Sushma Andhare | सुषमा अंधारे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र | वाचा पत्र जसेच्या तसे

HomeBreaking News

Sushma Andhare | सुषमा अंधारे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र | वाचा पत्र जसेच्या तसे

Ganesh Kumar Mule Mar 25, 2025 9:11 PM

CM Devendra Fadnavis | राष्ट्रीय आमदार संमेलन क्षमता वृद्धींगत करण्याचे व्यासपीठ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Pune Book Festival | पुणे पुस्तक महोत्सवाचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन
Chapekar Memorial | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण

Sushma Andhare | सुषमा अंधारे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र | वाचा पत्र जसेच्या तसे

 

CM Devendra Fadnavis – (The Karbhari News Service) – विधानसभा सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर कारवाई ची भाषा केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. हे पत्र वाचा जसेच तसे.

 

श्रीयुत देवेंद्र गंगाधरजी फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

सस्नेह नमस्कार.
पत्र लिहिण्यास कारण की, आज पुन्हा सभागृहात आपण माझ्यावर बोललात. पण आपल्याला उत्तर द्यायला मी सभागृहात नाही. ही माझी तांत्रिक अडचण आहे. म्हणून आपल्याला या पत्राद्वारे उत्तर देणे माझी जबाबदारी आहे.

तसे सभागृहात आपण पहिल्यांदा माझ्याबद्दल बोललेला नाहीत. आपल्यासह या सभागृहातल्या भल्या भल्या सदस्यांनी याआधीही माझ्यावर बोलून “आपण कालबाह्य झालेलो नाहीत; आपली उपयोगीता अजूनही शिल्लक आहे हे” हे आपापल्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यांचे लागूनचालन करण्याचा प्रयत्न केला आहे. असो.

देवेंद्रजी, आज प्रचंड पोटतिडकीने आपण सभागृहाच्या आदर सन्मानाबाबत भाष्य करत होतात. आनंद झाला अन आश्चर्यही वाटले. आनंद यासाठी की चला सभागृहाच्या मानसन्मानाबद्दल थोडी का होईना आपल्याला काळजी वाटते. अन आश्चर्य याचे की, हा सभागृहाचा मानसन्मान आपल्याच पक्षाच्या सदस्यांनी शेकडो वेळा धुळीस मिळवला तेव्हा आपली ही अतिसंवेदनशीलता नेमकी कुठे हरवली होती?
देवेंद्रजी, नवनीत राणा ने या राज्याच्या तात्कालीन मुख्यमंत्री असणाऱ्या उद्धव साहेबांच्या बद्दल बोलताना “तुमच्यात दम आहे का” ही भाषा वापरणं सभागृहाचा आणि मुख्यमंत्रीपदाचा मान वाढवणारी होती की मान खाली घालणारी होती ?
सभागृहाचे सदस्य असणारे सदाभाऊ खोत यांनी मारकडवाडी मध्ये या शतकातला नेता म्हटलं तरी चालेल ज्या नेत्याला आपले नेते नरेंद्र मोदी जी गुरुस्थानी मानतात त्या पवार साहेबांच्या आजारावर अत्यंत हिनकस टिप्पणी केली तेव्हा त्यांना संस्कार सांगायला आपण का विसरलात?

आजच्याच वक्तव्यामध्ये संजय शिरसाट खासदार संजय राऊत यांच्या बद्दल बिनलाजे शब्द वापरतात, तर परिणय फुके ह**** शब्द वापरतात हे सभागृहाच्या कोणत्या मर्यादित बसतं…?
माझ्या पक्षातच सोडा पण सभागृहातही ज्येष्ठ असणारे माजी मंत्री अनिल परब यांना अत्यंत असभ्य आणि बीभत्स हातवारे करत तुमच्या पक्षातल्या एक बाई पायाला 56 बांधून फिरण्याची भाषा करतात. यावर आज सभागृहात तुम्ही चकार शब्दाने ही का बोलला नाहीत ?
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी. या पवित्र सभागृहाचा मानसन्मान मला फार चांगला कळतो. ज्या सभागृहामध्ये एसएम जोशी , डांगे, यशवंतराव चव्हाण, विलासरावजी देशमुख, यांच्या सारख्या लोकांची भाषणे ऐकायला सभागृह तुडुंब भरायचं त्या सभागृहामध्ये नितेश राणे, चित्रा वाघ, शिरसाट, यासारख्या लोकांनी त्याचं पावित्र्य हरवून टाकलंय याचं तुम्हाला जराही वैषम्य वाटत नाही हि केवढी मोठी शोकांतिका म्हणावी?

देवेंद्रजी, माझ्यावर कारवाई करायची असेल तर निश्चित करावी. या देशात सत्य बोलणं, लोकाभिमुख प्रश्न विचारणं जर गुन्हा असेल तर असा गुन्हा मी वारंवार करायला तयार आहे. पण माझ्यावर कारवाई करताना स्वपक्षीयातील थिल्लर चाळे थांबवण्यासाठी आपल्याकडे काही उपाययोजना आहे का यावरही आपण चिंतन करावं.

माझ्याकडून आपल्या प्रति कायमच स्नेहभावना आहे. ती वृद्धीगंत होऊ द्यायची की नाही याची सर्वस्वी जबाबदारी आपली आहे…!

कळावे,
आपली बहीण
सुषमा अंधारे

ताजा कलम – बहिणीवरून आठवल, दम आहे का?पायाला 56 बांधून फिरते , असं म्हणणाऱ्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत ? मी सभ्यतेने प्रश्न विचारूनही नाही याचं नेमकं कारण कळेल का ?

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: