PMC Nominated Corporators | १० स्वीकृत नगरसेवकांसाठी प्रशासनाकडे शेकडो अर्ज आणि हजारो लोकांकडून विचारणा! 

Homeadministrative

PMC Nominated Corporators | १० स्वीकृत नगरसेवकांसाठी प्रशासनाकडे शेकडो अर्ज आणि हजारो लोकांकडून विचारणा! 

Ganesh Kumar Mule Feb 14, 2026 2:40 PM

Bageshwar Maharaj in Pune | बागेश्वरच्या बाबांचे घटनाविरोधी अशास्त्रीय दावे | कायदेशीर कारवाईची महा.अंनिसची मागणी
PMC Employees DA Hike | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना सुधारित दराने महागाई भत्ता लागू | मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी जारी केले सर्क्युलर!
Voters Service Portal | मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करुन घेण्याचे आवाहन

PMC Nominated Corporators | १० स्वीकृत नगरसेवकांसाठी प्रशासनाकडे शेकडो अर्ज आणि हजारो लोकांकडून विचारणा!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र महापालिका नियम १२ नुसार महापालिकेत सदस्यांचे नामनिर्देशन केले जाणार आहे. यावेळी सभागृहात १० नामनिर्देशित सदस्य अर्थात स्वीकृत नगरसेवक असतील. पक्षीय बलाबल नुसार हे सदस्य नामनिर्देशित केले जाणर आहेत. मात्र नामनिर्देशन बाबत नेमकी माहिती नसल्याने विविध क्षेत्रातील लोक महापालिका आयुक्त आणि नगरसचिव यांच्याकडे अर्ज देत आहेत. असे शेकडो अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. तर आतापर्यंत हजारो लोकांनी याबाबत प्रशासनाला विचारणा केली आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

नियमानुसार महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून १ महिन्यात मुख्य सभेच्या बैठकीत सदस्यांचे नामनिर्देशन करणे आवश्यक असते. पक्षीय बलाबल नुसार त्या त्या पक्षाचे गटनेते आपल्या नामनिर्देशित सदस्यांची शिफारस प्रशासनाकडे करतात. त्यावर महापालिका आयुक्त एक समिती नियुक्त करून संबंधित अर्जाची छाननी करतात. जे पात्र सदस्य असतील, त्यांचे नामनिर्देशन केले जाते. याची प्रक्रिया अजून तरी सुरु करण्यात आलेली नाही. मात्र सर्वच पक्षांमध्ये स्वीकृत साठी फिल्डिंग लावली जात आहे. यात भाजपची खूप कसरत होणार आहे. कारण भाजपचे ७ नामनिर्देशित सदस्य असणार आहेत. त्यात तिकीट नाकारलेले किंवा वर्षानुवर्षे पक्षाचे काम करणारे निष्ठावंत खूप आहेत. त्या सर्वांना सदस्य व्हायचे आहे. यात कुणाला संधी द्यायची, हे ठरवणे कठीण काम असणार आहे.

पक्षीय बलाबल

भाजप – ७

राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) – २

कॉंग्रेस – १

एकूण – १० नामनिर्देशित सदस्य

 

दरम्यान स्वीकृत सदस्य होण्यासाठी नियम काय आहेत हे आपण जाणून घेऊया

 

नामनिर्देशनासाठी अर्हता 

– एखाद्या व्यक्तीकडे पालिका प्रशासनाचे विशेष ज्ञान अथवा अनुभव असेल ती व्यक्ती नामनिर्देशित पालिका सदस्याच्या पदासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित केली जाण्यास पात्र असेल, जर ती व्यक्ती,
(क) राज्यात मान्यताप्राप्त व नोंदणीकृत वैद्यक व्यवसायी म्हणून किमान पाच वर्षे काम केलेली असेल, किंवा (ख) किमान पाच वर्ष शिक्षणतज्ज्ञ म्हणून काम केलेली असेल, यामध्ये मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालयाच्या निवृत्त प्राध्यापक, व्याख्याता, मुख्याध्यापक यांचा समावेश असेल, किंवा
(ग) सनदी लेखापाल किंवा परिव्यय लेखापाल म्हणून कमीत कमी ५ वर्षांचा अनुभव धारण केलेली असेल,
किंवा
(घ) कमीत कमी पाच वर्षांचा व्यावसायिक अनुभव असलेली मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवीधारक
असेल, किंवा
(ङ) राज्यात कमीत कमी पाच वर्षांकरिता अभिवक्ता किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्यामधील पदवीधारक व राज्यात विधी क्षेत्रात काम करण्याचा कमीत कमी पाच वर्षांचा अनुभव असलेली असेल, किंव (च) नगरपरिषदेचा मुख्य अधिकारी किंवा महानगरपालिकेचा सहायक आयुक्त किंवा उपायुक्त म्हणून काम करण्याचा किमान पाच वर्षांचा अनुभव असलेली किंवा किमान दोन वर्षांचा अनुभव असलेली महानगरपालिकेतून आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झालेली असेल, किंवा
(छ) महानगरपालिका किंवा नगरपरिषद क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि समाजकल्याण कार्यामध्ये गुंतलेल्या मुंबई सार्वजनिक विश्स्त संस्था अधिनियम, १९५० खाली नोंदणीकृत समाजाधिष्ठित अशासकीय संघटनेचा पदाधिकारी म्हणून किमान पाच वर्षांचा अनुभव असलेली असेल.

 

पालिका सदस्यांचे नामनिर्देशन.-

(१) पालिका सदस्यांचे नामनिर्देशन करण्यासाठी, आयुक्त, महानगरपालिकेतील सभागृह नेता, विरोधी पक्षनेता आणि प्रत्येक मान्यताप्राप्त अथवा नोंदणीकृत पक्षांच्या किंवा गटांच्या नेत्यांशी विचारविनिमय करून आणि अशा पक्षांचे आणि गटांचे तौलनिक संख्याबळ विचारात घेऊन, महानगरपालिकेला योग्य व्यक्तीच्या नावाची नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशन करण्यासाठी शिफारस करतील. अशा विचारपूस केलेल्या व्यक्तीची संख्या नियम ३ प्रमाणे शिफारस करावयाच्या पालिका सदस्यांच्या संख्येपेक्षा अधिक नसावी :
*[परंतु, मान्यताप्राप्त पक्षांचे किंवा गटांचे किंवा आघाडीचे किंवा फ्रंटचे तौलनिक संख्याबळ विचारात घेऊन नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशन करण्यासाठी शिफारस करताना यथास्थिती मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५०स च्या पोट-कलम (२) किंवा मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम ३१अ किंवा नागपूर शहर महानगरपालिका अधिनियम, १९४८ च्या कलम ४०अ यामधील तरतुदीनुसार बनविलेल्या मान्यताप्राप्त अथवा नोंदणीकृत पक्षांचे किंवा गटांचे किंवा आघाडीचे फ्रंटचे तौलनिक संख्याबळानुसार आयुक्त, प्रथम नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशनासाठी पूर्णांक विचारात घेईल आणि त्यानंतरही जर एक किंवा अधिक जागा शिल्लक राहिल्यास अपूर्णांकामध्ये ज्या मान्यताप्राप्त किंवा नोंदणीकृत पक्षाची किंवा गटांचे किंवा आघाडीचे किंवा फ्रंटचे संख्याबळ सर्वात जास्त आहे, तेथून सुरुवात करून उतरत्या क्रमाने उर्वरित जागांचे वाटप पूर्ण करेल :

परंतु, आणखी असे की, वरील परंतुकात नमूद केल्यानुसार अपूर्णांकातील संख्याबळ उतरत्या क्रमाने विचारात घेऊन नावांचे नामनिर्देशन करताना, जर दोन किंवा अधिक मान्यताप्राप्त किंवा नोंदणीकृत पक्ष किंवा गट किंवा आघाडीची किंवा फ्रंटची अपूर्णांकातील संख्या सारखीच असल्यास, आयुक्त, अशा मान्यताप्राप्त किंवा नोंदणीकृत पक्ष किंवा गट किंवा आघाडी किंवा फ्रंटमधून नामनिर्देशित सदस्यांची शिफारस करण्यासाठी निवड, अशा सर्व संबंधित पक्ष किंवा गट किंवा आघाडी किंवा फ्रंटच्या उपस्थितीत चिठ्ठया टाकून करील.]

(२) आयुक्तांनी केलेल्या शिफारशींचा विचार करून महानगरपालिका, पालिका सदस्यांचे नामनिर्देशन करीलः परंतु, आयुक्तांनी अशा प्रकारे शिफारस केलेल्या व्यक्तीची शिफारस महानगरपालिकेने अमान्य करावयाची ठरविल्यास त्याबाबतची कारणे महानगरपालिकेला नोंद करावी लागतील :
परंतु आणखी असे की, नियम ४ मधील (क) ते (छ) मधील अर्हता असणाऱ्या प्रत्येकी एका व्यक्तीची पालिका सदस्य म्हणून नामनिर्देशन सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात यावा.]

पालिकेतील नामनिर्देशित सदस्यांची नावे प्रसिद्ध करणे. – याप्रमाणे नामनिर्देशित केलेल्या सदस्यांची नावे शक्य तितक्या लवकर पालिका सचिव, महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी पाठवील.

प्रासंगिक रिक्त पदे. – नामनिर्देशित पालिका सदस्याचे एखादे पद रिक्त होईल तेव्हा ते रिक्त पद भरण्याकरिता या नियमांच्या तरतुदी योग्य त्या फेरफारांसह लागू होतील.

नामनिर्देशित पालिका सदस्यांना प्रमाणपत्र देणे. – नामनिर्देशित पालिका सदस्यांची नावे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर आयुक्त, यासोबत जोडलेल्या नमुन्यात प्रत्येक नामनिर्देशित पालिका सदस्यांना प्रमाणपत्र देईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: