PMC Water Meter | पाणी मीटर बसविण्यातील त्रुटी तात्काळ दूर करा – माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन
Dr Siddharth Dhende – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या 24 बाय 7 समान पाणी मीटर योजनेत गेल्या सात वर्षांपासून नागरिकांना अपेक्षित सेवा मिळत नाही, अशी तक्रार समोर आली आहे. या योजनेत दररोज 135 लिटर पाणीप्रमाणे प्रत्येकास पुरवठा होणे अपेक्षित असतानाही अनेक ठिकाणी कमी प्रमाणात पाणी मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. पाणी मीटर बसविण्यातील त्रुटी तात्काळ दूर करा, अशी मागणी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदनाद्वारे केली. (PMC Water Supply Department)
डॉ. धेंडे यांनी दिलेल्या पत्रात या तक्रारींवर गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी पत्रात नमूद केले आहे की, अनेक सोसायट्यांमध्ये पाणी मीटर बसवले असले तरी अंतर्गत टाक्यांमध्ये गळती किंवा तपासणी अभावामुळे नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. परिणामी काही ठिकाणी दोन दिवसांतून एकदाच पाणी येत असून, पुरवठा होताना दाबही कमी असतो. नागरिकांकडून पाणी कर घेत असताना सेवा दर्जेदार मिळणे अपेक्षित आहे. मात्र पाणी मीटर बसविल्यानंतर महापालिकेच्या पाणी विभागाकडून त्यांची योग्य तपासणी केली जात नाही. समप्रमाणात पाणी मिळत नाही. तरीही नागरिकांना जास्त बिल भरावे लागते पण पाणी कमी मिळते.
माझ्या प्रभागांमधील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड मधील सोसायटीत तळमजल्याला पाणी जास्त प्रमाणात येते. वरच्या मजल्याला पाणी अतिशय कमी प्रमाणात येते. तर तेथे समान वाटप सोसायटीमध्ये होत नाही. त्यामुळे जे काही पाण्याचे मीटरचे बिल आहे ते देखील समान देणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्या लोकांना पाणी मिळत नाही त्यांना देखील कर द्यावा लागतो हे चुकीचे आहे.
त्यामुळे, या विषयावर संबंधित सर्व विभागांची बैठक घेऊन नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी डॉ. धेंडे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

COMMENTS