PMC Shahari Garib Yojana | शहरी गरीब योजनेसाठी मिळकतकराची अट रद्द करण्यासाठी स्थायी समिती सकारात्मक!
| प्रशासनाचा अभिप्राय आल्यानंतर अंतिम निर्णय
Shrinath Bhimale PMC – (The Karbhari News Service) – गरजू रुग्णांना चांगल्या आरोग्यसुविधा देणाऱ्या शहरी गरीब योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळकतकराची अट काढून टाकण्यास स्थायी समिती सकारात्मक असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या इतर अटीशर्तींमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान प्रशासनाचा अभिप्राय आल्यानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. (PMC Standing Committee)
शहरातील गोरगरीब नागरिकांना शासकीय रुग्णालयांमध्ये उपचाराच्या पुरेशा सेवा सुविधा उपलब्ध होत नाहीत. दुसरीकडे खासगी रुग्णालयांमधील उपचार गोरगरिबांना परवडत नाहीत. या पार्श्वभूमीवर २०११ पासून शहरी गरीब योजना सुरू करण्यात आली. सुरुवातीला या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाची एकत्रित कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लाख रुपये इतकी होती. आता ही मर्यादा एक लाख ६० हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.या योजनेसाठी दरवर्षी नोंदणी करून कार्ड काढावे लागते.
कार्डधारकांना महापालिकेकडून एक लाखापर्यंत आर्थिक मदत मिळते. महापालिकेच्या पॅनलवरील खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास ५० टक्के खर्च महापालिका देते, तर कॅन्सर व डायलिसिस उपचारासाठी दोन लाखांपर्यंत आर्थिक मदत मिळते. मात्र, यासाठी वार्षिक पाच हजार रुपयांपेक्षा अधिक मिळकतकर भरणाऱ्यांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेण्यात आला होता. या अटीमुळे काही गरजू रुग्णांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले होते. त्यामुळे मिळकतकराची अट काढून टाकावी, अशी मागणी केली जात होती.
भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक प्रमोद उर्फ बाळा ओसवाल यांनी शहरी गरीब योजनेसाठीची मिळकतकराची अट रद्द करावी असा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला होता. त्याला गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मिळकतकराची अट घातल्याने काही गरज रुग्ण या योजनेच्या लाभापासून वंचित राहात होते. आता ही अट काढून टाकल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे. मात्र, या योजनेसाठीची उत्पन्न मर्यादा व अन्य अटीशर्तींमध्ये कोणताही बदल केलेला नाही, असे भिमाले यांनी स्पष्ट केले.

COMMENTS