PMC Standing Committe | संभाजी महाराज पार्किंगची पुनर्बांधणी; शहरातील पार्किंग क्षमता वाढविणार | स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

HomeBreaking News

PMC Standing Committe | संभाजी महाराज पार्किंगची पुनर्बांधणी; शहरातील पार्किंग क्षमता वाढविणार | स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

Ganesh Kumar Mule Jun 11, 2026 9:12 PM

Maharashtra Budget 2026-27 | राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्यासाठी काय आहे?
Pune Municipal Corporation (PMC) – सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश | ‘The कारभारी’ ने लावून धरला होता विषय 
PMC Sky Sign Department | राजकीय पक्षांनी  अनधिकृत होर्डिंग उभारल्यास कारवाई करण्याचे पुणे महापालिका आकाशचिन्ह विभागाचे आदेश

PMC Standing Committe | संभाजी महाराज पार्किंगची पुनर्बांधणी; शहरातील पार्किंग क्षमता वाढविणार | स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

 

Shrinath Bhimale PMC – (The Karbhari News Service) – शहरातील वाढत्या वाहतूक आणि पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिकेने विविध ठिकाणांवरील पार्किंग सुविधांचा विस्तार करण्याचे नियोजन हाती घेतले आहे. त्याअंतर्गत संभाजी महाराज मल्टी लेव्हल पार्किंगची पुनर्बांधणी करून अधिक क्षमतेचे बहुमजली पार्किंग उभारण्याचा विचार सुरू असून, शहरातील इतर प्रमुख भागांमध्येही ‘बांधा वापरा आणि हस्तातंरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर नवीन पार्किंग सुविधा उभारण्याचा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. (Pune PMC News)

पुणे शहरात वाढत्या वाहनांमुळे निर्माण झालेली कार पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज उद्यान, जंगली महाराज रस्ता येथे जुने आणि वापरासाठी अयोग्य झालेले मल्टी लेव्हल पार्किंग स्थळ पाडून त्याजागी नवे आधुनिक मल्टी लेव्हल कार पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता.  राष्ट्रवादी कॉंग्रेस चे नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांनी हा प्रस्ताव मांडला. शहरातील विविध ठिकाणी आधुनिक मल्टी लेव्हल कार पार्किंग स्थळांची गरज लक्षात घेऊन प्रशासनाने या जागेवर नव्याने पार्किंग उभारण्याचे नियोजन करावे, अशी मागणी  करण्यात आली आहे.

यावर  आज स्थायी समिती बैठकीत चर्चा झाली. सध्या  बंद असलेले संभाजी महाराज मल्टी लेव्हल पार्किंग पाडून त्या जागेवर अधिक वाहनक्षमतेचे आधुनिक बहुमजली पार्किंग उभारण्याचा विचार प्रशासनाकडून केला जात आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येचा आणि बदलत्या आकारमानाचा विचार करून नव्या पार्किंगची रचना करण्यात येणार आहे. विशेषतः मोठ्या वाहनांच्या उंचीचा विचार करून बांधकामाचे नियोजन केले जाणार असल्याचे अध्यक्ष भिमाले यांनी सांगितले.

याशिवाय मंडई, नारायण पेठ आणि संभाजी उद्यान परिसरातही पार्किंग सुविधा वाढविण्याचा विचार सुरू आहे. या प्रकल्पांसाठी बीओटी तत्त्वाचा अवलंब करण्याचा प्रस्ताव असून त्यामुळे महापालिकेला थेट आर्थिक खर्च करावा लागणार नाही. खासगी सहभागातून पार्किंग सुविधा उभारून त्याचे संचालन ठरावीक कालावधीसाठी संबंधित संस्थेकडे देण्याचा पर्याय प्रशासन विचाराधीन आहे.

शहरातील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून वाहनचालकांना पार्किंगसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर पार्किंग क्षमतेत वाढ करण्यासाठी सर्वंकष नियोजन करण्यात येत असल्याचे समितीचे अध्यक्ष भिमाले यांनी सांगितले.

या संदर्भातील सविस्तर प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर सादर केला जाणार आहे. अहवालातील शिफारशींनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असून त्यानंतर संबंधित प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात येणार असल्याचे भिमाले यांनी स्पष्ट केले. शहरातील वाढत्या वाहनसंख्येच्या पार्श्वभूमीवर पार्किंग व्यवस्थेचे आधुनिकीकरण आणि क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने महापालिकेची ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: