सलग तीस वर्षे नगरसेवक!
: कार्यसम्राट आबा बागुल!
: तीन दशके लोकसेवेची
पुणे: पुणे महानगरपालिका काँग्रेस पक्ष गटनेते उल्हास ऊर्फ आबा बागुल यांचा 13 सप्टेंबर हा जन्मदिन! पुणे महानगरपालिकेत तब्बल गेली तीस वर्षे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक म्हणून निवडून येणारे आबा बागुल हे लौकिक अर्थाने विक्रमवीरच मानावे लागतील. 1992 मध्ये एकसदस्यीय वॉर्ड असताना ते प्रथम शिवदर्शन भागातून निवडून आले. त्यानंतर दोन, तीन अथवा चार सदस्यीय प्रभाग झाले. मतदारसंघ बदलत गेले तरी आबा बागुल प्रत्येक वेळी मताधिक्य वाढवत निवडून येत राहिले. ही कौतुकाची बाब आहेच शिवाय सलग तीस वर्षे मतदारांच्या हृदयात स्थान कायम टिकवणे अतिशय अवघड असते तरीही आबा बागुलांनी ते साध्य केलं. त्यातूनच या कार्यसम्राट लोकसेवकाचे वेगळेपण उठून दिसते.
: 1992 मध्ये झाले पहिल्यांदा नगरसेवक
1992 मध्ये प्रथम नगरसेवक झालेले आबा बागुल गेल्या तीस वर्षांत केवळ लोकसेवक राहिले नाहीत, तर लोकनेते बनले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक अशा प्रत्येक क्षेत्रात ते मनापासून काम करीत राहिले. आवडीने काम करीत राहिले. पुणे महानगरपालिकेचा अंदाजपत्रकाचा अतिशय बारकाईने अभ्यास करून पुणे शहराच्या विकासाला योग्य दिशा आणि गती देण्यासाठी ते सदैव झटत राहिले. किंबहुना सभागृहात त्यांना सुरुवातीच्या काळात ‘उंबराचे फूल’ असे संबोधले जायचे. म्हणजे उंबराचे फूल जसे वर्षातून एकदा फुलते तसे आबा बागुल सभागृहात वर्षात एकदोनदाच बोलायचे असा सुरुवातीला उल्लेख व्हायचा. आता मात्र आबा बागुलांच्या भाषणाशिवाय सभागृहाचे कामकाजच पूर्ण होत नाही असे म्हटले जाते. पुण्यातल्या वृत्तपत्रांमध्ये सर्वाधिक बातम्या असणारा नगरसेवक ही त्यांची नवी ओळख त्यातूनच तयार झाली यात नवल ते काय! खासदार सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वाखाली 1992 पासून काँग्रेस पक्षाकडे पुणे महानगरपालिकेची सत्ता राहिली. आबा बागुलांचीदेखील नगरसेवक म्हणून ही पहिलीच टर्म होती. मात्र, अतिशय अभ्यासू आणि जनतेत मिसळून त्यांच्या नागरी हिताची कामे करण्याचा सपाटा लावण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे अल्पावधीतच ते नेत्यांच्या आणि जनतेच्याही गळ्यातले ताईत बनले. तेव्हा पहाटे सहा वाजता शिवदर्शन वॉर्डात अनवाणी फिरणारे कदाचित ते एकमेवच नगरसेवक होते. याबद्दल विचारले असता ते हसून म्हणायचे, ‘महानगरपालिकेचे काम रस्ते व परिसर साफ व स्वच्छ ठेवण्याचे आहे. जर माझ्या परिसरातील रस्त्यांवर कचरा व घाण पडली असेल म्हणजेच ते झाडून स्वच्छ केले नसतील तर ती घाण माझ्याच पायाला लागेल’. त्यांच्या या अनवाणी फेरफटक्यामुळे त्यांचा सारा परिसर सदैव स्वच्छ व कचरारहित राहिला हे वेगळे सांगायला नकोच!
आबा बागुलांचा स्वभाव अतिशय दिलदार आणि लोकांसाठी झटून काम करण्याचा! त्यांच्या पहिल्या शिवदर्शन वॉर्डमध्ये रस्त्यांचे डांबरीकरण, घरोघरी पाणी, दुमजली शौचालय, रस्त्यांवर दिवाबत्ती, उत्तम ड्रेनेज व्यवस्था, बसायला बाके अशी सगळी नागरी सुविधांची कामे पुढील दहा-पंधरा वर्षांचा विचार करून त्यांनी पूर्ण करून घेतली होती. त्यामुळे अनेक वर्षे महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकांमध्ये त्यांच्या वॉर्डात नवीन कामे टाकण्याची गरजच पडायची नाही.
: शिवदर्शन परिसरात सामाजिक काम
ज्या शिवदर्शन परिसरात ते रहात होते तेथे प्रथम त्यांनी सार्वजनिक नळकोंडाळी बंद केली आणि सार्या पूरग्रस्त वसाहतीत घरोघरी नळ कनेक्शन देऊन नागरिकांची पाण्याची फार मोठी सुविधा प्राप्त करून दिली. विशेष म्हणजे हेच मॉडेल पुढे शहरभर राबवले गेले आणि पुण्यातील बहुसंख्य भागांत सार्वजनिक नळकोंडाळी बंद होऊन घरोघरी पाण्याचे नळ व त्यातून स्वच्छ पाणीपुरवठा होत राहिला. एखादा नागरी प्रश्न सुटण्यासाठी महात्मा गांधींच्या अहिंसा, सत्याग्रह व आत्मक्लेश या तत्त्वांचा ते अंगीकार करायचे. स्वारगेट येथील जेधे चौक रुंदीकरणासाठी त्यांनी रस्त्याच्या बाजूलाच बसून उपोषण सुरू केले. त्यांचे हे उपोषण शहरात चर्चेचा विषय बनले. या उपोषणात त्यांची प्रकृतीही खालावली. मात्र, त्यांचा निर्धार पक्का होता. अखेर प्रशासनास जाग आली, त्यांनी धावपळ करून आबा बागुलांचे उपोषण लिंबू सरबत देऊन सोडवले आणि बघता बघता जेधे चौकाचे रुंदीकरण पूर्ण झाले. अन्यायाविरुद्ध लढणे हा तर त्यांचा स्थायीभाव! 2017 मध्ये काँग्रेस पक्षाला पुणे महानगरपालिकेत योग्य असे कार्यालय देण्यास चालढकल होऊ लागली तेव्हा त्यांनी चक्क महानगरपालिकेच्या हिरवळीवरच मांडव टाकून काँग्रेस पक्षाचे कार्यालय तिथे सुरू केले. त्यामुळेच अखेरीस महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाला योग्य असे कार्यालय प्रशासनाने दिले व हा विषय संपला. अन्यायाविरुद्ध लढताना अनेक सकारात्मक चांगल्या बाबींसाठीदेखील ते सदैव आग्रही राहिले व लक्षात राहतील असे उपक्रम व कार्यक्रम त्यांच्या हातून घडले.
1997 मध्ये त्यांच्या दुसर्या टर्ममध्ये ते पुणे महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष बनले. त्याच वर्षी पुणे महानगरपालिकेतर्फे त्यांनी ‘गुटखाविरोधी जनजागृती सप्ताह’ साजरा केला. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत आदरणीय बाळासाहेब भारदे आणि आबा बागुलांचे आध्यात्मिक गुरू उल्हासदादा पवार यांच्यासह मंडईत लोकमान्य टिळक पुतळा येथे गुटख्याची होळी करण्यात आली. वृत्तपत्रीय लेख, बीजे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांची पथनाट्ये, व्याख्याने, प्रदर्शने अशा विविध प्रकारे संपूर्ण एक आठवडा त्यांनी केलेले गुटखाविरोधी आंदोलन हा शहरात चर्चेचा विषय बनला. विशेष म्हणजे गुटखाविरोधी सप्ताह पाळून जनजागरण करणारी पुणे ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली. या उपक्रमाचे अनुकरण करून पुढे औरंगाबाद, ठाणे, मुंबई अशा अनेक महानगरपालिकांनी गुटखाविरोधी सप्ताह साजरे केले. महाराष्ट्रात त्यामुळे मोठे वातावरण निर्माण होऊन आरोग्यास अपायकारक असणार्या गुटख्यावर बंदीचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. त्याची सुरुवात आबा बागुलांनी केली ही महत्त्वाची बाब आहे.
: महापालिकेच्या माध्यमातुन भरीव काम
पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी साकारलेले अनेक प्रकल्प हे कायमस्वरूपी पुण्याचे वैभव ठरले असेच मानावे लागेल. कचर्याचे ढीग हलवून उभारलेले कै. वसंतराव बागुल उद्यान, नाला गार्डन, म्युझिकल फाउंटन, भारतरत्न स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी कलादालन, सेव्हन वंडर्स, फोर-डी थिएटर, स्केटिंग हॉल, साहित्यसम्राट विजय तेंडुलकर नाट्यगृह, फुलपाखरू उद्यान, वाळवेकर लॉन्स, विलासराव देशमुख तारांगण हे आणि असे असंख्य प्रकल्प पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी साकारले आणि हा सारा परिसर अक्षरश: नंदनवन केले, पर्यटन केंद्र बनवले.
गेल्या काही वर्षांमध्ये तळजाई टेकडीचा विकास व त्यावर उभारलेले क्रिकेटमहर्षी सदु शिंदे क्रीडांगण यामुळे हजारो तरुणांची खेळण्याची गरज भागली, तर सार्या सहकारनगर, पद्मावती, पर्वती, अरण्येश्वर, शिवदर्शन भागाला ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मिळू शकणारा व निसर्गाने नटलेला नियोजित ‘वसुंधरा प्रकल्प’ हादेखील त्यांच्या कारकिर्दीतील मानाचा तुरा ठरेल. देशात ज्या प्रकल्पाने लक्ष वेधून घेतले अशा राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल प्रकल्पाची संकल्पना सुमारे बारा वर्षांपूर्वी आबा बागुल यांनी मांडली आणि पुणे महानरगापालिकेच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्णही करून घेतला. यंदा त्याची दशकपूर्ती झाली. आपल्या देशाचे थोर सुपुत्र व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशात संगणक व दूरसंचार क्रांती आणली. त्यांचे स्मरण जतन करण्यासाठी देशभर मॉडेल बनलेल्या या शाळेला राजीव गांधींचे नाव देण्याचा ठराव आबा बागुलांनीच दिला. आज या शाळेत प्राथमिकपासून दहावीपर्यंत व पुढे ‘स्पेस’च्या साह्याने अकरावी व बारावीचे वर्ग यशस्वीपणे चालू असून, गरीब झोपडपट्टीतील पालकांची मुले येथे सीबीएसई अभ्यासक्रम इंग्रजीतून दप्तराविना शिकत आहेत. गेली दहा वर्षे शाळेचा निकाल शंभर टक्के लागत आहे. एवढेच नव्हे तर पुणे महानगरपालिकेच्या या शाळेतून स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊन आयआयटीसारख्या ठिकाणीदेखील गेले आहेत. या शाळेतील विद्यार्थी परदेशात अगदी ‘नासा’मध्ये देखील उच्च पदांवर काम करीत आहेत. पुण्यात आयएएस प्रशिक्षणार्थी, अमेरिकेतील शिक्षक, देशातील अनेक शिक्षणसंस्थांचे चालक, महाराष्ट्रातील अनेक आयुक्त, महापौर, शिक्षणप्रमुख, नगरसेवक सारेजण हे शैक्षणिक मॉडेल बघण्यासाठी येतात. यातच आबा बागुलांच्या कल्पक दूरदृष्टीची झलक दिसून येते.
: सामाजिक कामात अग्रेसर
काँग्रेस पक्षाचे गेली तीस वर्षे नगरसेवक म्हणून निवडून येत असलेले आबा बागुल पक्ष संघटनेत सदैव सक्रिय राहिले. मात्र, त्याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रांत ते महत्त्वपूर्ण योगदान देत राहिले. गेली 21 वर्षे चालू असलेली विनामूल्य काशीयात्रा हा नवा पायंडा त्यांनी पाडला. आतापर्यंत 50 हजारांहून अधिक वृद्ध माता-पित्यांना त्यांनी विनामूल्य काशीयात्रा घडवली. याबरोबरच रामेश्वर यात्रा, कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन यात्रा, अष्टविनायक, पाच ज्योतिर्लिंग अशा अनेक विनामूल्य यात्रा त्यांनी नागरिकांसाठी आयोजित केल्या. एका वेळी पन्नासहून अधिक लक्झरी बसेस घेऊन महाराष्ट्रात यात्रा करणारे एवढेच नव्हे तर स्पेशल ट्रेन करून काशीयात्रा घडविणारे आबा बागुल हे एकमेव राजकीय नेते असावेत. धर्मश्रद्धेचा राजकीय लाभासाठी वापर करणारे अनेक जण असतात. आबा बागुलांनी मात्र धर्मश्रद्धेला सामाजिकतेची जोड दिली. त्यामुळेच विनामूल्य काशीयात्रेबद्दल त्यांच्या प्रभागातील मतदारांव्यतिरिक्त सार्या महाराष्ट्रातून लोक नावनोंदणी करून सहभागी होतात आणि आबा बागुल आनंदाने त्या सर्वांना यात्रेला सुखरूप नेऊन आणतात हे त्यांचे मोठेपण आहे. यासंदर्भात त्यांना एकदा विचारले होते की विनामूल्य काशीयात्रेची प्रेरणा काय? यावर ते म्हणाले, माझी आई श्रीमती नलिनी बागुल यांच्यासह आम्ही कुटुंबीयांनी काशीयात्रा केली. श्री भोलेनाथाचे दर्शन घेऊन परतताना रेल्वेत आईने खंत व्यक्त केली की, ‘हजारो गरीब वृद्ध माता-पिता पैशाअभावी काशीत दर्शनासाठी येऊ शकत नाहीत. त्यांची इच्छा पूर्ण व्हायला हवी’ आईचे हे सांगणे हा आदेश आबा बागुलांनी मानला आणि आईला शब्द दिला की, ‘दरवर्षी मी या वृद्ध गरीब मातापित्यांसाठी विनामूल्य काशीयात्रा काढीन’ त्यांचा संकल्प आजही चालू आहे. यामुळेच त्यांना ‘श्रावणबाळ’ ही जनतेने उपाधी दिली हे योग्यच आहे. सांस्कृतिक क्षेत्रात गेली 27 वर्षे चालू असलेला पुणे नवरात्र महोत्सव हा पुणे शहराच्या सांस्कृतिक कॅलेंडरवरील महत्त्वाचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. सलग दहा दिवस चालणारा हा सांस्कृतिक महोत्सव त्यांनी 1994 मध्ये शिवदर्शन भागात उभारलेल्या भव्य दाक्षिणात्य पद्धतीच्या मंदिरातील श्री लक्ष्मीमाता चरणी अर्पित केला आहे. याचे उद्घाटन भारतरत्न स्वरभास्कर पं. भीमसेन जोशींनी केले. भारतरत्न स्वरसम्राज्ञी श्रीमती लता मंगेशकर यांनी तेथे पसायदान गायले आहे. शेकडो कलाकारांचे कार्यक्रम नवरात्राच्या दहा दिवस प्रथम शिवदर्शन येथे व नंतर श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे सर्वांसाठी विनामूल्य असतात. श्री लक्ष्मीमाता कलागौरव पुरस्कार आणि महर्षी पुरस्कार यामध्ये दिले जातात. प्रथमपासून सकाळी दहा ते रात्री बारा असा सलग बारा तासांचा लावणी महोत्सव हेदेखील या सांस्कृतिक महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.
त्यांच्या या कार्यात त्यांची पत्नी सौ. जयश्री बागुल त्यांना सावलीसारखी साथ देत असते. त्यांची मुले राहुल, अमित, कपिल व हेमंत तसेच त्यांचे भाचे, पुतणे सागर, अभिजित, तेजस, महेश हे सारे त्यांच्या पत्नी व कुटुंबांसह या सार्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यात मन लावून झोकून देऊन काम करीत असतात. आज लाखोंच्या हृदयात स्वत:चे स्थान प्रेमाने निर्माण करणारे आबा बागुल ‘कार्यक्षम नगरसेवक’ म्हणूनही गौरविले गेले आहेत. सदैव कार्यकर्त्यांमध्ये, मित्रांमध्ये आणि नागरिकांमध्ये रमणारे आबा बागुल म्हणजे ‘व्यक्ती एक : पैलू अनेक’ असेच मानावे लागेल. त्यांच्या 13 सप्टेंबर या जन्मदिनानिमित्त त्यांना अंत:करणपूर्वक शुभेच्छा!
COMMENTS