Pune Grand Tour 2026 | ‘पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’च्या बोधचिन्हाचे आणि जर्सीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
| पुणे ग्रँड टूरमुळे पुण्यातील पर्यटन वाढेल; सायकलचे शहर ही जूनी ओळख पुन्हा प्रस्थापित होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Pune Grand Tour Cycle Rally – (The Karbhari News Service) – ‘बजाज पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’ या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या माध्यमातून पुण्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यटनस्थळांचे महत्व अधोरेखित होईल आणि पर्यटकांची संख्या वाढेल. राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल तसेच प्रदूषणावर मात करत पुण्याची “सायकलचे शहर” ही ओळख पुन्हा प्रस्थापित होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (CM Devendra Fadnavis)
राज्य शासन, पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या ‘बजाज पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’ चे बोधचिन्ह व जर्सी अनावरण समारंभात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आशियाई सायकलिंग महासंघाचे अध्यक्ष दातो अमरजीत सिंग गिल, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग, आशियाई सायकलिंग महासंघाचे माजी महासचिव ओंकारसिंग, मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सायकलचे माहेरघर असलेल्या पुण्यात ही खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. प्रदूषण आणि जीवनशैलीतील बदलांमुळे उद्भवणाऱ्या आजारांचा विचार करता सायकल चालविण्याला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. जगभरात सायकलस्वारांचा आदराने गौरव केला जातो. या पार्श्वभूमीवर ‘पुणे ग्रॅण्ड टूर’ सायकलिंग संस्कृतीला नवा आयाम देईल, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ही स्पर्धा पुण्याला जगाच्या नकाशावर घेऊन जाणारी ठरेल. देशात सायकल श्रीमंताचे वाहन म्हणून दीडशे वर्षांपूर्वी आली होती. त्यावेळी सायकल वापरण्यासाठी परवाना लागायचा. पुण्यात १९४७ साली पहिली सायकल स्पर्धा झाली होती. त्यामुळे पुण्याची ओळख ‘सायकलचे शहर’ म्हणून होती, आणि ही सायकल संस्कृती आजही शहराच्या अभिमानाचा भाग आहे. जागतिक वेळापत्रकात या स्पर्धेचा समावेश झाल्याने तिचे आयोजन अत्यंत यशस्वी ठरेल आणि ही स्पर्धा देशासाठी महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या ७७ वर्षीय सायकलपटू निरुपमा भावे, तसेच प्रीती म्हस्के, अहिल्यानगरच्या प्रणिती सोमण, छत्रपती संभाजीनगरचे भारत सोनवणे, जळगावचे आकाश म्हेत्रे आणि सोलापूरच्या पूजा दानोळे यांच्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांचे अभिनंदन केले.
सायकल स्पर्धा आरोग्य, रोजगार, पर्यटन आणि विकासाचा एकत्रित महोत्सव ठरेल-उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, ऐतिहासिक वारसा असलेल्या पुण्यातून ग्रॅण्ड चॅलेंज टूर सुरू होत असल्याने पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगातून जाणाऱ्या २०० हून अधिक गावांमधून ही खडतर स्पर्धा होणार आहे. ‘टूर द फ्रान्स’पासून प्रेरणा घेत आयोजित होणारी ही स्पर्धा म्हणजे केवळ क्रीडा नाही, तर पर्यावरण, आरोग्य आणि शाश्वत जीवनशैलीचे प्रतिक आहे.
या स्पर्धेसाठी भिमाशंकर,महाबळेश्वर आणि भंडारदरा परिसरातील ‘भारतीय शेकरू’ या दुर्मिळ प्रजातीवर आधारित बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे. याद्वारे ग्रामीण पर्यटनाला चालना मिळून रोजगारनिर्मिती होईल व राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. ही स्पर्धा म्हणजे आरोग्य, रोजगार, पर्यटन आणि विकासाचा एकत्रित महोत्सव ठरेल.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन होत असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्र्यांनी अल्पावधीत केलेल्या तयारीबद्दल जिल्हा प्रशासन व सर्व शासकीय यंत्रणांचे अभिनंदन केले. तसेच स्पर्धेच्या मार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे दर्जेदार पद्धतीने करण्याच्या सूचना दिल्या.
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती खडसे म्हणाल्या, देशात २०३६ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन आहे. विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताकडे वाटचाल करताना क्रीडा क्षेत्राचा वाटा मोठ्या प्रमाणावर राहणार आहे. रविवारी ५ ते ६ हजार ठिकाणी ‘सायकल ऑन संडे’ उपक्रम संपूर्ण देशभर राबविला जात आहे, ज्यामध्ये सुमारे ५ लाख सायकलपटू सहभागी होतात. या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘फिट इंडिया’हे स्वप्न पूर्ण होणार आहे.
केंद्र सरकारचे क्रीडा धोरण हे क्रीडा पर्यटनाच्या माध्यमातून देशभर पुढे नेण्यावर केंद्रित आहे. महाराष्ट्रात विविध पर्यटनस्थळे असल्याने ‘पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टूर’च्या माध्यमातून क्रीडा पर्यटनाचे उत्तम उदाहरण देशभर दिले जाईल. क्रीडा विज्ञान हे एक नवे क्षेत्र असून, त्याद्वारे राज्यातील खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा घडवून आणता येईल, असेही श्रीमती खडसे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पुणे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ‘पुणे ग्रॅण्ड टूर –२०२६’ची संकल्पना आणि तयारी विषयी माहिती दिली.
बोधचिन्ह, जर्सीचे अनावरण आणि शुभंकर प्रदर्शित
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री मंत्री श्रीमती खडसे, राज्यमंत्री श्रीमती मिसाळ व अन्य मान्यवरांच्या हस्ते ‘पुणे ग्रँड टूर -२०२६’ च्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर जंगलात आढळणाऱ्या शेकरूवर ( उडती खार ) आधारित स्पर्धेचे ‘ इंदू ‘ हे शुभंकर जारी करण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार सर्वश्री अमित गोरखे, राहूल कुल, सिद्धार्थ शिरोळे, बाबाजी काळे, शंकर मांडेकर, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार, क्रीडा व युवक सेवा आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ‘पुणे ग्रँड टूर -२०२६ चे मुख्य प्रयोजक बजाज, प्रयोजक सिरम इन्स्टिटयूट, चितळे बंधु आणि पंचशील ग्रुप यांनी केले असून यावेळी त्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

COMMENTS