दोन दिवसांच्या मुख्य सभेत तब्बल १५८ प्रस्ताव मान्य
: सुमारे ३४६ प्रस्ताव मांडले
: सात कार्यपत्रिकांवर चर्चा
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या मंगळवार आणि बुधवार या दोन दिवस चाललेल्या सर्वसाधारण सभेत (जीबी) विविध प्रकारचे तब्बल ३४६ प्रस्ताव मांडण्यात आले. त्यापैकी १५८ प्रस्ताव मान्य करण्यात आले. दोन दिवस सलग आठ ते नऊ तास चाललेल्या या सभेमध्ये साधक बाधक चर्चा करत सर्व विषय एकमताने मान्य करण्यात आले, अशी माहिती सभागृह नेता गणेश बिडकर यांनी दिली.
: सर्वांचे सहकार्य मिळाले : बिडकर
महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवार आणि बुधवारी झाली. पालिकेच्या नवीन इमारतीमधील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही सभा पार पडली. दोन दिवसांच्या या सर्वसाधारण सभेत सात कार्यपत्रिकांवर चर्चा झाली. यामध्ये १५८ विषय मान्य करण्यात आले. करोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे दीड ते पावणे दोन वर्षांपासून अनेक गोष्टींवर बंधने आली. पालिकेच्या कामकाजावर देखील याचा परिणाम झाला. पालिकेच्या सर्वसाधारण सभाना याचा फटका बसला. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून प्रस्ताव रखडले होते. त्यामुळे विकासाची कामे खोळंबली होती.
करोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्यानंतर महानगरपालिकेला ऑफलाईन पद्धतीने सर्वसाधारण सभा घेण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार करोनाच्या आवश्यक त्या नियमांचे पालन करून हे कामकाज करण्यात आले. सर्वपक्षीय गटनेत्यांशी चर्चा करून सभागृहात हे विषय मांडून त्यावर आवश्यक चर्चा करत सभासदांच्या शंकाचे समाधान करत हे प्रस्ताव मांडून मान्य करण्यात आले, असे सभागृह नेते बिडकर यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षाच्या सभासदांबरोबर विरोधी पक्षाच्या सभासदांनी केलेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. यापुढील काळात देखील शहराच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणारे प्रस्ताव सर्वानुमते मांडून एकमताने मान्य करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा राहणार असल्याचे बिडकर यांनी आवर्जून सांगितले.
या प्रस्तावांना देण्यात आली मंजुरी….
– स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो मार्ग वाढीव खर्च
– हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग अंशतः बदल
– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक उड्डाणपूल संरचना बदल खर्च
– समाविष्ट अकरा गावे डिपी मुदतवाढ
– करोनामुळे मृत्यू झालेल्या पालिकेच्या सेवकांसह रोजंदारी तसेच कंत्राटी कामगारांच्या वारसांना केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार अधिकाधिक मदत देणे.
– शहरातील महत्वकांक्षी प्रकल्प मार्गी लागण्यासाठी ७२ ब नुसार निधी उपलब्ध करून देणे
महापालिकेत सत्ता स्थापन करताना शहराच्या विकासासाठी सदैव तत्पर राहण्याची ग्वाही भारतीय जनता पक्षाने दिली आहे. पुणेकरांसाठी हे प्रस्ताव मार्गी लागणे गरजेचे आहे. करोनामुळे अनेक महत्वाचे विषय गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित होते. विरोधी पक्षाच्या गटनेत्यांशी चर्चा करून त्यांना हे विषय मान्य होणे किती आवश्यक आहे याची खात्री पटवून दिल्यानेच हे सर्व विषय एकमताने मान्य करण्यात आले. पुणेकरांच्या विकासासाठी येणाऱ्या काळात अशाच पद्धतीने कामकाज करण्याचा प्रयत्न आहे.
COMMENTS