Pune Breaking News | पावसाचे साचलेले पाणी, उष्णता आणि हवा प्रदूषणामुळे पुण्यात ‘या’ आजारांचा धोका वाढणार
| महापालिकेच्या पर्यावरण अहवाल 2025-26 मधून चिंता व्यक्त
| लेप्टो, टीबी, दमा आणि उष्माघाताचा धोका अधिक
By Ganesh Mule.
Pune News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या ‘पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल 2025-2026’ मध्ये शहरातील आरोग्य व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा वाजवण्यात आली आहे. पावसाळ्यात ठिकठिकाणी साचणारे पाणी, उन्हाळ्यात वाढणारी उष्णता आणि हवा प्रदूषण यामुळे लेप्टोस्पायरोसिस, क्षयरोग, श्वसनविकार आणि उष्णता-संबंधित आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. (PMC ESR 2025-26)
भविष्यात लक्ष ठेवावे लागणारे 4 आजार
महापालिकेने अहवालात 4 आजारांबाबत विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
लेप्टोस्पायरोसिस – प्राणिजन्य – उंदीर किंवा इतर प्राण्यांच्या लघवीने दूषित पाणी पावसाळ्यात पाणी साचणे, उंदरांची वाढ आणि भटक्या प्राण्यांचा संपर्क. घनकचरा आणि पर्जन्यजल निचऱ्याशी संबंध
क्षयरोग (टीबी)- श्वसनमार्गे – घरातील गर्दी, अपुरे वायुविजन आणि पोषणस्थिती.
हवा प्रदूषणाशी संबंधित श्वसनविकार – PM2.5 आणि PM10 पातळीशी थेट संबंध. उच्च प्रदूषणाच्या काळात रुग्णालयांवरील ताण वाढण्याची शक्यता
उष्णता-संबंधित आजार – वाढते उन्हाळी तापमान आणि शहरी उष्णता बेट परिणाम. उष्माघात/थकवा यांचे प्रमाण वाढू शकते
काय म्हणतो अहवाल?
1. लेप्टोचा धोका: पावसाळ्यात रस्त्यांवर आणि सखल भागात पाणी साचते. त्यात उंदरांच्या लघवीमुळे लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग होतो. घनकचरा व्यवस्थापन आणि पाणी निचरा यावर काम करणे आवश्यक आहे.
2. टीबी वाढण्याची भीती: दाट लोकवस्ती, घरात अपुरी हवा आणि कुपोषण यामुळे टीबीचा प्रादुर्भाव वाढतो. महापालिकेचा क्षयरोग विभाग ‘निक्षय/टीबी-मुक्त भारत अभियान’ अंतर्गत काम करत आहे.
3. हवा प्रदूषणाचा परिणाम: शहरातील वाढत्या PM2.5 आणि PM10 पातळीमुळे दमा, COPD सारखे श्वसनविकार तीव्र होत आहेत. प्रदूषण वाढल्यास महापालिका रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागावर ताण वाढेल, असा इशारा देण्यात आला आहे.
4. उष्माघाताचा धोका : जागतिक तापमानवाढ आणि शहरीकरणामुळे उन्हाळ्यात तापमानात वाढ होत आहे. यामुळे उष्माघात आणि थकवा यांसारखे आजार वाढू शकतात. महापालिकेची ‘उष्णता कृती योजना’ आणि रुग्णालयांतील आकडेवारी यापुढे अधिक महत्वाची ठरणार आहे.
अहवालात या सर्व आजारांचा पर्यावरणाशी थेट संबंध असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पाणी साचू न देणे, घनकचरा उचलणे, हिरवळ वाढवणे, सार्वजनिक वाहतूक बळकट करणे आणि उष्णता कृती योजना प्रभावीपणे राबवणे यावर भर देण्याची गरज आहे, असे सुचवण्यात आले आहे.

COMMENTS