कोरोना, माथाडी, कर्ज योजना, व्हॅट आदींविषयी अजित पवारांना निवेदन
: अजित पवारांकडून व्यापाऱ्यांना मदतीचे आश्वासन
पुणे: पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले. त्यावर व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिल्याची माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.
: व्यापारी पुन्हा उभा राहणे आवश्यक: निवंगुणे
कोरोना काळात व्यापाऱ्यांचे होत असलेले नुकसान, माथाडी कायद्याचा धाक दाखवून सुरू असलेली गुंडगिरी, अडचणीत आलेला व्यापार पूर्वपदावर आणण्यासाठी कर्ज योजना, व्हॅटच्या येत असलेल्या नोटीसा, वजनकाटे, कोरोना काळात व्यापाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबरोबरच इतर अनेक मुद्द्यांवर उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी सविस्तर चर्चा केली. निवेदनातील प्रत्येक मुद्दा समजून घेतला.
आज सकाळी पुण्यातील विधानभवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, महिला व्यापारी संघाच्या अध्यक्ष शिल्पा भोसले, उपाध्यक्ष विकास मुंदडा, अजित चंगेडिया, कोषाध्यक्ष उमेशचंद्र यादव, उपाध्यक्ष बाळासाहेब अमराळे उपस्थित होते.
कोरोना काळात झालेला लॉकडाऊन आणि मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे व्यापारी आर्थिक संकटात सापडला आहे. व्यापारी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी व्यापारी पुन्हा उभा राहणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना मदत करता येऊ शकते. व्यापाऱ्यांच्या यासह इतर सर्व समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मनापासून सहकार्य करण्याची अपेक्षा पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे उपमुख्यमंत्र्यांकडे केल्याचेही सचिन निवंगुणे यांनी सांगितले.
COMMENTS