Mahavitaran | अखेर महावितरणला आली जाग
Vivek Velankar – (The Karbhari News Service) – महावितरणने (MSEDCL) जुलै २०२४ नंतर मासिक विश्वासार्हतेचे निर्देशांक प्रसिध्द केले नसल्याची तक्रार विवेक वेलणकर यांनी काल २ जानेवारी ला दुपारी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे केली होती. आज ३ जानेवारी ला दुपारी महावितरणने तातडीने ऑगस्ट , सप्टेंबर व ऑक्टोबर २०२४ या तीन महिन्यांचे विश्वासार्हतेचे निर्देशांक त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले.महावितरणच्या या कारभारावर टीका करताना वेलणकर यांनी प्रश्न उपस्थित केला हे कि, दरवेळी कान पिळल्यावरच काम करायची सवय कधी जाणार? (Pune News)
याबाबत वेलणकर यांनी सांगितले कि, अर्थात ऑक्टोबर २०२४ चे प्रसिद्ध केलेले निर्देशांक जुलै २०२४ पेक्षा महावितरणचा कारभार आणखी ढासळल्याचे दाखवून देत आहेत. जुलै २०२४ या संपूर्ण महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात तांत्रिक बिघाडामुळे वीज खंडित होण्याच्य २३७६९ घटना घडल्या होत्या ज्या ऑक्टोबर २०२४ मध्ये १,०७,०८८ एवढ्या झाल्या . जुलै २०२४ या संपूर्ण महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रातील ग्राहकांना३४९९३ तास अंधाराचा सामना करावा लागला. तर ऑक्टोबर २०२४ या संपूर्ण महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रातील ग्राहकांना एकूण ६७८१५ तास अंधाराचा सामना करावा लागला.
महाराष्ट्रात महावितरणला सर्वात जास्त महसूल मिळवून देणार्या देशातील पहिली स्मार्ट सिटी म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या पुणे झोनची अवस्था काही वेगळी नाही.
जुलै २०२४ या संपूर्ण महिन्यात संपूर्ण पुणे झोनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे वीज खंडित होण्याच्या १३१४ घटना घडल्या ज्यात पुण्यातील ग्राहकांना एकूण २०५१ तास अंधाराचा सामना करावा लागला. तर ऑक्टोबर २०२४ या संपूर्ण महिन्यात संपूर्ण पुणे झोनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे वीज खंडित होण्याच्या १६१६८ घटना घडल्या ज्यात पुणे विभागातील ग्राहकांना एकूण ८७६६ तास अंधाराचा सामना करावा लागला. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोग हे विश्वासार्हतेचे निर्देशांक बघते का आणि ढासळत चाललेल्या सेवेच्या दर्जाबद्दल महावितरण ला जबाबदार धरून कधी कारवाई करणार का या प्रश्नांची उत्तरे ग्राहकांना मिळणे आवश्यक आहे. असेही वेलणकर म्हणाले.
COMMENTS