PMC Standing Committee | शहर स्वच्छतेची जबाबदारी आता ठेकेदारांवर | रस्ते झाडणकामासाठी ४,७०९ कामगारांची वाढ
प्रथमच दंडात्मक कारवाईची तरतूद, स्थायी समितीची मान्यता
Pune PMC News – (The Karbhari News Service) – शहरातील स्वच्छतेबाबत सातत्याने होत असलेल्या तक्रारी, झाडणकामातील अनियमितता आणि ठेकेदारांवरील प्रभावी नियंत्रणाचा अभाव लक्षात घेऊन पुणे महापालिकेने रस्ते झाडणकामाच्या व्यवस्थेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांसाठी नवीन झाडणकाम प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्याअंतर्गत ४,७०९ अतिरिक्त कंत्राटी कामगारांची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर प्रथमच टप्प्याटप्प्याने दंड आकारण्याची आणि वारंवार निष्काळजीपणा झाल्यास ठेका रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. असे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. (Pune Municipal Corporation – PMC)
पुणे महापालिका हद्दीत १५ क्षेत्रीय कार्यालये असून सुमारे ५७४ चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामार्फत निविदा प्रक्रियेद्वारे झाडणकामासाठी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठेकेदारांकडून कंत्राटी कामगार पुरविले जात असून त्यांच्या कामावर मुकादम, आरोग्य निरीक्षक, विभागीय आरोग्य निरीक्षक आणि क्षेत्रीय अधिकारी यांचे नियंत्रण असते.
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांकडून लेखी अर्ज, ई-मेल, व्हॉट्सॲप, हेल्पलाइन आणि दूरध्वनीद्वारे स्वच्छतेबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. वृत्तपत्रे, डिजिटल माध्यमे आणि सामाजिक माध्यमांवरही शहरातील अस्वच्छतेचे प्रश्न सातत्याने समोर येत आहेत. अनेक ठिकाणी झाडणकाम वेळेवर होत नसल्याने कचऱ्याचे ढीग साचत असून काही भाग कायमस्वरूपी ‘क्रॉनिक स्पॉट’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. त्यामुळे नागरिकांसह लोकप्रतिनिधींच्या नाराजीला महापालिकेला सामोरे जावे लागत आहे.
महापालिकेने केलेल्या कारणमीमांसेनुसार शहराचा वाढलेला विस्तार, वाढती लोकसंख्या, नव्याने विकसित झालेले रस्ते आणि उपलब्ध मनुष्यबळाची कमतरता यामुळे सध्याची कर्मचारी संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे झाडणकामाची गुणवत्ता सुधारण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तक्रार निवारणासाठीही निश्चित कालमर्यादा ठरविण्यात आली आहे. हेल्पलाइन, मोबाईल ॲप किंवा इतर माध्यमांतून प्राप्त होणाऱ्या सामान्य तक्रारी १२ तासांत, तातडीच्या तक्रारी सहा तासांत आणि अतितातडीच्या तक्रारी दोन तासांत निकाली काढणे संबंधित ठेकेदारांना बंधनकारक राहणार आहे.
विशेष म्हणजे, झाडणकामाच्या निविदांमध्ये यापूर्वी काम योग्य प्रकारे न केल्यास ठेकेदारांवर दंड आकारण्याची कोणतीही स्पष्ट तरतूद नव्हती. परिणामी, संबंधित भागातील आरोग्य निरीक्षक किंवा वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांनाच जबाबदार धरले जात होते. आता मात्र स्वच्छतेची थेट जबाबदारी ठेकेदारांवर निश्चित करण्यात आली आहे. महापालिकेने या अतिरिक्त ४,७०९ कामगारांच्या नियुक्तीस मान्यता दिली असून त्यासाठी ठेकेदारांना दरमहा सुमारे १३.७८ कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम अदा करण्यात येणार आहे. शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक जबाबदार, उत्तरदायी आणि परिणामकारक बनविण्याच्या दृष्टीने हा प्रायोगिक प्रकल्प महत्त्वाचा मानला जात असून त्याच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर पुढील धोरण निश्चित केले जाणार आहे.
—
अन्यथा ठेकेदाराचा ठेका थेट रद्द
प्रायोगिक प्रकल्पाच्या पहिल्या महिन्यात दंडातून सूट देण्यात येणार असली, तरी त्यानंतरच्या दोन महिन्यांत अस्वच्छता आढळल्यास कडक दंड आकारला जाणार आहे. प्रथम वेळी एक हजार रुपये, दुसऱ्या वेळी दोन हजार, तिसऱ्या वेळी तीन हजार, चौथ्या वेळी दहा हजार, पाचव्या वेळी ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. सहाव्यांदा संबंधित ठेकेदाराचा ठेका थेट रद्द करण्यात येणार आहे.
—
झाडणकामासाठी जवळपास दुप्पट मनुष्यबळ
घनकचरा व्यवस्थापन विभागाने सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांकडून झाडणकाम करावयाच्या रस्त्यांची माहिती मागविली होती. त्यानुसार शहरातील झाडणकामासाठी पात्र रस्त्यांची एकूण लांबी ६,५०८ किलोमीटर इतकी आहे. प्रत्येक ७०० मीटरचा एक ‘बीट’ गृहीत धरल्यास शहरात एकूण ९,२९८ बीट तयार होतात. सध्या झाडणकामासाठी ४,८१४ कामगार उपलब्ध असून सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी आणखी ४,७०९ कामगारांची मागणी केली होती. ती मान्य करण्यात आली असून त्यामुळे झाडणकामासाठी उपलब्ध मनुष्यबळ जवळपास दुप्पट होणार आहे.
—
स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदारावर
या नव्या व्यवस्थेनुसार संबंधित परिसरातील स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदारावर राहणार आहे. कामाच्या देखरेखीसाठी प्रत्येक २५ कामगारांमागे एक सुपरव्हायझर, आठ सुपरव्हायझरमागे एक गटप्रमुख आणि प्रत्येक प्रभागासाठी एक व्यवस्थापक नेमण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे कामावर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

COMMENTS