PMPML Pune | ‘पीएमपीएमएल’ प्रवास दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून अनोखे निषेध आंदोलन
PMP Ticket Price Hike – (The Karbhari News Service) – ‘पीएमपीएमएल’ प्रशासनाने बस प्रवासदरात अन्यायकारक वाढ करून सर्वसामान्य पुणेकरांच्या खिशावर दरोडा टाकण्याचे काम केले आहे. प्रशासनाच्या या मनमानी निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गुरुवारी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी व घोडागाडीतून प्रवास करीत निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी राज्यातील महायुती सरकारमधील तिन्ही पक्ष व नेत्यांच्या विरोधात तसेच पुण्याचे खासदार व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. (NCP-SCP Pune)
प्रशांत जगताप म्हणाले, पुणेकरांची भरभरून मते घेऊन गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या राज्य व केंद्र सरकारने आता मात्र पुणेकरांना वाऱ्यावर सोडले आहे. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य जनतेचा प्रवासही आता राज्यातील महायुती सरकारने त्रासदायक करून ठेवला आहे. प्रवासदरात झालेली भरमसाठ दरवाढ नियमितपणे बसने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारी नाही. ‘पीएमपीएमएल’ प्रशासन हा निर्णय घेऊन पुन्हा एकदा पुणेकरांना जुन्या पुण्यात होत असलेल्या प्रवासाचाच मार्ग उपलब्ध असल्याचे संकेत दिल्याने पक्षाच्या वतीने बैलगाडी व घोडागाडीतून प्रवाशांना प्रवास घडवून आणण्यात आला. पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर झालेल्या या आंदोलनावेळी पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांनी घोडागाडी, बैलगाडीतून स्वत: प्रवास करीत व प्रवाशांना प्रवास करायला लावून अनोखे आंदोलन करीत प्रशासनाला प्रतीकात्मक चपराक लगावली. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पीएमपीएमएल बस ही पुण्याची जीवनवाहिनी आहे. दररोज लक्षावधी पुणेकर बसप्रवास करीत असतात. परंतु, प्रशासनाने बससेवा ही मूलभूत सेवा असून, ती कल्याणकारी भावनेने राबविण्याऐवजी मनमानी कारभार करीत भरमसाठ दरवाढ केली आहे. त्याचा फटका सर्वसामान्य पुणेकरांना बसत आहे. त्यामुळे, ही दरवाढ त्वरित रद्द करावी व तत्काळ जुनेच दर लागू करावेत, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली.
या वेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार जयदेवराव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष रवींद्र माळवदकर, उदय महाले, निलेश निकम, श्रीकांत पाटील, औदुंबर खुणे पाटील, रोहन गायकवाड, योगेश पवार, वसुंधरा निर्भवणे, सुवर्णा सावर्डे, आशा साने, सुवर्णा माने, स्वाती पोकळे, वैशाली थोपटे, प्रभावती भूमकर, किशोर कांबळे, आनंद सवाणे, पोपटराव खेडेकर, वैजनाथ वाघमारे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS