Pune Congress on NEET | राजभवनासमोर झेंडे दाखवून पुणे काँग्रेसकडून निषेध

HomeBreaking News

Pune Congress on NEET | राजभवनासमोर झेंडे दाखवून पुणे काँग्रेसकडून निषेध

Ganesh Kumar Mule Jul 22, 2026 9:56 PM

All Sets High School 10th Results | ऑल सेट्स हाय स्कूल चा दरवर्षीप्रमाणे 100% टक्के निकाल!
Dr Abhijit Chaudhari | पीएमआरडीए च्या महानगर आयुक्त पदी डॉ अभिजित चौधरी! 
Illegal Hoardings | आरक्षित जागेवर अनधिकृत होर्डिंग्स | प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात जनआंदोलन

Pune Congress on NEET | राजभवनासमोर झेंडे दाखवून पुणे काँग्रेसकडून निषेध

: विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन; प्रधान, मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी

Pune News – (The Karbhari News Service)  – नीट परीक्षेतील पेपरफूटी आणि दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राजभवनाच्या प्रवेशद्वारावर काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. (Prashant Jagtap – Dipti Chavdhari)

केंद्रातील मोदी सरकारने विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर बळाचा वापर केला, असा आरोप करत या आंदोलनातून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

दिल्लीतील आंदोलनापासून पुण्यापर्यंत पडसाद
देशातील विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततेने आंदोलन करत असताना त्यांच्यावर क्रूरपणे हल्ला करण्यात आला, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. या अमानुष अत्याचाराच्या विरोधात देशाचे नेते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार प्रियांका गांधी यांनीही पंतप्रधान निवासस्थानासमोर आंदोलन केले होते. त्यांच्यावरही पोलीस बळाचा वापर झाल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

पुणे हे विद्यार्थी चळवळीचे केंद्र असल्याने येथूनही आवाज बुलंद करण्याची गरज असल्याचे सांगत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने हे आंदोलन आयोजित केले.

यावेळी बोलताना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पूर्व विभागाचे अध्यक्ष आणि माजी महापौर *प्रशांत जगताप* म्हणाले, “पंतप्रधान मोदी सरकार भ्रष्टमुक्त असल्याचा दावा करते. मात्र त्यांच्या कार्यकाळात पेपरफूटीच्या घटना वाढल्या आहेत. राम मंदिराच्या दानपेटीतून 1400 कोटी रुपये चोरीला गेल्याची घटनाही याच काळात घडली. या सर्व प्रकारांना जबाबदार असलेल्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा.”

पश्चिम विभागाच्या अध्यक्षा *दीप्ती चवधरी* म्हणाल्या, “गेल्या एक महिन्यापासून विद्यार्थी जंतर मंतरवर ठिय्या आंदोलन करत आहेत. लाखो विद्यार्थी नीटसाठी 9 ते 10 तास अभ्यास करतात. मात्र केंद्र सरकार पेपरफूटी रोखण्यात अपयशी ठरले आहे. या प्रकरणात कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयांच्या प्राध्यापकांनी पैशासाठी साखळी तयार केली. पेपरफूटीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. अशा संवेदनशील विषयाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.”

आंदोलनाच्या शेवटी 22 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या घटनांबाबत जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही करण्यात आली.

या आंदोलनात पुणे शहर काँग्रेसच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी, नीताताई राजपूत, अविनाश साळवे, रफिकभाई शेख, अविनाश बागवे, मेहबूब नदाफ, मोहसीन शेख, लताताई राजगुरू, भाऊसाहेब आजबे, प्रियंका रनपिसे, विठ्ठल गायकवाड, हर्षल हांडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पुणेकर नागरिक सहभागी झाले होते.

“विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी काँग्रेस पक्ष अखेरपर्यंत लढा देत राहील” असा निर्धार यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: