बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा फेरविचार करा.
– आमदार मोहन जोशी
पुणे – महापालिकेची निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने घेण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावाच, अशी मागणी माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी मुख्य मंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे.
: आग्रही मागणी करणार
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली उद्या (गुरुवारी) मुंबईत होत आहे. या बैठकीतही बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा फेरविचार करावा अशी आग्रही मागणी करणार असल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.
महापालिकेच्या निवडणुका एक किंवा द्विसदस्यीय पद्धतीने व्हाव्यात अशी मागणी आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने भाजपचे राजकारण साधण्यासाठी चार सदस्यांचा एक प्रभाग अशा पद्धतीने निवडणुका घेतल्या. भाजपचे राजकारण साधणे एवढाच एक हेतू त्यामागे होता. त्यांचे राजकारण कदाचित साधले असेल पण शहर विकासाचा बट्ट्याबोळ झाला. एकाच प्रभागात एकाच पक्षाचे चार सदस्य असूनही त्यांच्यातील सुप्त संघर्षामुळे पालिका प्रशासनावर ताण आला. कामाचे प्राधान्यक्रम ठरविताना अधिकाऱ्यांच्याही नाकी नऊ आले. त्यामुळे, चार सदस्यांचा किंवा बहुसदस्यीय प्रभाग नको अशी मागणी अनेक सूज्ञ नागरिकांनी, जाणकारांनी केली आहे. दोन सदस्यांचा एक प्रभाग यावर साधारणतः सर्व पक्षात ऐक्य दिसून येत आहे. हे लक्षात घेऊन सरकारने एक किंवा जास्तीत जास्त दोन सदस्यांचा एक प्रभाग असा निर्णय करावा, असे माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
COMMENTS