Naval Kishore Ram IAS | क्षेत्रीय कार्यालयांच्या कामांसाठी मुख्य खात्यांनी निधी वळवू नये; महापालिका आयुक्तांचे आदेश
आर्थिक नियोजनाच्या शिस्तीचा मुद्दा; मुख्य खात्यांना स्वतःच्या अंदाजपत्रकीय तरतुदी परस्पर उपलब्ध करून देण्यास मनाई
PMC Ward Office – The Karbhari News Service – पुणे महानगरपालिकेच्या मुख्य खाते आणि क्षेत्रीय कार्यालयांमधील आर्थिक तरतुदींच्या वापराबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. क्षेत्रीय कार्यालयांकडील विकासकामांसाठी मुख्य खात्यांनी स्वतःकडील अंदाजपत्रकीय तरतूद परस्पर उपलब्ध करून देऊ नये, असे स्पष्ट आदेश आयुक्तांनी दिले आहेत. आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने ही बाब उचित नसल्याचे नमूद करत त्यांनी सर्व संबंधित मुख्य खात्यांना याबाबत सूचना केल्या आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)
महापालिका आयुक्त कार्यालयाकडून यासंदर्भात कार्यालयीन परिपत्रक जारी करण्यात आले आहे. पुणे महापालिकेतील मुख्य खाते व क्षेत्रीय कार्यालयांमधील आर्थिक तरतुदींबाबत हे परिपत्रक आहे.
विभागांच्या सूचनेनुसार क्षेत्रीय कार्यालयांना तरतूद
पुणे महापालिकेमध्ये विविध विकासकामे सुरू असतात. या कामांसाठी मुख्य खाते तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांना संबंधित विभागांच्या सूचनेनुसार अंदाजपत्रकीय तरतूद उपलब्ध करून दिली जाते. मात्र, क्षेत्रीय कार्यालयांकडील कामांसाठी मुख्य खात्यांकडील अंदाजपत्रकीय तरतूद उपलब्ध करून दिली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
अशा प्रकारे मुख्य खात्यांनी स्वतःकडील अंदाजपत्रकीय तरतूद क्षेत्रीय कार्यालयांकडील कामांसाठी उपलब्ध करून देणे आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने योग्य नसल्याचे आयुक्तांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे.
आर्थिक नियोजनाच्या शिस्तीवर भर
महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध विभाग आणि कार्यालयांसाठी स्वतंत्रपणे आर्थिक तरतुदी करण्यात येतात. या तरतुदींचा वापर नियोजनानुसार होणे अपेक्षित आहे. मात्र, मुख्य खात्यांकडून क्षेत्रीय कार्यालयांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्यास अंदाजपत्रकीय नियोजनाच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका आयुक्तांनी घेतली आहे.
त्यामुळे यापुढे संबंधित मुख्य खात्यांनी स्वतःकडील अंदाजपत्रकीय तरतूद क्षेत्रीय कार्यालयांकडील कामांसाठी परस्पर उपलब्ध करून देऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

COMMENTS