नदी सुशोभिकरण नव्हे, नदी सुधारणाच!
: सभागृह नेते गणेश बिडकर यांचा दावा
पुणे : शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्यांच्या सुधारणाचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. यामध्ये ‘नदीचे केवळ सुशोभिकरण नव्हे तर नदीची सुधारणाच’ केली जाणार आहे. या नद्यांचे पर्यावरण जपणे, नदीत एकही थेंब दूषित पाणी न जाऊ देणे, तसेच नदीबरोबर नागरिकांचे नाते दृढ करण्यासाठी सुविधा विकसित करणे, नदीपात्र हा शहराच्या सौंदर्याचा भाग बनविणे, ही उद्दीष्टे ठेवण्यात आलेली आहेत, असे महानगर पालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी स्पष्ट केले.
गेली ५० वर्षे महापालिका ज्यांच्या ताब्यात होती त्यांनी या नद्यांची वाताहत उघड्या डोळ्यांनी पाहिली नाही तर त्यासाठी हातभार देखील लावला. हजारो ट्रक राडारोडा या नदीपात्रात टाकून पात्र उथळ आणि अरूंद केले गेले. नदीपात्रात दूषित पाणी जाणार नाही, यासाठी काहीही विचार न करता ओढ्या नाल्यांचे आणि ड्रेनेजचे पाणी नदीपात्रात जाण्यापासून वाचवण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही, अशा शब्दात सभागृह नेते बिडकर यांनी नदी सुधारणा प्रकल्पावर टीका करणाऱ्या मंडळींचा समाचार घेतला. या योजनेवर टीका करणाऱ्या व्यक्तीच्याच अनेक बगलबच्च्यांनी नदीपात्रात भराव घालून इमारती उभ्या करण्याचा चंग बांधला होता. नदीची ही अवस्था पाहून डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकार मधील केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी तर ‘ही नदी नव्हे तर हे गटार आहे’, अशी उव्दिग्न प्रतिक्रिया दिली होता. मात्र त्यानंतर देखील यामध्ये काहीही सुधारणा झाली नाही.
केंद्रात आणि पाठोपाठ २०१४ मध्ये राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुळा-मुठा सुधारणेसाठी ठोस पावले उचलण्यास सुरूवात झाली. ‘नमामि गंगे’ प्रकल्पांतर्गत मुळा-मुठा नद्यांची निवड झाली. या प्रकल्पासाठी निवड झालेल्या नद्यांमध्ये गंगे व्यतिरिक्तच्या मुळा-मुठा या एकमेव नद्या आहेत. नदीमध्ये एकही थेंब दूषित पाणी जाऊ नये यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची गरज होती. यासाठी जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी अर्थात जायका ने एक हजार कोटी रुपयांचे अत्यंत कमी व्याजाचे कर्ज मंजूर केले आहे. या कर्जाची हमी केंद्र सरकारने घेतलेली आहे. केंद्रात आणि राज्यात सरकार असतांना देखील काँग्रेस, राष्ट्रवादीने अशी हमी घेतलेली नव्हती आणि यासाठी प्रयत्नही केलेला नव्हता, असे बिडकर यांनी सांगितले.
जायका अंतर्गत ११ नवे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अर्थात एसटीपी उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचेही काम प्रगतिपथावर आहे. नदीसुधार प्रकल्पाचे एकूण ११ टप्पे केले असून त्यातील प्राधान्याच्या टप्प्याच्या कामाच्या निविदाही निघालेल्या आहेत. हा प्रकल्प जगदविख्यात रचनाकार व साबरमती रिव्हरफ्रंटचे शिल्पकार पद्मश्री बिमल पटेल यांच्या मार्गदर्शन आणि देखरेखी खाली राबविला जात आहे. पुण्याच्या दिमाखात भर घालणारा हा प्रकल्प पुण्याचे पर्यावरण समृद्ध करणारा असेल आणि पुण्याच्या विकासाला गती देणाराही ठरेल, असा विश्वास सभागृह नेते बिडकर यांनी व्यक्त केला.
‘राजकीय विद्वानांकडून’ केवळ पुणेकरांची दिशाभूलच
या प्रकल्पाचे स्वरूप माहिती करून न घेता काही राजकीय विद्वान यावर भाष्य करत आहेत. त्यांच्या माहितीसाठी सांगितले पाहिजे की, नदी सुधार प्रकल्पाचा एकूण कालावधी हा दहा वर्षांचा आहे. यातील पहिली पाच वर्षे अभ्यास करण्यासाठीचीच होती. प्रदीर्घ अभ्यासानंतर याचा सविस्तर प्रकल्प अहवाल महापालिकेसमोर सादर करण्यात आला. हा अहवाल जनतेच्या अवलोकनार्थ महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. दरम्यानच्या काळात नदी सुधारसाठीची स्वतंत्र एसपीव्ही देखील उभारण्यात आली. करोनाचे संकट असताना देखील प्रकल्पाचे काम पुढे जातच राहिले आहे.
पंधरा फिल्म प्रसिद्ध करणार
हा प्रकल्प तांत्रिक स्वरूपाचा आहे. अत्यंत सोप्या भाषेत या प्रकल्पाची माहिती देण्याचीही गरज आहे. ही गरज ओळखून आम्ही पंधरा फिल्म्सच्या माध्यमातून ही माहिती पुणेकरांसमोर मांडणार आहोत. या मालिकेतील रोज एक फिल्म आम्ही पुढील पंधरा दिवस प्रसिद्ध (रिलीज) करणार आहोत. यातून जिज्ञासूंचे समाधान होईल, सामान्य पुणेकरांना नेमकी माहिती मिळेल आणि वेड पांघरून पेडगावला निघालेल्यांनाही बोध होइल, असा टोला सभागृह नेते गणेश बिडकर यांनी लगावला.
COMMENTS