Pune Traffic | PMC Pune | आगामी दोन महिने बांधकाम, पथ विभागातील सर्वच अभियंत्यांना रस्त्यांवर तैनात करा | आबा बागुल यांची महापालिका आयुक्ताकडे मागणी
Aba Bagul – (The Karbhari News Service) – शहरातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी दोन महिने बांधकाम, पथ विभागातील सर्वच अभियंत्यांना रस्त्यांवर तैनात करा. अशी मागणी कॉंग्रेस नेत आबा बागुल यांनी महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.
बागुल यांच्या निवेदनानुसार पुणे शहरात सध्या प्रचंड वाहतूक कोंडीला पुणेकरांना सामोरे जावे लागत असून त्यांना नाहक मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यात रस्त्यांची दुर्दशा मोठ्या प्रमाणावर झाली आहे.रस्त्यांवरील खड्ड्यातून मार्ग काढत प्रचंड वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल होत असून वेळेचा अपव्यय शिवाय त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा देणे ही सर्वस्वी जबाबदारी आहे. त्यासाठी आपण पुढील दोन महिने बांधकाम विभागासह पथ विभागातील सर्वच अभियंत्यांना वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहरातील रस्त्यांवर तैनात करावे. अन्य कोणतेही काम झाले नाहीतरी चालेल पण वॉर्ड स्तरावर अभियंत्यांमार्फत वाहतूक कोंडी सुरळीत होत नाही तोपर्यंत या दोन्ही विभागातील अभियंत्यांवर शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची जबाबदारी सोपवावी. आता श्रावण महिना सुरु होत आहे. त्यानंतर गणेशोत्सव व अन्य सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे ही आपलीही जबाबदारी आहे. त्यामुळे शहरातील प्रचंड वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुढील दोन महिने बांधकाम, पथ विभागातील सर्वच अभियंत्यांना रस्त्यांवर तैनात करण्याबाबत आपण तातडीने निर्णय घेऊन तसे निर्देश द्यावेत अन्यथा पुणेकरांना रस्त्यांवर उतरावे लागेल. जर प्रशासनाला हे जमत नसेल तर तसे जाहीररीत्या सांगावे. सर्वपक्षीय कार्यकर्ते वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नियोजन करतील याचीही आपण नोंद घ्यावी. असे बागुल यांनी म्हटले आहे.