PMC Standing Committee | सांडपाणी व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड

Homeadministrative

PMC Standing Committee | सांडपाणी व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड

Ganesh Kumar Mule Jul 09, 2026 7:47 AM

Alandi | DP | आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी देणार | पालकमंत्री चंद्रकांत पाटील
Prasanna Jagtap | विश्रांतीनगर कॅनॉल रोड ते वडगाव चरवड गार्डन या कॅनॉल जवळील ट्रॅकवरील झाडेझुडपे प्रशासन कधी काढणार? | माजी नगरसेवक प्रसन्न जगताप यांचा सवाल
PMC Junior Engineer Recruitment 2025 | २७८७९ उमेदवारांना त्यांचा सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचा प्रवर्ग बदलण्यासाठी संधी | ३० ऑगस्ट पर्यंत करू शकता अर्ज 

PMC Standing Committee | सांडपाणी व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड

 

Pune PMC STP Plants – (The Karbhari News Service) –  मुळा-मुठा नदीतील प्रदूषण कमी करून सांडपाणी व्यवस्थापन अधिक कार्यक्षम, अचूक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी पुणे महापालिका ‘पॉल्युशन अबेटमेंट ऑफ रिव्हर मुळा-मुठा (पीएआरएमएम)’ प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक डिजिटल प्रणालींचा अवलंब करणार आहे. प्रकल्पाच्या ‘पॅकेज बी-३’ आणि ‘बी-४’ अंतर्गत भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) आणि जलप्रवाह विश्लेषण प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार असून, त्यामुळे सांडपाणी वाहिन्यांचे नियोजन, देखभाल आणि व्यवस्थापन अधिक परिणामकारक होणार आहे. (Shrinath Bhimale PMC)

मुळा आणि मुठा नदीतील प्रदूषण कमी करून नदीच्या पाण्याचा दर्जा सुधारणे हा पीएआरएमएम प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी सांडपाण्याचे संकलन, प्रक्रिया, शुद्धीकरण केंद्रे, मुख्य मलवाहिन्या, पंपिंग केंद्रे आणि आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. ‘पॅकेज बी’ अंतर्गत बीआयएम, जीआयएस, एमआयएस आणि स्काडा या प्रणालींच्या माध्यमातून सांडपाणी विभागाचे कामकाज अधिक सक्षम आणि माहिती-आधारित करण्यावर भर देण्यात आला आहे.

‘बी-३’ पॅकेजअंतर्गत महापालिका ईएसआरआय आर्कजीआयएस एंटरप्राइज प्रणालीचे अद्ययावतीकरण करणार आहे. यामध्ये विद्यमान सर्व्हरचे उन्नतीकरण, नवीन परवाने, पाच वर्षांचा देखभाल करार तसेच अभियंत्यांसाठी विशेष प्रशिक्षणाचा समावेश आहे. या प्रणालीमुळे शहरातील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, मलवाहिन्या, पंपिंग केंद्रे, मॅनहोल, व्हॉल्व्ह आणि इतर अधोसंरचनेचा एकत्रित डिजिटल नकाशा तयार होणार आहे. प्रत्येक मालमत्तेची स्थिती, तपासणीचा इतिहास, देखभाल नोंदी आणि कार्यस्थिती एका व्यासपीठावर उपलब्ध होणार असल्याने नियोजन आणि निर्णयप्रक्रिया अधिक वेगवान व अचूक होईल. तसेच ऐतिहासिक माहितीच्या आधारे संभाव्य बिघाडांचा पूर्वानुमान घेऊन प्रतिबंधात्मक देखभाल करणेही शक्य होणार आहे.

‘बी-४’ पॅकेजअंतर्गत बेंटली कंपनीचे ओपनफ्लोज सीवरजेम्स आणि वॉटरजेम्स हे जलप्रवाह विश्लेषण सॉफ्टवेअर खरेदी करण्यात येणार आहे. या प्रणालीच्या साहाय्याने सांडपाणी आणि जलपुरवठा जाळ्याची संगणकीय प्रतिकृती तयार करून वाहिन्यांवरील ताण, पाणी तुंबण्याची शक्यता, पूरप्रवण भाग, कमी वेगाने वाहणाऱ्या वाहिन्या तसेच भविष्यातील वाढत्या मागणीचा संपूर्ण यंत्रणेवर होणारा परिणाम याचे सखोल विश्लेषण करता येणार आहे.

या विश्लेषणाच्या आधारे वाहिन्यांची साफसफाई, गाळ काढणे, दुरुस्ती, पुनर्वसन आणि प्रतिबंधात्मक देखभालीचे नियोजन आधीच करता येणार असल्याने अनियोजित बिघाड, सांडपाणी तुंबणे आणि आपत्कालीन दुरुस्तीची आवश्यकता मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. महापालिकेच्या मते, या दोन्ही पॅकेजची अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर सांडपाणी व्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक जीआयएस-आधारित मालमत्ता व्यवस्थापन प्रणाली विकसित होईल. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळ आणि संसाधनांचा अधिक कार्यक्षम वापर होऊन सांडपाणी व्यवस्थापन अधिक सक्षम, शाश्वत आणि भविष्याभिमुख होण्यास मदत होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0