PMC Standing Committee | सुक्या कचऱ्याच्या वाहतूक व प्रक्रियेसाठी ६.८३ कोटींच्या ठेक्याचा प्रस्तावाला मान्यता | प्रस्तावाला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ने केला विरोध
Pune PMC News – (The Karbhari News Service) – शहरात दररोज निर्माण होणाऱ्या किमान ३०० मेट्रिक टन सुक्या कचऱ्याच्या संकलन, वाहतूक आणि सिमेंट उद्योगांमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रियेसाठी पुणे महापालिकेने ६ कोटी ८३ लाख ६४ हजार रुपयांचा ठेका देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता, या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. (Shrinath Bhimale PMC)
या कामासाठ भूमी ग्रीन एनर्जी एनव्हारोकेअर एलएलपी या संस्थेची निवड करण्यात आली असून, प्रति मेट्रिक टन ८४४ रुपये दराने काम करण्याची शिफारस प्रशासनाने केली आहे. दरम्यान या या प्रस्तावाला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला. अखेरीस ९ विरुद्ध ४ असा हा प्रस्ताव मंजूर झाला.
रॅम्प, ट्रान्सफर स्टेशन किंवा महापालिकेने निश्चित केलेल्या अन्य ठिकाणांहून दररोज किमान ३०० मेट्रिक टन सुक्या कचऱ्याचे संकलन करून तो सिमेंट उद्योगांपर्यंत पोहोचविणे आणि त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. हा करार सहा महिन्यांसाठी असून आवश्यकतेनुसार पुढील तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याची तरतूद आहे. या कालावधीत एकूण ८१ हजार मेट्रिक टन कचऱ्याची वाहतूक व प्रक्रिया केली जाणार आहे.
महापालिका आयुक्तांनी ९ जून २०२६ रोजी या कामास प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात केवळ एकच निविदा प्राप्त झाल्याने फेरनिविदा मागविण्यात आली. फेरनिविदेनंतरही मे. भूमी ग्रीन एनर्जी एनव्हारोकेअर एलएलपी या संस्थेचीच एकमेव पात्र निविदा प्राप्त झाली. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची छाननी करून २५ जून रोजी व्यापारी लिफाफा उघडण्यात आला. निविदा समितीने २९ जून रोजी संबंधित दरास मान्यता दिली.
या कामासाठी ६ कोटी ८३ लाख ६४ हजार रुपये (जीएसटी वगळून) खर्च अपेक्षित आहे. हा खर्च घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या “समाविष्ट गावे सुस, महाळुंगे, बावधन, कोंढवे धावडे येथील प्रकल्प, सिमेंट कंपनी व कात्रज येथील एक्सेल कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी टिपिंग फी अदा करणे” या अर्थशीर्षाखालील निधीतून करण्यात येणार आहे. या अर्थशीर्षाखाली सन २०२६-२७ मध्ये ८.५ कोटी रुपयांची तरतूद असून, आवश्यकतेनुसार अतिरिक्त निधी वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनाने हे काम अत्यावश्यक स्वरूपाचे असल्याचे नमूद करत १ जुलै २०२६ पासून काम सुरू करून घेण्यास तसेच संबंधित संस्थेशी करार करण्यासाठी स्थायी समितीची मंजुरी मागितली आहे. प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता मिळाल्यानंतर संबंधित संस्थेकडून प्रत्यक्ष काम हाती घेतले जाणार आहे.
——–
विरोध झाल्याने घ्यावे लागले मतदान
याबाबत स्थायी समिती सदस्य प्रशांत जगताप यांनी सांगितले कि, अनेक महिन्यांपासून भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाचा प्रस्ताव प्रलंबित होता. पुणे महानगरपालिका स्थायी समितीच्या बैठकीत आज हा प्रस्ताव चर्चेला आला.
उरुळी देवाची येते असलेला भूमीग्रीन कंपनीचा कचरा प्रकल्प नूतनीकरणासाठी बंद करण्यात येत आहे. म्हणूनच पुढील ९ महिन्यांसाठी भूमीग्रीन कंपनीला सध्या उरुळी देवाची येथे अस्तित्वात असलेल्या कचरा डेपोच्या शेजारची जागा तात्पुरत्या स्वरूपात देण्याबाबत हा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या बैठकीत चर्चेला आला. या प्रस्तावाला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला. अखेरीस ९ विरुद्ध ४ असा हा प्रस्ताव मंजूर झाला.
जगताप पुढे म्हणाले, “मुळातच पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून भूमीग्रीन कंपनीला झुकते माप देण्यात येत आहे. या प्रकल्पाला सध्याच्या कचरा प्रकल्पासाठीही वाढीव दर देण्यात येत आहे. जुन्या प्रकल्पाचे नूतनीकरण होईपर्यंत नवीन तात्पुरत्या प्रकल्पासाठी भूमीग्रीन कंपनीकडून शेड उभारले जातील, नवीन मशिनरी घेतली जाईल आणि कालांतराने याच जागेत नवीन कचरा प्रकल्पाचे काम आपसुकच भूमीग्रीन कंपनीला दिले जाईल अशी आमची शंका नव्हे, तर खात्री आहे. भूमीग्रीन कंपनीचा प्रकल्प नूतनीकरणासाठी जर काही महिने बंद राहणार असेल, तर भूमीग्रीन कंपनी सोडून सध्या पुणे महानगरपालिकेसोबत काम करणाऱ्या इतर कंपन्या वाढीव कचरा उचलण्यासाठी तयार आहेत, तशी मागणी करणारी पत्रेही अनेक कंपन्यांनी मनपा प्रशासनाला दिली आहेत. तरीही भूमीग्रीन कंपनीलाच पर्यायी जागा देण्याचे औदार्य महानगरपालिका प्रशासन का दाखवत आहे ? हा मुख्य प्रश्न आहे. एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे.” अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.
या प्रस्तावाच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने प्रशांत जगताप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वैशाली बनकर, अमोल बालवडकर, सुहास टिंगरे यांनी मतदान केले.

COMMENTS