PMC Asha Workers | आशा वर्कर्स यांचे वेतन देण्यात महापालिका आरोग्य विभागाकडून सातत्याने विलंब!

HomeBreaking Newsपुणे

PMC Asha Workers | आशा वर्कर्स यांचे वेतन देण्यात महापालिका आरोग्य विभागाकडून सातत्याने विलंब!

गणेश मुळे May 20, 2024 6:30 AM

Pune Municipal Corporation’s ranking in health schemes has moved from 4th to 3rd
PMC Health Department | कायाकल्प प्रकल्पात पुणे महानगरपलिका सर्वोत्कृष्ट
PMC Pune Health Schemes |  Pune Municipal Corporation’s ranking improved in health schemes

PMC Asha Workers | आशा वर्कर्स यांचे वेतन देण्यात महापालिका आरोग्य विभागाकडून सातत्याने विलंब!

| कामगार विभागाकडे तक्रार करण्याचा संघटनेचा इशारा

PMC Health Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे (Pune Municipal Corporation Health Department) विविध प्रकारची कामे करणाऱ्या आशा वर्कर्स यांचे वेतन वेळेवर होताना दिसत नाही. बऱ्याच महिन्यापासून तक्रारी करून देखील यात सुधारणा होत नाही. महापालिकेच्या भांडारकर रोडवरील आरोग्य कार्यालयाच्या (PMC Bhandarkar Road Office) उदासीनतेमुळे हा विलंब होतो आहे. अशी तक्रार करत वेळेवर वेतन न झाल्यास आशा वर्कर्स युनियन (Asha Workers Union) ने कामगार विभागाकडे तक्रार करण्याचा इशारा महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांना दिला आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
पुणे महापालिकेच्या वतीने (Pune Municipal Corporation) केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विषयक योजना राबवण्यात येतात. यात विविध आरोग्य विषयक कार्यक्रमांचा समावेश असतो. यामध्ये खासकरून RCH (Reproductive And Child Health) आणि NUHM (National Urban Health Mission) योजनांचा समावेश आहे. यामध्ये RCH हे 2006-07 पासून तर NUHM हे 2016 पासून राबवण्यास सुरुवात करण्यात आली. यातील बरीचशी कामे ही आशा वर्कर्स करत असतात. त्याबदल्यात त्यांना वेतन दिले जाते. मात्र हे वेतन वेळेवर होत नाही. वेतन हे कधी महिन्याच्या 19 तारखेला तर कधी 23 तारखेला होते. यामुळे आशा वर्कर्स त्रस्त आहेत.
याबाबत युनियन ने आरोग्य प्रमुखांना याबाबत तक्रार केली आहे. युनियनच्या पत्रानुसार  RTI कायद्यांतर्गत फाइल इन्सपेक्शन केले असता असे दिसून येते की सर्व डेटा जमा झाल्यानंत  भांडारकर रोड कार्यालयातून संबंधित कर्मचारी यांना फाइल तयार करायला विलंब होतो. त्यानंतर संबंधित अधिकारी यांची सही झाल्यानंतर देखील प्रत्यक्षात पगाराचा तपशील बँकेत पाठवण्यासाठी वेळ लागतो. याची नेमकी कारणे शोधून काढून दुरुस्त करून आशा वर्कर यांचा पगार एन.एच.एम. च्या इतर कर्मचारी वर्गा प्रमाणे वेळेवर काढण्यात यावा अशी आमची मागणी आहे. अन्यथा आम्हाला कामगार विभागाकडे तक्रार करावी लागेल. असा इशारा युनियन ने दिला आहे.
युनियन ने पुढे म्हटले आहे कि, तसेच काही आशा वर्कर यांना पगार न मिळाल्याच्या काही व्यक्तिगत तक्रारी आहेत. त्यामागे आधार लिंक, बँक खात्याच्या अडचणी, वेळेवर रिपोर्ट देण्याच्या अडचणी, इत्यादि कारणे असताना, त्यांच्या समस्यांचे वेळच्या वेळी योग्य निराकरण होण्याची गरज आहे. परंतु संबंधित कर्मचारी वर्गांकडून दुर्लक्ष होताना दिसते. त्यांचे फोन घेतले जात नाहीत, मेसेज टाकले तर उत्तरे मिळत नाहीत. आशा वर्कर यांनी स्वतः पाठपुरावा केला तर त्यांना उद्धटपणे उत्तरे देऊन गप्प केल्याचे प्रकार ऐकायला मिळतात. एक आशा वर्करला एका कर्मचाऱ्याने “मग मी काय आत्महत्या करु का?” असा प्रतिप्रश्न केला गेला. ही गंभीर बाब असून, अशा वागणुकीमुळे आशा वर्कर यांच्या मध्ये खूप असंतोष आहे. आरोग्य प्रमुखांनी यात लक्ष घालून त्यांना समज द्यावी, अन्यथा संघटनेला आंदोलन करून ही वागणूक दुरुस्त करावी लागेल असा इशारा संघटनेने दिला आहे.
राज्य सरकारचा मोबदला विलंबाने आणि कपात करून मिळत असण्याबाबत तसेच राज्य सरकार आशा वर्कर यांना दर तीन महिन्याचे एकत्रित मोबदला १५००० देत असते. हे देखील वेळेवर मिळत नाही. उदा. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ साठी मोबदला देण्याचा राज्य सरकारचा ९/१० जानेवारी २०२४ चा आदेश महापालिकेकडे २३ जानेवारी २०२४ रोजी इनवर्ड झाला आहे. तरी त्याचे प्रत्यक्ष पेमेंट ३० मार्च २०२४ रोजी आशा वर्कर यांना प्राप्त झाले आहे. तसेच जानेवारी ते मार्च २०२३ चे पेमेंट देण्याचे आदेश १५ मार्च २०२४ रोजी काढण्यात आला आहे. तो अद्याप मिळालेला नाही, आणि भांडारकर रोड कार्यालयात विचारणा केली असता ते कधी मिळेल याचे समाधानकारक उत्तर संबंधित कर्मचारी यांच्या कडून मिळत नाही. तसेच या मानधनातून अनेक आशा वर्कर यांचा मोबदला कपात करून मिळतो. त्याची लेखी कारणे मिळायला हवीत. काही आशा वर्कर यांनी विचरणा केली तरी संबंधित कर्मचारी त्याचा तपशील देण्यास टाळा टाळ करतात.
आशा वर्कर यांना उदरनिर्वाहासाठी कामावर आधारित मोबदला मिळतो. अनेकांची कुटुंब त्या पैशावरचालतात हे लक्षात घेऊन, ते महिन्याच्या ५ तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावेत अशी आमची मागणी आहे. असे संघटनेने म्हटले आहे. तसेच अन्यायकारक कपात करू नये. यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आरोग्य प्रमुख या नात्याने स्वतः लक्ष घालून सुधारणा करण्यासाठी पावले उचलवीत. अशी मागणी करण्यात आली आहे.
—-

भांडारकर रोड कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मक्तेदारी!

NUHM चे काम करण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाने स्वतंत्र कर्मचारी वर्ग नेमला आहे. या कर्मचाऱ्यांना भांडारकर रोड वरील महापालिकेच्या मालकीच्या कार्यालयात जागा देण्यात आली आहे. त्यांच्यावर नियंत्रण आरोग्य अधिकारी यांचे असते. मात्र इथल्या कर्मचाऱ्यांनी आपलीच मक्तेदारी केली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांचे आदेश देखील हे लोक पाळत नाहीत. यामुळे अधिकारीच त्रस्त आहेत. विशेष म्हणजे महापालिका भवन पासून हे कार्यालय दूर असल्याने इथल्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला होता. मात्र हा कॅमेराच फोडण्यात आला आहे. तो सद्यस्थितीत बंद आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. इथल्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येण्याची स्वतःची वेळ ठरवून घेतली आहे. शिवाय सुट्ट्या देखील आपल्याच मनाप्रमाणे घेतात. यामुळे आशा वर्कर्स यांना उशिरा वेतन तर मिळतच आहे; पण यामुळे NUHM च्या कामकाजावर परिणाम होत आहे. पर्यायाने शहराची आरोग्य व्यवस्था धोक्यात आली आहे. त्यामुळे मक्तेदारी तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करायला हवी. अशी मागणी करण्यात येत आहे.