Pune PMC RTI | माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुणे महापालिकेत प्रशिक्षण; जन माहिती अधिकाऱ्यांना मार्गदर्शन

पुणे महापालिकेत माहिती अधिकार दिन उत्साहात; जन माहिती अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

Homeadministrative

Pune PMC RTI | माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुणे महापालिकेत प्रशिक्षण; जन माहिती अधिकाऱ्यांना मार्गदर्शन

Ganesh Kumar Mule Oct 05, 2026 7:27 PM

PMC Vs Water Resources Dept | जलसंपदा विभागाला मान्य नाही महापालिका अधिनियम | औद्योगिक पाणी वापराचे बिल घेण्याचे दिले आदेश
PMC Employees Time Bound Promotion | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती पुन्हा लटकली! | राज्य सरकारकडे पाठवला जाणार प्रस्ताव
Appointment | PMC Pune | आरोग्य विभागात मानधन तत्वावर काम करणाऱ्या 75 कर्मचाऱ्यांची महापालिकेत कायमस्वरूपी नियुक्ती 

Pune PMC RTI | माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुणे महापालिकेत प्रशिक्षण; जन माहिती अधिकाऱ्यांना मार्गदर्शन

आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा; संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन, प्रश्नमंजुषेतून कायद्याची उजळणी

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  माहितीचा अधिकार (RTI) हा नागरिकांच्या सशक्तीकरणाचा महत्त्वाचा आधार असून, माहिती अधिकार अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांसोबतच अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही कायद्याबाबत स्पष्टता असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेत (PMC Pune) २८ सप्टेंबर  रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन (International Right to Information Day) उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पुणे महानगरपालिकेतील जन माहिती अधिकाऱ्यांसाठी माहिती अधिकार अधिनियमाच्या अंमलबजावणीसंदर्भात विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. (Pune Municipal Corporation – PMC)

माहिती अधिकार अधिनियम, २००५ हा दिनांक १५ जून २००५ रोजी संमत झाला असून, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी १२ ऑक्टोबर २००५ पासून सुरू झाली. कायद्याला २१ वर्षे पूर्ण होत असतानाही माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदी, त्याची अंमलबजावणी, माहिती देण्याची प्रक्रिया तसेच जन माहिती अधिकाऱ्यांच्या अधिकार व कर्तव्यांबाबत नागरिक आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये काही प्रमाणात संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसून येते. त्यामुळे या विषयावर प्रशिक्षण व मार्गदर्शनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या प्रशिक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून जन माहिती अधिकाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणासाठी श्री. अब्राहम आढाव, अध्यक्ष व संस्थापक, ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र यांना मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमास संबोधित करताना पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त श्रीमती वसुंधरा बारवे यांनी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. तसेच प्रशिक्षक श्री. अब्राहम आढाव यांचे पुस्तक देऊन स्वागत केले.

प्रशिक्षणादरम्यान श्री. अब्राहम आढाव यांनी पुणे महानगरपालिकेतील जन माहिती अधिकाऱ्यांना माहिती अधिकार कायद्याचा उगम, कायद्याची पार्श्वभूमी, विविध तरतुदी, माहिती अधिकाराचा उपयोग आणि व्यापक जनहितातील त्याचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ‘जनता सर्वोपरी आहे’ या भूमिकेतून माहिती अधिकाराचा योग्य वापर कसा करता येतो, नागरिकांनी माहिती अधिकाराचा केलेला प्रभावी वापर आणि त्यातून साध्य झालेले जनहित याबाबत त्यांनी विविध अनुभव व उदाहरणांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.तसेच जन माहिती अधिकाऱ्यांचे अधिकार व कर्तव्ये, माहिती अधिकाराच्या अर्जांवर कार्यवाही करताना घ्यावयाची काळजी, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांना माहिती उपलब्ध करून देताना असणारी जबाबदारी याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजात माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी करताना अधिकारी-कर्मचाऱ्यांना येणाऱ्या विविध अडचणींवरही चर्चा करण्यात आली. माहिती देताना येणाऱ्या अडचणी, माहिती अधिकार अधिनियमातील तरतुदींची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष कामकाजातील विविध बाबींविषयी  नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी तथा नोडल अधिकारी, माहिती अधिकार, पुणे महानगरपालिका यांनी मार्गदर्शन केले.

प्रश्नमंजुषेतून कायद्याची उजळणी

प्रशिक्षणानंतर माहिती अधिकार अधिनियमाच्या अनुषंगाने प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये जन माहिती अधिकाऱ्यांना माहिती अधिकार कायद्याशी संबंधित विविध प्रश्न विचारण्यात आले. योग्य उत्तर देणाऱ्या जन माहिती अधिकाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षीस स्वरूपात पेन देण्यात आले. या उपक्रमामुळे प्रशिक्षणाला अधिक उत्स्फूर्त स्वरूप प्राप्त झाले.पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांसह इतर कार्यालयांमध्येही माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. नागरिकांमध्ये माहिती अधिकाराबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरही आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त शुभेच्छा संदेश प्रसिद्ध करण्यात आला.

याशिवाय पुणे महानगरपालिकेच्या मुख्य पोर्चमध्ये आकर्षक रांगोळी काढून माहिती अधिकार दिनाच्या निमित्ताने नागरिक तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

माहिती अधिकार कायदा हा केवळ माहिती मिळविण्याचा अधिकार नसून पारदर्शक प्रशासन, उत्तरदायित्व आणि लोकशाहीतील नागरिकांच्या सहभागाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे या कायद्याची योग्य माहिती अधिकारी-कर्मचाऱ्यांना असणे आणि नागरिकांमध्येही त्याबाबत जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. पुणे महानगरपालिकेत आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणामुळे माहिती अधिकार अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीला निश्चितच चालना मिळण्यास मदत होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: