Naval Kishore Ram IAS | जनगणना कामी रुजू न झालेल्या पर्यवेक्षक व प्रगणक यांच्यावर फौजदारी तसेच निलंबनाची कारवाई करण्यात येणार |  नवल किशोर राम 

Homeadministrative

Naval Kishore Ram IAS | जनगणना कामी रुजू न झालेल्या पर्यवेक्षक व प्रगणक यांच्यावर फौजदारी तसेच निलंबनाची कारवाई करण्यात येणार |  नवल किशोर राम 

Ganesh Kumar Mule Jun 02, 2026 9:28 PM

Good or Bad Loan | कर्ज देखील चांगले आणि वाईट असते |  तुम्हाला फरक माहित आहे का | कर्ज घेण्यापूर्वी हे जाणून घ्या! 
Merged 23 Villages DP | समाविष्ट २३ गावांना न्याय द्या : माजी नगरसेवकांची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी
The trainee plane crashed | शिकाऊ विमान इंदापूर जवळ कोसळले 

Naval Kishore Ram IAS | जनगणना कामी रुजू न झालेल्या पर्यवेक्षक व प्रगणक यांच्यावर फौजदारी तसेच निलंबनाची कारवाई करण्यात येणार |  नवल किशोर राम

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी आज अण्णाभाऊ साठे सभागृह येरवडा या ठिकाणी जनगणना अधिकारी, चार्ज अधिकारी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेऊन जनगणना कामकाजाची सविस्तर समीक्षा केली. यावेळी जनगणना प्रक्रिये दरम्यान येणाऱ्या अडचणी, मनुष्यबळाची उपलब्धता, प्रलंबित कामे तसेच नागरिकांपर्यंत पोहोचताना निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. (Pune Census News)

बैठकीत आयुक्तांनी जनगणना कार्यास सर्वोच्च प्राधान्य देत दिनांक १४ जून पूर्वी जनगणना कामकाज शंभर टक्के पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. ज्या कर्मचाऱ्यांनी अद्याप जनगणना कार्यात सहभाग नोंदविला नाही अथवा नियुक्तीनंतर कामकाज सुरू केलेले नाही, त्यांनी तातडीने संबंधित चार्ज अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कार्यात सहभागी व्हावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी आयुक्तांनी जनगणना अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येक प्रभागातील जनगणना कामकाजाच्या प्रगतीचा दररोज आढावा घेण्याच्या सूचना दिल्या. क्षेत्रीय स्तरावर उद्भवणाऱ्या अडचणींची नोंद करून त्यावर तातडीने उपाय योजना करणे, नागरिकांना जनगणनेचे महत्त्व समजावून सांगून त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे, तसेच जनगणना नोंदी अचूक, पारदर्शक आणि त्रुटीरहित राहतील याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले.

तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परस्पर समन्वयातून काम करून उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे. कोणत्याही तांत्रिक अथवा प्रशासकीय अडचणी असल्यास त्या त्वरित वरिष्ठांच्या निदर्शनास आणून त्यावर मार्ग काढावा, असेही आयुक्तांनी नमूद केले.

बैठकी दरम्यान अधिकाऱ्यांनी विविध अडचणी व सूचना मांडल्या. त्यावर आयुक्तांनी आवश्यक त्या प्रशासकीय मदतीची ग्वाही देत संबंधित प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी आयुक्तांनी जनगणना हे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य असल्याचे सांगत त्याच्या यशस्वी अंमलबजावणी साठी सर्वांनी जबाबदारीने व समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन केले. १४ जूनपूर्वी सर्व प्रलंबित कामे पूर्ण करून जनगणना कार्य यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी संपूर्ण यंत्रणेने एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. जनगणना कार्यात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा अथवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नसून संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

तसेच, ज्या प्रगणक (Enumerator) व पर्यवेक्षक (Supervisor) यांनी नेमून दिलेल्या कर्तव्यावर हजर राहण्यास टाळाटाळ केली किंवा जनगणना कार्यात सहकार्य केले नाही, त्यांच्याविरुद्ध जनगणना अधिनियम, १९४८ अन्वये फौजदारी कारवाई करून विभागीय चौकशी करण्याचे आदेश संबंधित कार्यालय प्रमुखांना देण्यात येतील. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांच्या या बाबींची नोंद त्यांच्या गोपनीय अहवालात (Confidential Report) करण्यात येणार असून त्याबाबत शासनालाही कळविण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले तसेच ज्या प्रगणकांनी स्वतःहून दोन enumeration block चे काम केले आहे त्यांचे मा. आयुक्त यांनी अभिनंदन केले. नागरिकांनी प्रगणकाचे ओळखपत्र पाहून अचूक माहिती देऊन जनगणना कामी सहकार्य करावे अन्यथा कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नये असे आवाहन केले.

या प्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त(विशेष)  ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त  विजय लांडगे, उपायुक्त आशा राऊत, उपायुक्त विजयकुमार थोरात, उपायुक्त  अरविंद माळी, उपायुक्त  तुषार बाबर, तसेच सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त,अधिकारी, कर्मचारी, सुमारे ५०० पर्यवेक्षक व प्रगणक उपस्थित होते.

दरम्यान, एक सहाय्यक आयुक्त तथा चार्ज अधिकारी यांनी जनगणना कामकाजात हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: