प्रभारी नगरसचिवांनी उगारला शिस्तीचा बडगा
: कामावर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना लावणार शिस्त
पुणे: महापालिकेतील नगरसचिव विभागातील कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा विडा महापालिकेचे प्रभारी नगरसचिव शिवाजी दौंडकर यांनी उचलला आहे. कामावर वेळेवर हजर राहण्यास सांगूनही वेळेवर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आज नगरसचिवांनी लक्ष केले. या लेटलतीफ कर्मचाऱ्यांना मस्टरवर सही करण्यापासून परावृत्त करण्यात आले. कर्मचाऱ्यांना शिस्त लागेपर्यंत हाच फंडा वापरला जाणार आहे, असे ही सांगण्यात आले.
: कर्मचारी झाले नाराज
महापालिकेची प्रशासकीय कामकाजाची सकाळी 9:45 ते सायंकाळी 6:15 अशी आहे. तर शिपाई लोकांसाठी ही वेळ सकाळी 9:30 ते सायं 6:15 अशी आहे. मात्र महापालिकेतील बऱ्याच विभागातील कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत मात्र प्रभारी नगरसचिव शिवाजी दौंडकर यांनी गंभीर पाऊल उचलले आहे. नगरसचिव विभागातील कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा चंग नगरसचिवांनी बांधला आहे. कारण कर्मचारी उशिरा येऊन लवकर जातात, अशी तक्रार त्यांना प्राप्त झाली होती. शिवाय काही कर्मचारी दुपारी गायब राहतात, असे ही समजले होते. त्यामुळे हे पाऊल उचलण्याचे त्यांनी ठरवले. त्याची सुरुवात बुधवार पासून झाली. सकाळी 10 नंतर कामावर आलेल्या एका ही कर्मचाऱ्याला मस्टरवर सही करू दिली नाही. विभागात जवळपास 70 ते 75 कर्मचारी आहेत. त्यातील फक्त 5-6 कर्मचारी वेळेवर उपस्थित होते. बाकी कुणालाही सही करता आली नाही. आगामी काही दिवस हाच उपक्रम चालणार आहे. मात्र या प्रकारामुळे कर्मचारी वर्गात नाराजी पसरली आहे. कर्मचाऱ्यांना जसा नियम आहे, तसाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील असावा, अशी चर्चा कर्मचारी वर्तुळात होती.
COMMENTS