Pramod Nana Bhangire | हडपसर मतदार संघातील पाणीकपातग्रस्त भागात आणखी कपात नको | अन्यथा आंदोलनाचा प्रमोद नाना भानगिरे यांचा इशारा
Pune Water Supply – (The Karbhari News Service) – हडपसर मतदारसंघातील काही भागांमध्ये कायमस्वरूपी सुरू असलेल्या पाणीकपातीत आता आणखी वाढ केल्यास नागरिकांना चार दिवसांपर्यंत पाणी मिळणार नाही. अशी परिस्थिती निर्माण होणार असल्याने जास्तीची पाणीकपात करू नये, अशी मागणी शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केली आहे. तसे झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. (Hadapsar Constituency Water Issue)
भानगिरे यांनी सांगितले की, मतदार संघातील काळेपडळ, हांडेवाडी, सातवनगर, १५ नंबर, मोहम्मदवाडी, मांजरी आणि केशवनगर या भागांमध्ये आधीपासूनच पाणीकपात सुरू आहे. या भागातील नागरिकांना नियमित आणि पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही.
“हा प्रश्न नवीन नाही. या भागात वर्षभर पाणीकपात कायम असते. नागरिक टँकरवर अवलंबून राहत आहेत,” असे त्यांनी सांगितले.
महापालिका प्रशासनाने आता संपूर्ण शहरासाठी एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जिथे आधीच पाणीकपात सुरू आहे, तिथे हा निर्णय लागू केल्यास परिस्थिती अधिक बिकट होईल, असा इशारा भानगिरे यांनी दिला.
“आधीच ज्या भागात पाणी कमी मिळते, तिथे एक दिवस आडचा निर्णय लागू केल्यास लोकांना चार दिवस पाणी मिळणार नाही. त्यामुळे या भागांना जास्तीच्या पाणीकपातीतून वगळावे,” अशी मागणी त्यांनी केली.
हडपसरमधील पाणीकपातग्रस्त नागरिकांच्या बाजूने प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे भानगिरे यांनी स्पष्ट केले.
पुणे शहरात पाणीटंचाई आणि पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकावरून प्रशासन आणि नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.

COMMENTS