PMC Sus Garbage Project | सूस घनकचरा प्रकल्प आजच बंद करा | नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी
| मंत्र्यांनीच अशी मागणी केल्याने पालिका प्रशासन अडचणीत
Chandrakant Patil – (The Karbhari News Service) – नामदार चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) हे सूस घनकचरा प्रकल्पावरुन (Sus Garbage Project) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आजच प्रकल्प बंद न झाल्यास, उद्या सदर प्रकल्पाविरोधात खूर्ची टाकून बसण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा पाटील यांनी प्रशासनाला दिला. मात्र मंत्र्यांनीच अशी मागणी केल्याने आता पालिका प्रशासन अडचणीत सापडले आहे. कारण प्रकल्प बंद झाला तर कचरा कुठे जिरवायचा हा प्रश्न उरतो. या प्रकल्पात जवळपास १५० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. प्रकल्प बंद झाला तर परिसरातील नागरिकांची अडचण होणार आहे. याकडे देखील राजकीय नेते लक्ष देणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. (PMC Solid Waste Management Department)
सूस रस्त्यावरील ओल्या कचऱ्यापासून सीएनजी तयार करण्याचा प्रकल्प बंद करण्याची सातत्याने मागणी होत आहे. सदर प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद करुन नांदे-चांदे येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय जानेवारी २०२४ मध्ये झाला होता. त्याअनुषंगाने चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांच्या सोबत आज बैठक झाली. या बैठकीत ना. पाटील यांनी सदर प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावर प्रशासनाने पाटील यांनी माहिती दिली.
याबाबत प्रशासनाकडून सांगण्यात आले कि, सदर प्रकल्पाच्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार सुधारणा केल्या आहेत. तसेच प्रकल्प स्थलांतरीत करण्या बाबत जिल्हाधिकारी कार्यालया कडून जागा ताब्यात आली नसल्याने स्थलांतर रखडले आहे. यावर लवकरच कार्यवाही केली जाईल. असे प्रशासना कडून सांगण्यात आले.
आम्ही या प्रकल्पाची सविस्तर माहिती घेत आहोत. जर तेथील नागरिकांना या प्रकल्पाचा त्रास होत असेल तर आम्ही तो प्रकल्प स्थलांतरित करू.
- डॉ राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे महापालिका.
COMMENTS