गणेशोत्सवात २ लाख ९२ हजार ६७७ किलो जमा झाले निर्माल्य
: 1 लाखापेक्षा अधिक मूर्ती संकलित
: महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
पुणे: यंदाच्या गणेश उत्सवात पुणेकरांनी महापालिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला. परंपरेचे भान जपत हा गणेशोत्सव साजरा झाला. गणेशोत्सवात २ लाख ९२ हजार ६७७ किलो निर्माल्य जमा झाले. तर मूर्ती संकलन केंद्रात 1 लाखपेक्षा अधिक गणेश मूर्ती संकलित झाल्या. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
: घरच्या घरी केले विसर्जन
गणेशाला निरोप देताना नदीपात्रातील विसर्जन घाटावर आणि कृत्रिम हौदात दरवर्षी मोठी गर्दी होत असते. मात्र गेल्यावर्षीसह यंदाच्या वर्षीही घरच्या घरी विसर्जन, मूर्ती संकलन केंद्र आणि फिरते हौद असे तीन पर्याय पुणेकरांना उपलब्ध करुन देण्यात आले होते. या तिन्ही पर्यायांना पुणेकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण केलेल्या संकल्पाला प्रतिसाद दिल्याबद्दल पुणेकरांचे आभार मानावेत तितके कमी आहेत. घरच्या घरी विसर्जन करता यावे, यासाठी २७७ केंद्रांवर ९६ हजार २०३ किलो अमोनियम बायकार्बोनेट वितरीत करण्यात आले होते. शिवाय फिरत्या हौदांची सोय करताना घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ६०, नगरसेवकांनी उपलब्ध करुन दिलेले ८४ आणि क्षेत्रिय कार्यालय पातळीवरील ७३ असे एकूण २१७ फिरते हौद उपलब्ध करण्यात आले होते. यामुळे नागरिकांना विसर्जनाची उत्तम सोय उपलब्ध झाली.
‘कोरोनाच्या संकटकाळी आपण सर्वांनी केलेल्या संकल्पानुसार यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला. यंदाचा उत्सव धार्मिक आणि पारंपारिक पध्दतीने, मंगलमय वातावरणात आणि सामाजिक भान जपत सर्वांनी साजरा केला. यासाठी सर्व पुणेकर आणि गणेशोत्सव मंडळांनी मनस्वी साथ दिली. सर्वच पुणेकर तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, पोलीस आणि महापालिका प्रशासनाचे आभार मानण्याऐवजी मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो, असेही महापौर मोहोळ म्हणाले.
◆ संकलित मूर्तींची संख्या
१ लाख ०६ हजार ३१६
◆ फिरत्या हौदातील संख्या
१ लाख ४४ हजार ८०५
◆ एकूण
२ लाख ५१ हजार १२१
◆ जमा झालेले निर्माल्य
२ लाख ९२ हजार ६७७ किलो
COMMENTS