध विहारात मुक्कामादरम्यान वारकऱ्यांनी बुद्धांच्या विचारांना अभिवादन करत शिस्त, संयम आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचे पालन केले. शांतता, स्वच्छता आणि परस्पर आदर या मूल्यांचे जतन करत त्यांनी विहारातील नियमांचे पालन केले. तथागत बुद्धांना नमन करून वारकरी आपल्या आध्यात्मिक प्रवासाला पुढे जाणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या मुक्कामासाठी पुणे महापालिकेच्या नगरसेविका सौ नंदिनी सिद्धार्थ धेंडे यांनी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच हिंदू संस्कृती मंचचे अध्यक्ष दिलिपराव मह्स्के , ह भ प हरिभाऊ दौंडकर, वारकरी संप्रदायातील प्रमुख कार्यकर्ते, त्रिरत्न संघ चे प्रमोद साळवी , अशोक गायकवाड व ईतर सभासद , महिला मंडळ अध्यक्ष मालतीबाई धिवार ,शोभा कांबळे, अश्विनी भालेराव, शेटे आजी , प्रेरणा जेष्ठ नागरिक संघ चे कैलास रणपिसे व सहकारी तसेच हमारी तंजिम मश्जिद चे मौलाना , यासिन भाई , हानिफ भाई व सहकारी आणि स्थानिक नागरिकांनी समन्वय साधून वारकऱ्यांच्या निवास, भोजन, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि इतर आवश्यक सोयींची उत्तम व्यवस्था केली.

या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विविध धर्मीय नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. परिसरातील नागरिकांनी मनापासून भोजन, नाश्ता आणि अन्य सेवांची जबाबदारी स्वीकारली. स्थानिक मशिदीचे मौलाना आणि विश्वस्तांनीही वारकऱ्यांच्या सोयीसाठी आवश्यक सहकार्य करून बंधुभावाचा आदर्श घालून दिला. विविध धर्मांचे अनुयायी एकत्र येऊन वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढे सरसावल्याने प्रभाग क्रमांक दोनमध्ये सामाजिक ऐक्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. ६ जुलै रोजी दिंडीतील वारकरी पुण्यात दाखल झाले असून ११ जुलैपर्यंत त्यांचा मुक्काम येथे राहणार आहे. त्यानंतर ते पुढील प्रवासासाठी रवाना होणार असून, त्यांच्या सेवेसाठी स्थानिक नागरिकांचा उत्साह कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.


वारकरी परंपरा ही मानवता, समानता, बंधुभाव आणि सेवाभावाची शिकवण देणारी परंपरा मानली जाते. याच मूल्यांचा प्रत्यय या मुक्कामाच्या निमित्ताने आला. समाजात धार्मिक सलोखा आणि परस्पर विश्वास दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे आहे. तथागत भगवान बुद्धांच्‍या विचारांशी साम्य असलेली वारकरी परंपरा आहे. त्‍यामुळे त्‍यामध्ये प्रभागातील नागरिकांनी सहभाग घेतला.

डाॅ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: