Yoga Day बावधन-कोथरूडमध्ये नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या वतीने भव्य योग महोत्सवाचे आयोजन
International Yoga Day – (The Karbhari News Service) – जागतिक योग दिन म्हणजे भारताच्या प्राचीन परंपरेचा जागतिक गौरव. याच पावन दिनाचे औचित्य साधून बावधन-कोथरूड प्रभागातील नगरसेवक मा. दिलीप आण्णा वेडेपाटील यांच्या वतीने भव्य योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम बावधनमधील स्वामी विवेकानंद ई-लर्निंग स्कूल शेजारील क्रीडांगणात प्रचंड उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात पार पडला.
या योग महोत्सवात सुमारे १२०० ते १५०० नागरिकांनी सहभाग घेतला. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, तरुण, महिला तसेच विविध सामाजिक संस्था यांनी उपस्थिती लावून एक सामूहिक आरोग्यप्रेमाची जाणीव निर्माण केली.
कार्यक्रमाची सुरूवात अनुभवी योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगासने, प्राणायाम व ध्यान यांच्या सत्राने झाली. योगाचे मानसिक व शारीरिक आरोग्यावर होणारे लाभ याचे प्रात्यक्षिक स्वरूपात विवेचन करण्यात आले.
या वेळी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की –
> “योग ही भारताची हजारो वर्षांची परंपरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी २०१५ साली संयुक्त राष्ट्रांमध्ये जागतिक योग दिनाची संकल्पना मांडून योगाला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून दिली. आज जगभरात योग केवळ व्यायाम न राहता एक आरोग्यदायी जीवनशैली बनला आहे, ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
> “माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचा योगाविषयी दृष्टिकोनही अत्यंत प्रेरणादायी आहे. ते नेहमी सांगतात, ‘योग ही जीवनशैली आहे, व्यायाम नव्हे!’ हा विचारच आपल्याला योगामध्ये खोल रुजवतो.”
नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी नागरिकांना नियमित योग साधनेचा अंगीकार करून शारीरिक व मानसिक आरोग्य टिकवण्याचे आवाहन यावेळी केले.
उत्स्फूर्त सहभाग व सशक्त आरोग्य संदेश
कार्यक्रमाची सांगता सामूहिक प्रार्थना, देशभक्तिपर गीत आणि ‘योग भारताचा अभिमान आहे’ या घोषवाक्याने झाली.
संपूर्ण आयोजन उत्तम, प्रेरणादायी व आरोग्यप्रती बांधिलकी दर्शवणारे ठरले.
COMMENTS