Pali Sahitya Sammelan | अखिल भारतीय पाली साहित्य संमेलनाचे शनिवारी आयोजन | भारतासह आठ देशातील पाली तज्ज्ञ आणि संशोधकांचा सहभाग
Pali Bhasha – (The Karbhari News Service) – पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असल्याने पाली भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी पद्मपाणि फाउंडेशन संचलित अभिजात पाली भाषा संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यावतीने तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली आणि बौद्ध अध्ययन विभागाच्या सहकार्याने शनिवार दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० ते संध्याकाळी ६.०० या वेळेत सावित्रीबाई फुले सभागृह, भावनी पेठ, पुणे येथे अखिल भारतीय पाली साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती या संमेलनाचे मुख्य संयोजक पद्मपाणी फाउंडेशनचे राहुल डंबाळे, अभिजात पालीभाषा संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या प्रधान संचालिका सुवर्णा डंबाळे आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. (Buddha Philosophy)
या एकदिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी कोलकात्ता विद्यापीठाच्या पाली विभागाचे प्रमुख अरुण कुमार यांची निवड करण्यात आली असून या संमेलनात भारतासह म्यनमार, श्रीलंका, व्हीएतनाम, जर्मनी, स्वित्झर्लंड, साऊथ कोरिया, थायलंड या आठ देशातील पाली विषयातील तज्ञ आणि संशोधक सहभागी होणार आहेत.
या संमेलनाचे उद्घाटन शनिवार दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचे प्रधान सचिव आणि साहित्यिक डॉ. अतुल पाटणे यांच्या हस्ते होणार आहे, तर प्रमुख पाहुणे म्हणून जर्मनी येथील जागतिक कीर्तीचे भाषा तज्ञ डॉ. जेम्स वू हार्टमन उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाली व बौध्द अध्ययन विभाग प्रमुख डॉ. महेश देवकर, दिल्ली येथील शास्त्रज्ञ आणि पाली भाषेचे प्रसारक डॉ. आर. व्ही. सिंग, मध्य प्रदेशमधील रांची विद्यापीठाचे पाली विभाग प्रमुख डॉ. रमेश वानखेडे, प्रतिमा प्रकाशनाचे प्रमुख डॉ. दिपक चांदणे आणि दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील पाली विभागाचे डॉ. धम्मदीप वानखेडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन सोहळ्याच्या आधी सकाळी १०.०० वाजता महात्मा फुले वाडा येथून सावित्रीबाई फुले सभागृहापर्यंत ग्रंथदिंडी निघणार असून यामध्ये पाली भाषेत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या त्रिपिटकांचा आणि इतर ग्रंथांचा समावेश असेल. उद्घाटन सोहळ्यानंतर दुपारी ३.०० वाजता चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या शिलालेखातील मानवतावादी संदेश या विषयावर लातूर येथील राजर्षी शाहू कॉलेजच्या पाली विभागाचे डॉ. भिमराव पाटील मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर दुपारी ३.४५ वाजता बौद्ध धर्मातील मार संकल्पना या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागाच्या डॉ. दीपाली पाटील मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर ४. १५ वाजता पाली भाषा-संधी व आव्हाने या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या पाली व बौद्ध विभागाचे रितेश ओव्हाळ मार्गदर्शन करणार आहेत.
संमेलनाला सम्यक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार आणि प्रसार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पंकज धिवार, मुक्ता साळवे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सचिन बगाडे आणि फुले- – आंबेडकर विचार व प्रसार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रोहिदास जाधव यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
या संमेलनात पाली विषय व बौद्ध तत्त्वज्ञानाशी संबंधित व्यक्तींनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
COMMENTS