PMC Diwali Bazaar | पुणे महापालिकेच्या दिवाळी बचत बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद; दोन दिवसांत ३० लाखांची उलाढाल!
| १,४१५ बचत गटांतील महिलांना मिळाले हक्काचे व्यासपीठ
| दिवाळी फराळ, खाद्यपदार्थ, कपडे, आकाशकंदील, ज्वेलरीसह विविध वस्तूंची विक्री**
PMC SDD – The Karbhari News Service – पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी बचत बाजार प्रदर्शन व विक्री उपक्रमाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनाच्या पहिल्या दोन दिवसांत तब्बल ३० लाख १० हजार ६५४ रुपयांची विक्री झाली आहे. महापालिकेच्या या उपक्रमातून शहरातील १,४१५ बचत गटांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. महिला बचत गटांसह दिव्यांग लाभार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंनाही या प्रदर्शनात चांगली मागणी मिळत आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागाने शहरात दिवाळी बचत बाजार प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे आयोजन केले आहे. पुणे शहरातील विविध भागांमध्ये हे प्रदर्शन भरविण्यात आले असून, नागरिकांना दिवाळीच्या खरेदीसाठी एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध झाल्या आहेत.

| शहरातील विविध भागांत प्रदर्शनाचे आयोजन
या उपक्रमाचे उद्घाटन शहरातील विविध ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सिंहगड रोड येथील पु. ल. देशपांडे उद्यानातील प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते झाले. उत्तमनगर भुसारी कॉलनी येथील वि. दा. सावरकर मैदानातील प्रदर्शनाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले. कर्वेनगर येथील कै. नथुभाई मेंगडे जलतरण तलाव येथे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
बालगंधर्व रंगमंदिर येथील प्रदर्शनाचे उद्घाटन उपमहापौर परशुराम वाडेकर, विरोधी पक्षनेते निलेश निकम, भक्ती गायकवाड आणि सपना ढाजे यांच्या हस्ते झाले. खराडी येथील गेरा आयटी पार्क, पांडुरंग पठारे क्रीडांगण येथे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नॉर्थ डहाणूकर कॉलनी, तेजस नगर, कोथरूड येथील प्रदर्शनाचे उद्घाटन वसती जाधव, दिनेश माथवड आणि हर्षदा माथवड यांच्या हस्ते झाले.

बिबवेवाडी येथील चिंतामणराव देशमुख प्राथमिक शाळेतील प्रदर्शनाचे उद्घाटन रुपाली धाडवे, तन्वी दिवेकर, मानसी देशपांडे, वर्षा साठे आणि राजेंद्र आबा शिळीमकर यांच्या हस्ते करण्यात आले. घोरपडी येथील कै. बाळासाहेब रामभाऊ कवडे क्रीडांगण येथे आमदार चेतन तुपे, सुरेखा कवडे आणि हिमाली कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनातील प्रदर्शनाचे उद्घाटन प्रशांत जगताप, कालिंदा पुंडे आणि कोमल शेंडकर यांच्या हस्ते करण्यात आले. पुण्यनगरी, वडगाव शेरी येथील प्रदर्शनाचे उद्घाटन नारायण गलांडे, श्वेता गलांडे आणि ज्ञानेश्वर शिंदे यांच्या हस्ते झाले.
कात्रज डेअरी एसएमपी मैदान येथील प्रदर्शनाचे उद्घाटन प्रभाग समिती अध्यक्ष प्रतिभा चोरगे, कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समिती अध्यक्ष रंजना टिळेकर, सहाय्यक महापालिका आयुक्त सुरेखा भनगे, वानवडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक महापालिका आयुक्त अमोल पवार, तेजश्री बदक आणि पूजा कदम यांच्या हस्ते करण्यात आले. वारजे माळवाडी येथील पॉन्स्युलर नगर येथे निलेश निकम आणि बाबा धुमाळ यांच्या हस्ते, तर धानोरी येथील भारत माता रोडवरील प्रदर्शनाचे उद्घाटन अश्विनी भंडारी आणि संगीता दांगट यांच्या हस्ते झाले.

| दिवाळी फराळापासून घरगुती वस्तूंपर्यंत विविध उत्पादने
या प्रदर्शनामध्ये बचत गटातील महिलांनी स्वतः तयार केलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चकली, लाडू, करंजी, शंकरपाळी, चिवडा, शेव आणि अनारसे अशा पारंपरिक फराळाच्या पदार्थांना विशेष स्थान देण्यात आले आहे.
याशिवाय वांग्याचे भरीत, पिठलं-भाकरी, बिर्याणी, विविध शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ, सॉस, शीतपेय, सोलकढी, लोणची, पापड, विविध प्रकारचे मसाले, तयार पिठे, शेवया आणि कुरड्या यांचे स्टॉलही लावण्यात आले आहेत.
घरगुती वापरासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंमध्ये स्वेटर्स, रांगोळीचे रंग, तयार कपडे, तोरण, आयुर्वेदिक उत्पादने, विविध प्रकारच्या पिशव्या, कापडी फाईल्स, फोल्डर्स, पेपर प्रॉडक्ट्स, ज्वेलरी आणि सौंदर्य प्रसाधने उपलब्ध आहेत. तसेच अगरबत्ती, पणत्या, आकाशकंदील आणि दिवाळीसाठी आवश्यक असलेल्या विविध सजावटीच्या वस्तूंचीही विक्री केली जात आहे.

| प्लास्टिकला पर्याय देणाऱ्या वस्तूंचाही समावेश
पर्यावरणपूरक वस्तूंनाही या प्रदर्शनात प्राधान्य देण्यात आले आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांना पर्याय म्हणून कागदी पिशव्या, कापडी पिशव्या आणि लेदर पिशव्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना दिवाळी खरेदीसोबत पर्यावरणपूरक वस्तूंची निवड करण्याची संधी मिळत आहे.
| ४ नोव्हेंबरपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार
समाज विकास विभागाच्या माहितीनुसार, प्रदर्शनाच्या दोन दिवसांत एकूण ३० लाख १० हजार ६५४ रुपयांची विक्री झाली आहे. या माध्यमातून बचत गटातील महिला आणि दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीतून आर्थिक लाभ मिळत आहे. हे प्रदर्शन ४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.
पुणे शहरातील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी करावी आणि महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणाला हातभार लावावा, असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या उपआयुक्त आशा राऊत यांनी केले आहे.

COMMENTS