PMC Sanas Ground | सणस मैदानावर फक्त २० प्रशिक्षकांनाच प्रवेश! दरमहा १५ हजार भाडे, ३ वर्षांची नियुक्ती  | क्रीडा विभागाचे नवे धोरण 

PMC Sanas Ground | सणस मैदानावर फक्त २० प्रशिक्षकांनाच प्रवेश; दरमहा १५ हजार भाडे, ३ वर्षांची नियुक्ती

Homeadministrative

PMC Sanas Ground | सणस मैदानावर फक्त २० प्रशिक्षकांनाच प्रवेश! दरमहा १५ हजार भाडे, ३ वर्षांची नियुक्ती | क्रीडा विभागाचे नवे धोरण 

Ganesh Kumar Mule Nov 07, 2026 8:35 AM

Pune Property Tax | PT-3 application deadline is 30th November | Relief for Pune residents
Town planning shceme | वडगावशेरीत होणार टीपी स्कीम! लवकरच इरादा जाहीर केला जाणार
Har Ghar Tiranga | महापालिका खरेदी करणार 5 लाख तिरंगा ध्वज! | 85 लाखांचा येणार खर्च | मेडिकल कॉलेजच्या कामातून  वर्गीकरण केले जाणार 

PMC Sanas Ground | सणस मैदानावर फक्त २० प्रशिक्षकांनाच प्रवेश! दरमहा १५ हजार भाडे, ३ वर्षांची नियुक्ती

| क्रीडा विभागाचे नवे धोरण

 

PMC Sport Committee – The Karbhari News Service –  सारसबागेजवळील कै. बाबुराव सणस मैदानावरील ४०० मीटर, ८ लेन सिंथेटिक ट्रॅक आणि अॅथलेटिक्स मैदान कोण, कसे आणि किती शुल्कात वापरू शकेल, याचे नवे धोरण महापालिकेच्या क्रीडा विभागाने तयार केले आहे. त्यानुसार दोन सत्रांत मिळून फक्त २० प्रशिक्षकांना सरावासाठी मैदान दिले जाईल. त्यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी असेल आणि प्रत्येकाला दरमहा १५,००० रुपये भाडे व १५,००० रुपये अनामत भरावी लागेल. महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव क्रीडा समिती समोर ठेवला आहे. तो क्रीडा समितीमार्फत स्थायी समिती आणि  मुख्य सभेच्या मान्यतेसाठी जाणार आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

पालिकेने २००६ मध्ये सारसबागेच्या शेजारी ७ एकर जागेत हे मैदान विकसित केले. शहराच्या केंद्रस्थानी अॅथलेटिक्ससाठी हा पहिला आणि एकमेव ४०० मीटर आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक आहे. लांब उडी, तिहेरी उडी, उंच उडी, भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक, पोल व्हॉल्ट आणि स्टीपल चेज यांसाठी स्वतंत्र जागा आहेत. स्पर्धेच्या काळात खेळाडूंसाठी होस्टेल, बॅडमिंटन हॉल आणि टेबल टेनिस हॉलही आहे. रोज सकाळ-संध्याकाळच्या सत्रात सुमारे ७०० खेळाडू सराव करतात. प्रेक्षक क्षमता १,००० आहे. मैदानावर यापूर्वी दोन वेळा एशियन ग्रँड प्रिक्स स्पर्धा झाली आहे.

ट्रॅकला २०१६ मध्ये दहा वर्षे पूर्ण झाल्याने तो दुरुस्तीयोग्य राहिला नव्हता. भवन विभागाने २०२१ मध्ये नूतनीकरण सुरू केले आणि मे २०२३ मध्ये पूर्ण केले. ट्रॅकच्या आतील जागेत लॉन बसवून प्रत्येक खेळप्रकारासाठी स्वतंत्र प्लॉट केले. २७ मे २०२३ रोजी मैदानाचे उद्घाटन झाले.

भाडेतत्त्वाचा प्रयत्न फसला, सराव मोफत झाला

नूतनीकरणानंतर मैदान प्रशिक्षणासाठी भाडेतत्त्वावर चालवायला देण्यासाठी क्रीडा विभागाने प्रक्रिया सुरू केली. त्यात पात्र ठरलेल्या इन्व्हेंचर अकॅडमी ऑफ स्पोर्ट्स अँड रिसर्च फाउंडेशनने करारनाम्यासाठी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे १ जुलै २०२५ पासून मैदान आणि ट्रॅक खेळाडूंना विनामूल्य सरावासाठी उपलब्ध करून देण्यात आला. आयुक्तांच्या ठराव क्र. ६/८४६ (३१ जानेवारी २०२४) अन्वये मान्य नियमावलीनुसार मैदान वापरले जात आहे.

अतिवापराने ट्रॅकचे नुकसान

पत्रानुसार, मैदानावर क्षमतेपेक्षा जास्त खेळाडू सराव करत असल्याने सिंथेटिक ट्रॅक काही प्रमाणात खराब होऊ लागला. शहरात सिंथेटिक ट्रॅक आणि अॅथलेटिक्सचे सर्व खेळप्रकार असलेले हे एकमेव मैदान असल्याने मागणी मोठी आहे. मात्र ट्रॅक आणि मैदान खराब असल्याने संघटनांनी वरिष्ठ स्तरावरील स्पर्धा घेण्यास असमर्थता दाखवली. त्यामुळे बहुतांश स्पर्धा बालेवाडीच्या शिव छत्रपती क्रीडा संकुलात झाल्या.

प्रशिक्षकांसाठी नवे नियम

वेळा : सकाळी ६ ते ९ आणि दुपारी ४ ते ७ ही सरावाची सत्रे आहेत. प्रत्येक सत्रात १० प्रशिक्षक, म्हणजे दोन सत्रांत २० प्रशिक्षक. क्रीडा विभाग अर्ज मागवून शैक्षणिक पात्रता व अर्हतेनुसार निवड करेल.
मुदत : नियुक्ती निवडीच्या दिनांकापासून ३ वर्षांसाठी. पहिल्या वर्षात कोणत्याही कारणाने प्रशिक्षण सुरू ठेवण्यास नकार दिल्यास अनामत रक्कम परत मिळणार नाही. रिकाम्या जागी नेमलेल्या प्रशिक्षकाला उर्वरित कालावधीच मिळेल.
प्रशिक्षणार्थी : एका प्रशिक्षकाकडे एका सत्रात ३० प्रशिक्षणार्थी (१० वर्षे पूर्ण व पुढील वयोगट).
पात्रता : यापैकी एक आवश्यक : स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाची अॅथलेटिक्समधील पदविका (NIS), मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धांतील प्राविण्य/सहभाग असलेला खेळाडू, किंवा लेव्हल-२ कोर्स प्रमाणपत्र.
कागदपत्रे : अर्हतेची साक्षांकित कागदपत्रे, ओळखपुरावा, सरकारी नोकरीत असल्यास संस्थेचा परवानगी दाखला, मैदानात पूर्णवेळ हजर राहण्याचे व सहायक प्रशिक्षकांचे प्रतिज्ञापत्र, दुखापत/अपघाताची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारल्याचे आणि माहिती खरी असल्याचे प्रतिज्ञापत्र.

भाडे : एका सत्रासाठी दरमहा १५,००० रुपये भाडे आणि गाळ्याचे १,५०० रुपये, म्हणजे एकूण १६,५००. दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत भाडे न भरल्यास पुढील तारखेपासून सराव बंद. एक महिन्याचे भाडे म्हणजे १५,००० रुपये अनामत आधी जमा करावी लागेल. शुल्कात दर तीन वर्षांनी २० टक्के वाढ होईल.

नुकसान आणि गाळे : मैदानाचे नुकसान झाल्यास ते अनामतीतून वसूल केले जाईल. रक्कम अपुरी पडल्यास प्रशिक्षकाला जादा रक्कम भरावी लागेल. गाळे मागणीनुसार देतील, ते फक्त क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी वापरायचे. पोटभाड्याने दिल्यास ताबा काढून घेतला जाईल. प्रशिक्षण संपल्यावर साहित्य काढल्यानंतरच अनामत परत मिळेल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: