लोकप्रतिनिधी सत्तेचा विनियोग देश उभारणीसाठी कसा करू शकतो, याचे उदाहरण म्हणजे नितीन गडकरी
: शरद पवार यांनी केले गडकरींचे कौतुक
अहमदनगर : एक लोकप्रतिनिधी सत्तेचा अधिकार हाती आल्यानंतर त्या सत्तेचा विनियोग एकदंर देशाच्या उभारणीसाठी कसा करू शकतो, याचे उत्तम उदाहरण गडकरी साहेबांनी दाखवले आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे, मी संसदेत पाहतो की, गडकरी यांच्याकडे येणारा कोणताही लोकप्रतिनिधी असो, ते येणाऱ्याचा पक्ष कधी पाहत नाहीत. त्याचा विकासाच्या कामासंबंधीची मागणी पाहतात आणि त्यामध्ये लक्ष घालतात. अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले. याअगोदर ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी गडकरी यांचे अशाच पद्धतीने कौतुक केले होते.
: नेमके काय म्हणाले शरद पवार?
अहमदनगर जिल्ह्याच्या प्रगतीला एक नवी दिशा दाखविणारा असा कार्यक्रम नगर येथे संपन्न झाला. आमदार रोहित पवार यांच्याकडून निरोप मिळाला की, त्यांचे रस्त्याचे प्रश्न गडकरी यांनी मंजूर केले आहेत. मात्र गडकरी यांनी या प्रकल्पांच्या सुरुवातीला मी यावे, असे सांगितले. त्यामुळे साहजिकच कार्यक्रमाला येणे मला भाग पडले. यापूर्वी सुद्धा सोलापूरला अशाच एका सोहळ्यामध्ये मला जावे लागले. आनंद एका गोष्टीचा आहे की, समारंभ होतात, कोनशिला बसवून गेल्यानंतर वर्षानुवर्ष त्याचे काय झाले, याचा पत्ता लागत नाही. पण गडकरींच्या कार्यक्रमाला जायचे म्हटल्याच्या नंतर शक्यतो दोन-चार दिवसांत काहीतरी बदल बघायला मिळतो, ही स्थिती दिसते.
आज रस्ते ही बाब दिसायला साधी आहे. मात्र जगातील कोणत्याही देशाचे अर्थकारण सुधारायचे असेल तर प्रभावी दळणवळणाची साधने ही अत्यंत महत्त्वाची असतात. मग ती रस्त्याची वाहतूक असेल किंवा समुद्रातली किंवा आकाशातली वाहतूक असेल. या सगळ्या वाहतुकीमध्ये रस्त्यावरची वाहतूक समाजाच्या लाखो लोकांच्या दृष्टीने महत्त्वाची असते. आज त्याला एक गती देण्याचे काम श्री. गडकरी यांनी हाती घेतले आहे. मला आठवतंय गडकरी यांनी ही जबाबदारी घेण्याआधी जवळपास ५ हजार किमीचे काम झाले होते. गडकरी यांच्याकडे ही जबाबदारी आल्यानंतर तोच आकडा १२ हजार किमीच्या पुढे गेला आहे.
: ये गडकरी साहब कि कृपा है
देशाच्या अनेक भागात कामानिमित्त जाण्याचा योग येतो. गाडीने प्रवास करण्यामध्ये मला स्वतःला आनंद वाटतो. कारण गाडीने प्रवास करायचा म्हटल्यावर रस्ते बघायला मिळतात, आजूबाजूच्या शेतातले पीक पाहायला मिळते. भाषणातला विकास कृषीमध्ये किती उतरला आहे, हे पाहण्याची संधी रस्त्याने प्रवास करताना मिळत असते. त्यामुळे मी शक्यतो रस्त्याने प्रवास करण्याचा प्रयत्न करतो. एक गोष्टी इथे सांगावी लागेल. देशाच्या कोणत्याही राज्यात गेल्यानंतर त्याठिकाणचे रस्ते उत्तम असे पाहायला मिळतात. तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांशी त्याबद्दल चर्चा केल्यानंतर ते सांगतात की, ‘ये गडकरी साहब की कृपा है’.
एक लोकप्रतिनिधी सत्तेचा अधिकार हाती आल्यानंतर त्या सत्तेचा विनियोग एकदंर देशाच्या उभारणीसाठी कसा करू शकतो, याचे उत्तम उदाहरण गडकरी साहेबांनी त्याठिकाणी दाखवले आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे, मी संसदेत पाहतो की, गडकरी यांच्याकडे येणारा कोणताही लोकप्रतिनिधी असो, ते येणाऱ्याचा पक्ष कधी पाहत नाहीत. त्याचा विकासाच्या कामासंबंधीची मागणी पाहतात आणि त्यामध्ये लक्ष घालतात. अशाप्रकारचा व्यापक दृष्टीकोन त्यांनी स्वीकारला आहे. याचा परिणाम देशाचे अर्थकारण सुधारण्यामध्ये निश्चित प्रकारे होतोय, याची मला स्वतःला खात्री आहे.
पवार पुढे म्हणाले आणखी एका गोष्टीचा उल्लेख नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. नगर जिल्हा हा साखर उत्पादनात पायाभूत काम करणारा जिल्हा आहे. पद्मश्री विखे पाटील, अण्णासाहेब शिंदे, धनंजयराव गाडगीळ या सगळ्या लोकांनी देशातील पहिल्या साखर कारखान्याची मुहूर्तमेढ प्रवरापासून केली. नंतर या सगळ्या क्षेत्रात प्रचंड विकास संपूर्ण देशात झाला. माझ्या मते आज साखर धंद्यासमोर आव्हानाची परिस्थिती लवकरच येईल, असे मला वाटतंय. गेले काही दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे हजारो एकरावरील पीक उद्ध्वस्त झाले आहे. हे पाहिल्यानंतर शेतकऱ्याला असे वाटते की, आज आधार देणारे पीक कोणते असेल तर ते म्हणजे ऊस.
यंदाच्या वर्षी ज्या पद्धतीने आपल्याकडे पाऊस झाला, पाणी साठले, भूगर्भातील पाण्याची पातळी ही निश्चितच सुधारली. त्यामुळे पुढच्या कमीतकमी दोन वर्षासाठी भूगर्भातील पाण्याची कमतरता भासणार नाही. अशा परिस्थितीत एकच पीक घेण्याची शेतकऱ्यांची प्रवृत्ती राहिल, ते पीक म्हणजे ऊस. मात्र ऊसाला आता साखरेपर्यंत मर्यादित ठेवून जमणार नाही. त्यामुळे आपल्याला इथेनॉल क्षेत्रात जावे लागेल. यासंबंधी केंद्र सरकारचे अंतिम धोरण ठरेल याची खबरदारी घेण्याची काळजी श्रीयुत गडकरी यांनी घेतली आहे. त्याचा परिणाम हा संबंध राज्यामध्ये दिसतोय. साखर एके साखर हे कमी करावे लागेल. साखरेला मर्यादा आहेत, पण इथेनॉलला मर्यादा येऊ शकत नाही. त्यामुळे इथेनॉलच्या क्षेत्रामध्ये जावे लागेल.
कदाचित काही वर्षांनी आणखीन काही प्रश्न समोर येतील. काही दिवसांपूर्वी माझ्याकडे नॉर्वेचे एक मंत्री आणि काही अधिकारी आले होते. त्यांनी आता इथेनॉलच्या ऐवजी हायड्रोजन गॅसचा प्रस्ताव आपल्यासमोर ठेवला. हायड्रोजन गॅस ही इथेनॉलची पुढची स्टेप आहे. त्यामध्ये जाऊन कदाचित दळणवळणाची साधने त्यावर अवलंबून राहतील, पर्यावरणाला अनुकूल असे चित्र राहिल. या नव्या कल्पना आज जगामध्ये दिसतायत, त्यावर अभ्यास करून योग्य ठिकाणी मांडून, लोकांची आणि नेतृत्वाची मानसिकता तयार करण्यामध्ये गडकरींचा नेहमीच पुढाकार असतो. अहमदनगर जिल्हा ऊसाच्या क्षेत्रातला अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे. इथून पुढे ऊसाच्या पिकासंबंधी प्रक्रियेचे जे बदल करायवयाचे आहेत ते नव्या विचारानुसार करावे लागतील.
मला आनंद आहे की, नगर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने इथल्या लोकांच्या ज्या मागण्या होत्या, त्याबाबत विचार करण्यासाठी गडकरी आज इथे आले आहेत. या प्रश्नांचा अभ्यास करून योग्य वेळी, योग्य निर्णय ते घेतील, अशा अपेक्षा व्यक्त करतो.
COMMENTS