प्रभाग रचना : सत्ताधाऱ्यांना काय वाटते? कुणाला होईल फायदा?
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी आज प्रभाग रचना जाहीर झाली आहे. आता सर्व इच्छुकांची बाजी पणाला लागणार आहे. मात्र प्रभाग रचना आणि बदललेल्या प्रभागामुळे मात्र कुणीही समाधानी असल्याचे जाणवत नाही. प्रस्थापित सर्व नगरसेवकांचे प्रभाग तोडण्यात आले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते भाजपला दोषी मानत आहेत तर भाजप देखील महाविकास आघाडीवर दोषारोप करत आहे. प्रभाग रचनेचा नक्की कुणाला फायदा झाला? हे मात्र निवडणूक निकालानंतरच दिसेल, असे मानण्यात येत आहे. दरम्यान सत्ताधाऱ्यांनी मात्र अब कि बार सौ पार हा नारा कायम ठेवला आहे.
प्रभागांची मोडतोड करुन आणि निकष बदलून नवे प्रभाग करुन भारतीय जनता पक्षाला रोखता येईल, असे विरोधकांना वाटत असले तरी त्यांच्या भ्रमाचा भोपळा पुणेकरच फोडतील. गेल्या पाच वर्षांत पुणेकरांना केंद्रबिंदू ठेवूनच भारतीय जनता पक्षाने महापालिकेचा कारभार केलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मतदानरुपी साथ मतदार देतील हा विश्वास आहे. पुण्याच्या भविष्याचा वेध घेताना विविध महत्त्वाचे प्रकल्प गेल्या पाच वर्षात पूर्णत्वास नेले. मेट्रो आणि समान पाणीपुरवठा प्रकल्पही पूर्णत्त्वाच्या मार्गावर आहेत. शिवाय विविध नव्या प्रकल्पांचीही मुहूर्तमेढ रोवली जात आहे. पुणे शहराला जागतिक पातळीवर अधोरेखित करताना देशपातळीवरही विविध पुरस्कार आणि मानांकनांनी पुण्याच्या शाश्वत विकासकामांवर शिक्कामोर्तब झाले. सुज्ञ पुणेकर या सर्व बाबींचा सारासार विचार करुन भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा राहतील, हा विश्वास आहे.
मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे
शहरात मेट्रो प्रकल्पाचे पूर्णत्वाला गेलेले काम, सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी पीएमपीसाठी झालेली बस खरेदी, नदी सुधार योजना प्रकल्प, करोनाच्या काळात सत्ताधारी पक्ष म्हणून पार पाडलेली जबाबदारी, अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज तसेच शहरातील नागरिकांच्या हितासाठी गेल्या पाच वर्षात केलेली कामे यामुळे येणाऱ्या महानगपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद वर्चस्व राहिल. ‘अब की बार सौ पार ‘ करून भाजप निश्चितपणे पुणेकरांच्या विश्वासाला पात्र ठरेल.
COMMENTS