Pinjara Ani Baichya Katha by Ganesh Mule | गणेश मुळे लिखित ‘पिंजरा आणि बाईच्या कथा’ या कथासंग्रहाचे प्रसिद्ध लेखक समीर गायकवाड यांनी केलेले समग्र विश्लेषण आणि प्रस्तावना वाचा जशीच्या तशी!
Pinjara Ani Baichya Katha – (The Karbhari News Service) – मानवी स्वभाव आणि स्त्री पुरुष यांच्यातील नात्याची गुंतागुंत उलगडून दाखवणारा पत्रकार गणेश मुळे (Journalist Ganesh Mule) यांचा ‘पिंजरा आणि बाईच्या कथा’ (Pinjara Ani Baichya Katha) हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. गणेश मुळे यांचा हा पहिलाच कथासंग्रह आहे. मैत्री प्रकाशन ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. विविध स्तरातून या पुस्तकाबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक समीर गायकवाड (Renowed Writer/Author Sameer Gaikwad) यांनी समग्र विश्लेषण केले आहे आणि प्रस्तावना देखील लिहिली आहे. ही प्रस्तावना आणि विश्लेषण तुम्ही इथे वाचू शकता.
—–
गणेश मुळे यांनी लिहिलेल्या ‘पिंजरा आणि बाईच्या कथा’ हा कथासंग्रह वाचताक्षणी मनात पहिली प्रतिक्रिया अशी उमटते की हा एक धाडसी आशयप्रसव आहे! अलीकडील काळात या धाटणीची लेखननिर्मिती होत नाही कारण लेखकाच्या विचारसरणीवर संशय घेऊन त्याला पुरुषप्रधान वृत्तीस पोषक ठरवले जाण्याचा धोका यात आहे. सद्यकाळात स्त्रीवादी विचारसरणीच्या विरोधात मांडल्या जाणाऱ्या कोणत्याही कलाकृतीचा जोरदार प्रतिवाद केला जात असताना अशा मांडणीचे लेखन साकारणे हे मधमाशाच्या पोळांवर दगड मारण्यासारखे आहे. यामुळेच गणेश मुळे यांची मांडणी धिटाईची आहे असे म्हणावे लागते. याचा अर्थ असा नाहीये की त्यांनी या लेखनाद्वारे पुरुषसत्ताक विचारांची पाठराखण केलीय! अत्यंत तटस्थतेने लेखन केले असल्याने त्यांच्यावर असा आरोप करणं अन्यायी ठरेल. या संग्रहात एकूण सहा कथा आहेत. गणेश मुळे त्यांच्या कोणत्याही कथेद्वारे कोणतेही थेट निष्कर्ष काढत नाहीत, हा मुद्दा ते वाचकांवर सोडून देतात. यात लैंगिक उपासमार झालेल्या स्त्रियांची पात्रे आहेत. नवऱ्याला सोडून देणाऱ्या स्त्रिया आहेत. घटस्फोटीत स्त्रियांच्या कथा आहेत. पुरुषाच्या तालावर नाचण्याची इच्छा नसलेल्या स्त्रिया सर्व कथांमध्ये आहेत. या स्त्रिया आणखी थोड्या कणखर दाखवल्या असत्या तर लेखन अधिक उठावदार झाले असते. अर्थात मुळे यांनी अनुभवलेल्या जाणिवांच्या परिघात त्यांना जशी माणसं भेटली तशी त्यांनी ती कागदावर उतरवलीत, त्या परिघात अशा स्त्रिया कदाचित नसतीलही!
या कथासंग्रहातील सर्व कथा लघुकथा या श्रेणीतील आहेत. लघुकथांचे फॉर्म शक्यतो सुटसुटीत असतात. इथे लेखक गणेश मुळे यांनी प्रयोग केला आहे. एकाच कथेत प्रथमपुरुषी आणि तृतीयपुरुषी पद्धत वापरली आहे. पात्रांविषयी लिहिलं जाऊन कथांची बांधणी भरात आलेली असताना पात्रे प्रथमपुरुषी पद्धतीने स्वतःविषयी व्यक्त होऊ लागतात. हा प्रयोग पात्रांची जडणघडण समोर आणतो! लेखकाचे निरीक्षण सच्चेपणाकडे कललेले आहे. ‘विभ्रम’ या कथेमधील पुरुषांना लैंगिक सुखाच्या सापळ्यामध्ये अडकावणाऱ्या स्त्रीचे (कीर्ती) पात्र मध्यवर्ती आहे. स्त्रिया पीडित, वंचित आहेत हे सर्वमान्यच आहे मात्र काही मोजक्या स्त्रिया अशाही असतात याकडे दुर्लक्ष करता येत नाही. त्यांच्याविषयी उघडपणे लिहिलं बोललं जात नाही. तिची जडणघडण अशी का झाली याचा उलगडाही समाधानकारक आहे. वासंती हे पात्र मध्यमवर्गीय मध्यममार्गी आणि दबलेल्या स्त्रीचे प्रतिनिधित्व करते. नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे शोषण करणारे पुरुष सर्वत्र आढळतात त्याचे सशक्त चित्रण यात आहे.
घटस्फोट घेताना होणारी तगमग आणि घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडताना वाटणारी असहायता काही कथांमध्ये येते. राजकीय पटलावर एखादी स्त्री स्वतःचं अस्तित्व सिद्ध करू इच्छिते तेव्हा तिला किती आव्हानांना तोंड द्यावे लागते याचे जोरकस शब्दांकन ‘सप्तपदी’ या कथेत आहे. प्रसंगी अनेकांची शय्यासोबत करत जाताना त्या स्त्रीची मानसिकता कशी बदलत जाते याचे टप्पेही उत्तम रेखाटले आहेत. तिच्याकडे समाज कोणत्या नजरेने पाहतो नि तिचा पती कोणत्या नजरेने पाहतो हे उद्बोधक आहे. कालांतराने समाज अशा स्त्रीबद्दल कोतेपणा बाळगत नाही मात्र तिच्या चारित्र्याविषयी तो आदर्श भूमिकाही घेत नाही. किंबहुना अशी स्त्री कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्या कामास येते याचा सुप्त आनंद लोकांना असतो. ती वृत्ती थोडीशी अधिक उठावदार हवी होती. तरीही गणेश मुळे यांनी यावर कटाक्ष टाकलेला राहवे.
‘प्रारब्ध’ या कथेत वसुधा आणि आसावरी या दोन मैत्रिणींची कथा आहे. ईशानच्या रूपाने सुरक्षित नि खात्रीलायक स्त्री जोडीदार निवडण्याची वृत्ती असणारा उपनायक कथेत आहे. घटस्फोट घेताना मानसिक द्वंद्वांना सामोरे जावे लागते, त्यानंतर समाज ज्या बुभुक्षित नजरेने त्यांच्याकडे पाहतो त्याचा सामना त्यांना करावा लागतो. स्त्री स्वतंत्र राहू इच्छिते की अन्य कुणा पुरुष जोडीदाराचा ती आधार शोधते हा प्रश्न व्यक्तीसापेक्ष भिन्न उत्तर देईल. अशा स्त्रीने नव्याने दुसऱ्या पुरुषाचा आधार घेण्याचा प्रयत्न केला तर तिची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. या कथेत वसुधा ज्याच्या प्रेमात पडते त्याने तिच्या मैत्रिणीची पूर्वी एक तऱ्हेने फसवणूक केलेली असते. दोन स्त्रिया एकाच पुरुषाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून कशा पाहतात, याचे वर्णन त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीशी निगडीत असतो हे मोठ्या खुबीने समोर येते.
अलीकडील काळात घर सोडून पळून गेलेल्या विवाहित स्त्रियांच्या बातम्या नेहमी वाचनात येतात. एखादी विवाहित स्त्री आपलं घर, आपला पती, आपले अपत्य सोडून कशी काय निघून जाऊ शकते असा सवाल समाज नेहमीच करत असतो. त्याहीपलीकडे जाऊन नैतिकतेचे कथित ठेकेदार असणारी मंडळी अशा घटनांना दोन बाजू असू शकतात हे कधीच मान्य करत नाहीत. ‘पिंजरा’ या कथेची नायिका रत्नप्रभा ही एका विवाहित परपुरुषासोबत गावातून पळून जाते. ग्रामीण भागात अशा घटनांचे प्रमाण तुलनेने अल्प आहे. यावर तिथला ग्राम्य समाज कसा व्यक्त होतो याचे नेटके चित्रण कथेत येते. पलायन केलेल्या स्त्रीसोबत असणारा तिचा साथीदार सामाजिक दबावापुढे झुकतो आणि कालांतराने ती पुन्हा एकटी पडते हे सर्रास दिसणारे चित्र आहे. यावर कमी लिहिले गेले आहे. अशा कथाबीजांना फुलवताना पुरुषप्रधान विचारसरणीच्या प्रभावापासून दूर राहण्याची कसरत करावी लागते ती गणेश मुळे यांना जमली आहे.
‘सावज’ या कथेच्या नायिकेची तगमग प्रेमासक्तीची आहे. मात्र त्याला देहसुखाची किनार आहे. मात्र तिच्या वाट्याला येणाऱ्या विराजचे मन देहासक्त नसते. विरोधाभासी विचारसरणीची दांपत्ये एकत्र राहतात तेव्हा ती एक तडजोड असते. मात्र एकल जीवन जगत असताना असा साथीदार गाठ पडला तर गोंधळ उडतो. पुरुषांनी हवा तसा वापर केलेल्या स्त्रीने जर सूड उगवायचा ठरवले तर एका मर्यादेपर्यंतच ती कठोर क्रूर होऊ शकते. तिच्यातले स्त्रीत्व तिला पुन्हा पुन्हा मागे खेचत राहते हे या कथेचे जीवनतत्व. नोकरीतून निवृत्ती होण्यास एक दिवस बाकी असताना लाचलुचपत खात्याद्वारे रंगे हाथ पकडले जाऊन कारावास भोगत असणाऱ्या शिर्केबाई ह्या ‘बंद गजाआड’ या कथेच्या नायिका आहेत. नियतीवादावर ही कथा भर देते. नोकरी करणाऱ्या स्त्रीने जर सर्व छक्केपंजे आत्मसात करायचे ठरवले तर काही गोष्टी अटळ असतात. त्यातलीच एक बाब म्हणजे मोह आणि लालसा. अतिरेकी लालसा ऱ्हास घडवते. शिर्केबाईंच्या आयुष्याची परिणती अशीच होते. अधःपतन होऊनदेखील अखेरीस आपली स्वतःची ओळख पटली तर अशी व्यक्ती आहे त्या स्थितीस देखील समाधानकारक मानू लागते हे विशेष!
गणेश मुळे यांनी तात्विक मुलामा देणे टाळत, प्रबोधनाचा बाज न देता सरळ सुबोध लेखन केले आहे. त्यांची भाषा प्रवाही आहे. संवादी शैलीतले लेखन फारसे नाहीये मात्र लालित्यपूर्ण लेखनशैली असल्याने क्लिष्ट विषय असूनही वाचकांस ते सुसह्य वाटतात. या सर्व कथांमधून काही सामाजिक प्रश्न समोर मांडले असले तरी लेखकाने त्यावर भाष्य करणे हेतुतः टाळले असावे. कदाचित या गोष्टी त्यांना वाचकांवर सोडून द्याव्या वाटत असतील अशीही शक्यता आहे. काही कथा आणखी फुलवता आल्या असत्या तर काही कथांचे मध्यवर्ती भाग आणखी सशक्त झाले असते. या त्रुटी ग्राह्य धरल्या तरीही हे लेखन उजवे वाटते कारण यातले कथाविषय आणि त्यांची मांडणी! अशा आशय विषयांच्या कथा लिहिताना शृंगारिकतेच्या नावाखाली सेमी-पॉर्न लिहिण्याकडे अनेकांचा कल असतो. ज्यामुळे मूळ लेखनविषय बाजूला सारला जातो व त्यातले गांभीर्य कमी होते. मुळे यांनी हा मोह टाळून केवळ जुजबी उल्लेख केले आहेत जे कथेच्या बांधणीसाठी अनिवार्य आहेत.
स्त्री पुरुषांच्या देहजाणिवा आणि लैंगिक भूक यावर लिहिताना संतुलित लेखन करणे बऱ्यापैकी कठीण असते कारण हे दोन्ही घटक नैसर्गिक असूनही स्त्रीच्या देहजाणिवांना आपला समाज कपदार्थ समजतो, त्याची अवहेलना करतो हे वास्तव आहे! लैंगिक भुकेला समाजाने पाप, किटाळ ठरवले असल्याने ते संतुलन सांभाळत लिहिणे ही एक प्रकारची कसरतच होय. वेगळ्या विषयांना हात घालताना भडक, भपकेबाज आणि उठवळ लेखन टाळून त्रयस्थ वृत्तीने मांडणी केल्याने वाचकांना एक वेगळी अनुभूती मिळवून देण्यात कथासंग्रह यशस्वी ठरतो.
लेखक गणेश मुळे हे पेशाने पत्रकार आहेत. सद्य काळात सर्वाधिक बदनाम झालेला हा पेशा आहे. सकल सामाजिक जाणिवा बोथट झालेला नि कणाहीन लाचार घटक अशा नजरेनेच सामान्य माणूस यांच्याकडे पाहतो हे कटूसत्य कुणी नाकारू शकत नाही. अर्थात हाताच्या बोटांवर मोजता येतील असे अपवाद याही क्षेत्रात आहेत; मात्र अपवाद हेच संपूर्णत्व असू शकत नाही त्यामुळेच तर त्यांना अपवाद म्हटलं जातं. मुळे यांच्यातला पत्रकार तर सजग आहेच खेरीज त्यांच्यातला सामाजिक जाणिवा टोकदारपणे सचेत असणारा माणूसही जिवंत आहे ही मोठी जमेची बाजू होय! आगामी काळात गणेश मुळे यांच्याकडून अशाच धाडसी कसदार लेखनाची अपेक्षा ठेवायला हरकत नाही.
(‘पिंजरा आणि बाईच्या कथा’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेतून)
COMMENTS