The Karbhari 5th Anniversary | शब्दांची मशाल हाती घेऊन उजळूया उद्याची पहाट! | “The कारभारी” च्या वाचकांना ५ व्या वर्धापनदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!  

Homeसंपादकीय

The Karbhari 5th Anniversary | शब्दांची मशाल हाती घेऊन उजळूया उद्याची पहाट! | “The कारभारी” च्या वाचकांना ५ व्या वर्धापनदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!  

Ganesh Kumar Mule Jul 31, 2026 11:15 PM

Pune News | श्रीमंत केसरी प्रतिष्ठान आयोजित विश्वातील पहिली पुणे जिल्हास्तरीय शंखवादन स्पर्धा यशस्वीपणे संपन्न!
How to Prevent Diabetes | जर तुम्हाला मधुमेह नसेल तर ते चांगलेच आहे | मात्र भविष्यात तो टाळण्यासाठी ही पावले उचला
Special Article | Welcome to Indore : इंदौर हे देशातलं सगळ्यात स्वच्छ शहर का आहे?

The Karbhari 5th Anniversary | शब्दांची मशाल हाती घेऊन उजळूया उद्याची पहाट! | “The कारभारी” च्या वाचकांना ५ व्या वर्धापनदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

 

प्रिय वाचकांनो,

आज दिनदर्शिकेवरची आणखी एक तारीख नाही. आज ‘The Karbhari’ या शब्दव्रताला अर्थात वृत्तसंस्थेला  पाच वर्षे पूर्ण होत आहेत. चार वर्षे आपण एकत्र चाललो, पायवाटा झिजवल्या, अडचणींच्या फाट्यांवरून वाट काढली आणि आज पाचव्या वर्षाच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहिलो आहोत. आता आपण ६ व्या वर्षात पदार्पण करत आहोत. एका छोट्या रोपट्याला माती, पाणी, ऊन आणि वारा लागतो तसेच या वाटचालीला तुमचा विश्वास, तुमचा राग, तुमची दाद आणि तुमचा पाठिंबा लागला.  न डगमगणारे,  ताठ उभे राहणारे आणि सावली देणारे ते वटवृक्ष होण्याच्या प्रवासातील प्रत्येक पाऊल तुमच्या साक्षीनेच उचलले गेले. (The Karbhari News)

कोणतीही संस्था केवळ ऑफिस, कॅमेरा किंवा प्रिंटिंग प्रेसमुळे मोठी होत नाही. तिचा पाया असतो तो लोकांच्या मनात. लोकाधार हे आमचे केवळ ब्रीदवाक्य नाही, तर दररोजच्या कामातील नीती आहे. जेव्हा एखादी संस्था सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरते, सत्यासाठी थांबते आणि समाजासाठी बोलते, तेव्हाच ती घराघरात पोहोचते.

The Karbhari’ ने सुरुवातीपासून तीन गोष्टी पाळल्या. समतोल, संतुलित मांडणी आणि सकारात्मक दृष्टी. गदारोळातही आम्ही आवाजाची पातळी सांभाळली. सनसनाटीऐवजी संदर्भ दिला. टीकेसोबत तोडगाही सुचवला. म्हणूनच तुम्ही आम्हाला फक्त माध्यम म्हणून नव्हे, तर आपला म्हणून स्वीकारले. हेच आमचे खरे भांडवल आहे.

आजच्या काळात पत्रकारिता हा शब्दच अनेकदा प्रश्नचिन्ह बनला आहे. बातमीच्या नावाखाली भीती, निराशा आणि नकारात्मकतेचा बाजार मांडला जातो. क्लिकसाठी मथळे मोठे होतात, पण माणसाच्या जगण्याचे प्रश्न छोटे राहतात. अशा वेळी माणसाला तरीही आपल्या गल्लीत, प्रभागात, शहरात काय घडतेय हे समजून घ्यायचे असते. त्याला हवी असते ती वस्तुनिष्ठ, आधार देणारी आणि उपयोगाची माहिती.

म्हणूनच ‘The Karbhari’ ने वेगळी वाट निवडली. केवळ बातमी देण्यासाठी बातमी नव्हे, तर लोकहितासाठी बातमी. जे वाचणे आवश्यक आहे, जे समजल्याशिवाय निर्णय होऊ शकत नाही, तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवले. प्रशासकीय फाइलमध्ये अडकलेला प्रश्न बाहेर काढला, अधिकाऱ्यांच्या टेबलापर्यंत नेला आणि त्याचा पाठपुरावा केला. म्हणूनच आज तुम्ही आमच्याकडे आश्वासक चेहरा म्हणून पाहता. ही तुमची पावती आमच्यासाठी शिदोरी आहे.

लोकशाहीचा रथ सुरळीत चालावा म्हणून नोकरशाही, न्यायव्यवस्था आणि लोकप्रतिनिधी ही तीन चाके आहेत. आणि या तिन्हींवर लक्ष ठेवण्यासाठी चौथा स्तंभ उभा केला गेला. आज तो स्तंभ अनेक ठिकाणी डळमळतो आहे. अशा वेळी आम्ही जबाबदारी अंगावर घेतली. फक्त प्रश्न विचारून थांबलो नाही, तर त्याच्या उत्तरापर्यंत गेलो. तक्रारीसोबत पुरावा दिला, समस्येसोबत उपायही मांडला.

गेल्या पाच वर्षांत आम्ही पुणे महापालिकेतील पाणी, रस्ते, कचरा, वाहतूक या रोजच्या प्रश्नांपासून ते पीएमपी, पुणे स्मार्ट सिटी, पीएमआरडीएच्या मोठ्या योजनांपर्यंत आवाज उठवला. एखाद्या प्रभागात गटार तुंबले असेल, शाळेच्या आवारात झाड पडले असेल, किंवा  कर्मचाऱ्यांचा प्रश्न असेल, आम्ही ते केवळ छापले नाही. त्यासाठी प्रशासनाच्या दारात खटखट केली, संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो आणि पाठपुरावा करून उत्तर मिळवले.
तुमची समस्या ही आमची समस्या, ही भावना आम्ही जपली. त्यामुळेच आज हजारो पुणेकर आपला आवाज म्हणून आमच्याकडे पाहतात. फोनवर येणारा एक मेसेज, सोशल मीडियावरील एक तक्रार आमच्यासाठी फक्त बातमी नसते, ती कोणाच्या तरी घराची अडचण असते, हे आम्हाला माहीत आहे.

पाचवे वर्ष म्हणजे प्रगल्भतेचे वर्ष. या वर्षात आम्ही कामाचा आवाका वाढवणार आहोत. ग्राउंड रिपोर्टिंग अधिक बळकट करणार, डेटा आणि दस्तऐवजांच्या आधारे बातम्या मांडणार आणि प्रशासनाला उत्तरदायी धरण्यासाठी पाठपुरावा अधिक तीव्र करणार. शब्दांची मशाल हात घेऊन आम्ही अंधारातील प्रश्न उजळू. लोकांच्या आवाजाला व्यासपीठ देऊ आणि सत्तेला जाब विचारू.
ही वाट एकट्याने चालण्याची नाही. ही वाट आहे तुमची आणि आमची, एकत्र चालण्याची. तुमचा पाठिंबा, तुमची टीका आणि तुमचे सहकार्य हेच आमचे इंधन आहे.

शेवटी एवढेच सांगावेसे वाटते.
पत्रकारिता म्हणजे फक्त बातम्या देणे नाही, तर समाजाला दिशा देणे आहे. अंधारात वाट दाखवणारा दिवा होणे आहे. आणि ती दिशा दाखवण्याचे व्रत आम्ही अधिक ताकदीने, अधिक निष्ठेने पेलणार आहोत.

तुम्हा सर्व वाचकांना, हितचिंतकांना, जाहिरातदारांना आणि सहकाऱ्यांना ५ व्या वर्धापनदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

चला, शब्दांच्या ताकदीने उद्याची पहाट अधिक उजळ करूया!

 

मुख्य संपादक

The Karbhari

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: