Pune Properties Survey | | PT 3 Application | नागरिकांचा विरोध सहन करूनही सव्वा तीन लाख मिळकतींचा सर्व्हे! | १४ ऑगस्ट पर्यंत सर्व्हे संपवणार
PMC Property tax Department- (The Karbhari News Service) – पुणे शहरातील स्व-वापराच्या निवासी मिळकतींना मिळकत करात 40% सवलतीच्या अनुषंगाने पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation (PMC) मिळकतीची तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. सुमारे साडे चार लाख मिळकतींचा सर्वे केला जाणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची कमी ही प्रशासकीय अडचण होती तर दुसरीकडे जे कर्मचारी सर्व्हे करत आहेत, त्यांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. उलट कर्मचाऱ्यांना नागरिकांची अरेरावी सहन करावी लागत आहे. असे असूनही मिळकतकर विभागाने सव्वा तीन लाख मिळकतींचा सर्व्हे पूर्ण केला आहे. उर्वरित मिळकतींचा सर्व्हे आम्ही १४ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करणार आहोत. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. (Pune Property Tax)
2024-25 या आर्थिक वर्षातील देयके वितरीत केल्यानंतर PT-3 फॉर्म भरण्याची मुदत वाढविण्याबाबत मोठ्या प्रमाणात नागरिक, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी मागणी करीत होते. अशा 3,72,440 मिळकतींचा सर्व्हे पुणे महानगरपालिकेच्या सेवकांकडून प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्व्हे करण्याचे काम 20 जून पासून चालू केले आहे. पुणे महापालिका पूर्ण शहरभर ही तपासणी मोहीम राबवत आहे. यात नागरिकांकडून तात्काळ PT 3 भरून घेण्यात येणार आहे. घरात स्वतः राहत असल्यासच मिळकतधारकाला सवलत मिळणार आहे. नागरिकांसाठी ही शेवटची सवलत असणार आहे. यानंतर PT 3 form भरण्याची संधी दिली जाणार नाही. मिळकतींची संख्या मोठी असल्याने आणि महिनाभरात हे काम पूर्ण करायचे उद्दीष्ट ठेवल्याने मिळकत कर विभागाला अतिरिक्त मनुष्यबळाची गरज होती. यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी अतिक्रमण विभागाकडील ७५ सहाय्यक निरीक्षक, घन कचरा व्यवस्थापन विभागाकडील १५० आरोग्य निरीक्षक, पंधरा क्षेत्रिय कार्यालयातील प्रत्येकी पाच असे ७५ मोकादम आणि अन्य विभागातील ७५ टंक लिपिक उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. सर्वेक्षणाचे काम पुर्ण होईपर्यंत हे मनुष्यबळ कर आकारणी विभागाशी संलग्न राहाणार असून त्यांवर केवळ सर्वेक्षणाची जबाबदारी राहाणार आहे. त्यांना कर वसुलीचे कुठलेही अधिकार राहाणार नाहीत, असे आदेशात नमूद करण्यात आले होते. मात्र आता पर्यंत फक्त 75 कर्मचारी विभागाकडे उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे सर्व्हेच्या कामात गती मिळेनाशी झाली होती.
तर दुसरीकडे जे कर्मचारी घरोघरी जाऊन सर्व्हे करत आहेत, त्यांना नागरिकांकडून मानहानी सहन करावी लागत होती. दुपारच्या वेळी लोक दार उघडत नाहीत. उघडले तर नंतर यायला सांगतात. काही सोसायट्या तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवारात प्रवेश नाकारतात. काही लोक मानहानीकारक बोलतात. यामुळे कर्मचारी वैतागून गेले होते. याचा सामना उपायुक्त माधव जगताप यांनाही सहन करावा लागला होता. असे असूनही जगताप यांनी कर्मचाऱ्यांकडून हे काम करवून घेतले. त्यामुळे सव्वा तीन लाख मिळकतींचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. उपायुक्त जगताप यांनी सांगितले कि, एकूण साडेचार लाख मिळकतींचा सर्व्हे केला जाणार आहे. उर्वरित मिळकतींचा सर्व्हे १४ ऑगस्ट पर्यंत पूर्ण केला जाणार आहे.
– १५ ऑक्टोबर पर्यंत सर्व बिले दिली जाणार
जगताप म्हणाले कि, विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत जवळपास १५०० कोटींचे उत्पन्न मिळवले आहे. डिसेंबर अखेर पर्यंत जास्तीत जास्त वसुली केली जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. तर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत नागरिकांना सर्व बिले पोस्टाच्या माध्यमातून पोचवली जाणार आहेत, असे ही जगताप यांनी सांगितले.
COMMENTS