PMC Pune Office Timing | कार्यालयीन शिस्तीच्या पालनाबाबत पुन्हा एक नियमावली | आता तरी कडक कारवाई होणार का?
| बायोमेट्रिक हजेरीची जबाबदारी आता खातेप्रमुखांवर
| महापालिका अतिरिक्त आयुक्त यांचा महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना इशारा
PMC Office Timing- (The Karbhari News Service) – महापालिका कर्मचारी (PMC Employees) आणि अधिकारी (PMC Officers) कार्यालयीन वेळेचे पालन करताना दिसून येत नाहीत. दुपारी जेवणाच्या सुट्टीनंतर कर्मचारी समूहाने फिरताना दिसतात. वेळ टळून गेली तरी कार्यालयात येत नाहीत. तसेच कार्यालयात सकाळी उशिरा येतात आणि सायंकाळी लवकर निघून जातात. ही बाब महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी (Prithviraj B P IAS) यांनी गंभीरपणे घेतली आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी नियमावली ठरवून दिली आहे. तिचे पालन न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा अतिरिक्त आयुक्तांनी दिला आहे. दरम्यान अशीच एक नियमावली मागील काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. मात्र कर्मचाऱ्यांच्या वागणुकीत काही फरक झाल्याचा दिसून येत नाही. त्यामुळे आता कडक कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
पुणे महानगरपालिका प्रशासकीय कार्यालये व विभाग यांचेसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व अधिकारी, कर्मचारी यांना कार्यालयीन कामकाजाची वेळ (कार्यालय सुरु होण्याची प्रत्यक्ष वेळ सकाळी ०९.४५ व सुटण्याची वेळ सायंकाळी ०६.१५) निश्चित केलेली आहे. तर दुपारी ०२.०० ते ०२.३० ही अर्धा तास भोजनाची मुट्टी नेमून दिलेली आहे. (Pune PMC News)
पुणे महानगरपालिका सेवा विनियमामधील ‘नगरपालिका कर्मचाऱ्यांचे वर्तणूक नियम यातील नियम क्र. २८ आणि २९ नुसार प्रत्येक नगरपालिका कर्मचाऱ्याने कार्यालयात वक्तशीरपणे हजर राहाणे, नेमून दिलेले काम कार्यालयीन वेळेमध्ये इमानाने व प्रामाणिकपणे करणे, सहकाऱ्यांबरोबर अनावश्यक बडबड न करणे, गटागटाने चर्चा न करणे. असे वर्तन सर्व कर्मचाऱ्यांकडून होणे अभिप्रेत व आवश्यक आहे.
कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहून कामकाज करणे ही प्रत्येक कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यानुसार सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहून कामकाज करणे आवश्यक आहे. याबाबत यापूर्वी वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत.
मात्र भोजनाची दुपारी २.३० ची वेळ संपल्यानंतर
महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये तसेच क्षेत्रिय स्तरावरील कार्यालयांमध्ये काही कर्मचारी हे आपापल्या जागेवर कामासाठी उपलब्ध न होता समुहाने फिरताना, चर्चा करताना दिसतात. तसेच कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वीच कार्यालयातून निघून जात असल्याचे निदर्शनास येत आहेत. ही बाब नागरिकांकडून तसेच विविध समाज माध्यमांमधून देखील निदर्शनास आणलेली आहे. कर्मचाऱ्यांची अशी वर्तणूक ही प्रशासकीय दृष्ट्या योग्य नाही. त्यामुळे आयुक्तांनी एक नियमावली ठरवून दिली आहे.
अशी आहे नियमावली
१) अधिकारी / कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येणे जाणेकरिता कार्यालयीन आदेशान्वये नेमून दिलेल्या कार्यालयीन वेळेचे काटेकोरपणे पालन करावे.
२) कार्यालयीन वेळेमध्ये कार्यालय इमारतीमध्ये व इतरत्र कोठेही न फिरता आपापल्या जागेवर उपस्थित
राहून कामकाज करावे.
३) कार्यालयाबाहेर कामकाजाकरिता जाताना हालचाल नोंदवहीत नोंद करावी.
४) कार्यालयीन आदेशामध्ये निश्चित केल्याप्रमाणे भोजनाची वेळ पाळावी, त्यानंतर प्रत्येक कर्मचारी त्याच्या नियुक्त केलेल्या जागेवर उपस्थित असणे आवश्यक आहे.
५) गणवेश अनुज्ञेय असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी गणवेश स्वच्छ व नीटनेटका परिधान करावा.
६) सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी आपली हजेरी बायोमेट्रिक प्रणालीवर दैनंदिन स्वरुपात नोंदवायची आहे. जे अधिकारी/कर्मचारी बायोमेट्रिक हजेरी प्रणालीमध्ये हजेरी नोंदविणार नाहीत त्या अधिकारी/कर्मचारी यांचे महिने महाचे वेतन अदा करण्यात येणार नाही. याची सर्व अधिकारी/ कर्मचारी यांनी नोंद घ्यावयाची आहे.
७) Bio Metric हजेरी तपासूनच वेतनबिलावर स्वाक्षरी करणे ही खातेप्रमुखाची जबाबदारी राहील.
८) वरीलप्रमाणे सर्व अधिकारी/कर्मचारी हे कामकाजाच्या वेळांचे पालन करतात किंवा कसे, याबाबत सर्व खातेप्रमुख यांनी त्यांचे स्तरावर आढावा घ्यावा. कामकाजाच्या वेळांचे पालन न करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचेवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात यावी. आदेशाचे पालन न केल्यास किंवा याबाबत हयगय केल्यास संबंधित खातेप्रमुख जबाबदार राहतील.
COMMENTS