PMC Contract Labour Bonus Circular | कंत्राटी कामगारांचे बोनस बाबतचे धोरण जाहीर | २३१० ते ३७७५ रु इतकी होणार वेतनात वाढ! | दिवाळीला १० हजारांची उचल देखील दिली जाणार!
| महापालिका प्रशासनाकडून परिपत्रक जारी
PMC Contract Employees – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेतील बह्यस्त्रोताद्वारे सेवा घेण्यात येत असलेल्या कंत्राटी कामगारांना किमान वेतनामध्ये बोनस, रजा वेतन व घरभाडे देण्याबाबत धोरण जाहीर करण्यात आले आहे. महापालिका आयुक्तांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार आता कामगारांच्या किमान वेतनात २३१० ते ३७७५ रु इतकी वाढ होणार आहे. तर दिवाळीला १० हजारांची उचल देखील कंत्राटी कामगारांना दिली जाणार आहे. कंत्राटी कामगारांसाठी महापालिकेने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे. (Pune Municipal Corporation – PMC Diwali Bonus 2025)
पुणे महानगरपालिकेतील बाह्यस्त्रोताद्वारे सेवा घेण्यात येत असलेल्या कंत्राटी कामगारांना व एकवट मानधनावर घेतलेल्या कंत्राटी कामगारांना (ज्या कामगारांना किमान वेतन दिले जात आहे) किमान वेतनामध्ये बोनस, रजा वेतन व घरभाडे अदा करणे बाबत स्थायी समितीची धोरणात्मक मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार कंत्राटी कामगारांना तसेच पुणे महानगरपालिकेने एकवट मानधनावर घेतलेल्या कंत्राटी कामगारांना (ज्या कामगारांना किमान वेतन दिले जात आहे) ऑक्टोबर, २०२५ पासून बोनस प्रदान अधिनियम, १९६५ अन्वये किमान वेतनावर ८.३३% बोनस, महाराष्ट्र दुकाने व व्यापारी आस्थापना २०१७ अधिनियमान्वये किमान वेतनावर ५% रजा वेतन, तसेच महाराष्ट्र किमान घरभाडे अधिनियम, १९८३ अन्वये किमान वेतनावर ५% घरभाडे देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
अशा पद्धतीने दिले जाणार वेतन
१. सर्व कंत्राटी कामगारांना व एकवट मानधनावरील कामगारांना ज्यांचे एकूण वेतन २१,०००/- पेक्षा कमी आहे त्यांना किमान वेतन दरावर (मूळ वेतन व विशेष भत्ता यावर ) ८.३३% दराने बोनस, रजावेतन ५% दराने व घरभाडे ५% दराने ऑक्टोबर, २०२५ पेड इन नोव्हेंबर २०२५ च्या वेतनामध्ये कामगारांच्या उपस्थिती प्रमाणे ठेकेदारामार्फत आदिले जाणार आहे.
२. ज्या कंत्राटी कामगारांचे व एकवट मानधनावरील कामगारांचे (ज्या कामगारांना किमान वेतन दिले जात आहे) वेतन र.रु.२१,०००/- पेक्षा जास्त आहे त्यांना बोनस अनुज्ञेय होणार नाही. तथापि त्यांना मूळ वेतन व विशेष भत्ता यावर प्रत्येकी ५% दराने घरभाडे व रजा वेतन दरमहा वेतनामधून आदा करणे अनुज्ञेय राहील.
३. ठेकेदारामार्फत घेण्यात येणाऱ्या कंत्राटी कामगारांना किमान वेतन वरील आदेशानुसार लागू केल्यानंतर मागील फरकाची रक्कम कामगारांना / संघटनांना मागता येणार नाही, या अटीस अधीन राहून सुधारीत वेतन आदा करण्यात येणार आहे.
४. कंत्राटी कामगारांना २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन १ मे कामगार दिन १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व २ ऑक्टोबर – म.गांधी जयंती या चार राष्ट्रीय सुट्ट्या भरपगारी देण्यात येणार आहेत. तसेच या दिवशी त्यांचेकडून काम करून घेतल्यास त्यांना त्या दिवसाचे वेतन दुप्पट दराने देणे व एक पर्यायी सुट्टी देणे आवश्यक राहील.
———
कंत्राटी कामगारांच्या वेतनात कशा पद्धतीने वाढ होणार आहे हे आपण जाणून घेऊयात.
सुरुवातीला आपण कुशल कामगारांचे वेतन कसे वाढणार आणि त्याला कुठले लाभ मिळणार हे जाणून घेऊ.
कुशल कामगारांचे किमान वेतन – २३ हजार १०० रु. या कामगारांचे वेतन २१ हजार पेक्षा जास्त असल्याने त्यांना ८.३३% बोनस चा लाभ मिळणार नाही. मात्र त्यांना घरभाडे ५% म्हणजे ११५५ रु आणि रजां वेतन ५% म्हणजे ११५५ रू मिळणार आहे. त्यानुसार त्यांच्या वेतनात एकूण २३१० रुपयांची वाढ होणार आहे.
आता आपण अर्धकुशल कामगारांच्या वेतनात कशी वाढ होईल ते पाहू.
अर्धकुशल कामगारांचे किमान वेतन – २२ हजार १०० रु. या कामगारांचे वेतन २१ हजार पेक्षा जास्त असल्याने त्यांना ८.३३% बोनस चा लाभ मिळणार नाही. मात्र त्यांना घरभाडे ५% म्हणजे ११०५ रु आणि रजां वेतन ५% म्हणजे ११०५ रू मिळणार आहे. त्यानुसार त्यांच्या वेतनात एकूण २२१० रुपयांची वाढ होणार आहे.
——-
आता आपण अकुशल कामगारांच्या वेतनात कशी वाढ होईल ते पाहू.
अकुशल कामगारांचे किमान वेतन – २० हजार ६०० रु. या कामगारांचे वेतन २१ हजार पेक्षा कमी असल्याने त्यांना ८.३३% बोनस चा म्हणजे १७१५ रुपयांचा लाभ मिळणार आहे. तसेच त्यांना घरभाडे ५% म्हणजे १०३० रु आणि रजां वेतन ५% म्हणजे १०३० रू मिळणार आहे. त्यानुसार त्यांच्या वेतनात एकूण ३७७५ रुपयांची वाढ होणार आहे.
———
दिवाळी साठी दिली जाणार उचल
दरम्यान दरवाढ ही ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर या महिन्यामध्ये वेतनामधून होणार असल्याने व दिपावली सणाची सुरवात १७ पासून होणार असल्याने प्रत्येक कंत्राटी कामगारांस व एकवट मानधनावरील कामगारांस बोनस पोटी अॅडव्हान्स म्हणून रक्कम रु.१०,०००/- देणे व त्याची प्रतिपूर्ती ऑक्टोबर, २०२५ पेड इन नोव्हेंबर, २०२५ पासून पुढील ५ महिन्यांत र.रु.२०००/- कपात करून करण्यात येणार आहे. ज्या ठेकेदारांच्या निविदा कालावधी ५ महिन्यांपेक्षा कमी आहे त्यांनी त्यांच्या निविदेच्या उर्वरित कालावधीत समान हप्त्यामध्ये रकमेची प्रतिपूर्ती करून घ्यावी. अॅडव्हान्स कामगारांच्या संमतीने देण्यात यावा. असे महापालिका आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.


COMMENTS