Anantrao Pawar College | अनंतराव पवार महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला संपन्न
Pune Education News – (The Karbhari News Service) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अनंतराव पवार महाविद्यालय, पिरंगुट यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेचे आयोजन महाविद्यालयाच्या सभागृहात दि. ०४ फेब्रुवारी ते ०६ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो हे होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. एस. बी. शिंदे, प्रा. भरत कानगुडे उपस्थित होते. (Pune News)
या तीन दिवसीय व्याख्यानमालेचे पहिले पुष्प : दि. ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळाचे माजी संचालक प्रा. डॉ. धनंजय लोखंडे यांनी ‘सावित्रीबाई फुले विचार व कार्य’ या विषयावर गुंफले. सुरुवातीला डॉ. लोखंडे यांनी बहि:शाल शिक्षण मंडळाची स्थापना, त्या पाठीमागील उद्देश, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाविषयी माहिती, घोलप साहेबांचे शैक्षणिक, सामाजिक कार्य याविषयी माहिती देऊन सावित्रीबाई फुले यांच्या विचार कार्याचा सविस्तर आढावा घेतला. ‘सावित्रीबाई फुले विचार व कार्य’ या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी सावित्रीबाई फुले यांचा जन्म, विवाह, स्त्रीशिक्षणाचे कार्य याविषयी सखोल माहिती दिली. त्याचबरोबर महात्मा फुले यांच्याही जीवनकार्याचा आढावा घेतला. सावित्रीबाईंचा शैक्षणिक प्रवास अधोरेखित करताना महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना शिक्षणाचे धडे कसे दिले हे उदाहरणातून दाखवून दिले. त्याचबरोबर फुले दाम्पत्यांनी स्त्री शिक्षणविषयक केलेले कार्य, त्याचबरोबर समाजामध्ये असणाऱ्या अनिष्ट रूढी, प्रथा- परंपरा यांना मोडीत काढण्यासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी कशा प्रकारे काम केले; हे अधोरेखित करतानाच त्यांना मदत करणारे उस्मान शेख फातिमा शेख यांचीही माहिती दिली. पुरोहितांकडून महात्मा फुलेंना कशा प्रकारे त्रास दिला गेला; याविषयीही त्यांनी भाष्य केले. महात्मा फुले यांना वाईट मानून त्यांना संपवण्याची भाषा करणारे एकनाथ रोडे, धोंडीबा कुंभार हेच त्यांना पुन्हा शरण कसे गेले हे उदाहरणातून सांगितले.
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा आढावा घेतानाच महात्मा फुलेंच्या नंतर सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाची धुरा कशाप्रकारे सांभाळली हे सांगितले. त्यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक संस्था यांची माहिती दिली. त्याचबरोबर महिला सेवा मंडळ, बालहत्या प्रतिबंधक गृह यांची माहिती देताना सावित्रीबाईंचे स्वतंत्र अस्तित्व, त्यांचे कार्य कसे आहे हे अधोरेखित केले. पुढे त्यांनी सत्यशोधक विवाह पद्धतीचीही माहिती दिली. दुष्काळामुळे अन्नाची टंचाई जाणवू लागल्यानंतर ओतूर येथे सावित्रीबाई फुले यांनी अन्नछत्र सुरू करून भुकेल्या अनेकांना जेवण दिले होते याविषयी माहिती दिली. सावित्रीबाई फुले यांच्या साहित्य संपदेचीही माहिती यावेळी दिली. यामध्ये बावन्नकशी सुबोध रत्नाकर, काव्यफुले काव्यग्रंथांची माहिती देऊन ‘तयास मानव म्हणावे का?’ ही कविता उपस्थितांसमोर सादर केली. डॉ. लोखंडे यांनी फुले दाम्पत्यांनी दत्तक घेतलेले पुत्र यशवंत यांच्याही कार्याची यावेळी माहिती दिली.
दुसरे पुष्प: दिनांक ०५ फेब्रुवारी २०२५ रोजी मा. श्री. सतीश सुरवसे यांनी ‘विनोदातून अध्ययन’ या विषयावर गुंफले. ‘विनोदातून अध्ययन’ या विषयावर बोलताना सुरवसे यांनी आपल्या लेखन प्रवासाची माहिती देऊन साहित्याची ओळख करून दिली. यावेळी त्यांनी ‘हाकमारी’ ही कथा आपल्या कथाकथनातून उपस्थितितांसमोर सादर केली. त्यांनी आपल्या कथेतून ग्रामीण भागामध्ये अंधश्रद्धेविषयी असलेल्या चुकीच्या समजूती यावर मार्मिक भाष्य केले. तसेच आपल्या व्याख्यानातून गावगाडा उभा केला. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आई-वडिलांसोबतच आजीचे जे महत्त्व असते ते अधोरेखित केले. तसेच चुकीच्या माहितीतून व्यक्ती चुकीच्या घटनांना कसा सामोरा जातो हेही आपल्या कथेतून मांडण्याचा प्रयत्न केला.
तिसरे पुष्प : ०६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वा. ह.भ.प. प्रा. विशाल महाराज फलके यांनी ‘विद्यार्थीदशा व दिशा’ या विषयावर गुंफले. या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी मानवाच्या जीवनावस्था सांगितल्या. व्यक्तीकडे निर्भीडपणा कसा असावा हे सांगितले. व्यक्तीकडे जे गुण हवेत ते म्हणजे नम्रता, सहजता, व्यापकता, जबाबदारीचे भान याविषयी सविस्तर भाष्य केले. माणूस म्हणून जीवन जगताना आपण कोणकोणत्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे हे सांगताना आपल्या कुटुंबामध्ये आजी, आजोबा, आई, वडील हे का असावेत हे सांगितले. त्यांचे महत्त्व अधोरेखित करताना ‘आई वाचून काही सुचत नाही’ ही कविता उपस्थित समोर सादर करून उपस्थितांना विचार करण्यास प्रवृत्त केले. व्यक्तीने माणुसकी आणि मदतीची भावना ही कायम ठेवावी हे सांगताना व्यावहारिक गोष्टी बाजूला कशा कराव्यात हे सांगितले. प्रत्येकाने भावनात्मक दृष्टीने बघणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन करताना सर्वधर्म समभावाविषयी भाष्य केले. हे सांगताना त्यांनी ज्ञानेश्वरी, गाथा, बायबल यांची निर्मिती होताना जे शब्द वापरलेले आहेत त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही; यापाठीमागील कारणमीमांसा अधोरेखित केली. प्रत्येक विद्यार्थ्याने गुणवंत आणि ज्ञानार्थी कसे व्हावे हे सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांनी संकुचित दृष्टिकोनाऐवजी व्यापक दृष्टिकोन कसा ठेवावा हे उदाहरणातून दाखवून दिले. इच्छाशक्तीची अनेक उदाहरणे त्यांनी दिली. दुसऱ्याच्या मदतीला जाणे, मी कोण आहे? हे ओळखून आपल्यात जे आहे ते सादर करण्याचे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले. मित्र कसे असावेत, विद्यार्थी शिक्षक संबंध कसा असावा हेही आपल्या विविध उदाहरणातून त्यांनी अधोरेखित केले. याप्रसंगी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वाचनाविषयी माहिती दिली. प्रत्येक व्यक्तीने अहंकार बाजूला ठेवावा. तसेच जीवन जगताना एक गोष्ट साध्य झाली नाही; तर दुसरा पर्याय तयार ठेवावा. असा मौलिक सल्लाही यावेळी दिला.
व्याख्यानमालेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. राजेंद्र घाडगे, मानद सचिव मा. ऍड. संदीप कदम, खजिनदार मा.ऍड. मोहनराव देशमुख, सहसचिव मा. श्री. एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) मा. श्री. ए. एम. जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले. प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र कार्यवाह डॉ. गणेश चौधरी, प्रा. भरत कानगुडे, डॉ. किसन पालके, प्रा. सिद्धार्थ नवतुरे, प्रा. दीप सातव, डॉ. राजू शिरसकर यांनी काम पाहिले. कार्यालयीन अधीक्षक श्री. निलेश ठोंबरे, श्री. अनिल डोळस, श्री. विशाल मोकाटे, श्री. मंगेश गोळे, अक्षय शिंदे, श्री. हनुमंत आटळे श्रीम. दिपाली पवळे, श्रीम. आम्रपाली डोळस आदींनी सहकार्य केले.
यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS